अधिकाऱ्यांना कोंडल्यानंतर गडहिंग्लजच्या पथदिव्याचा प्रश्न तात्पुरता सुटला: अधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा साडेचार तासानंतर तोडगा
गणरायाच्या आगमणाच्या पूर्वसंध्येला देखील शहर अंधार; राष्ट्रीय प्राधिकरण-पालिका प्रशासन आमनेसामने
गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज शहरातील पथदिवे गेले सहा महिने बंद आहेत. पथदिव्याचे बिल कुणी भरायचे ? हा वाद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नगरपरिषद यांच्यात सुरू आहे. गणेशोत्सव येवून ही यावर तोडगा नसल्याने संतप्त झालेल्या गडहिंग्लजकरांनी आज बैठकीला आलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना काहीकाळ सभागृहात कोंठून घातले. त्यानंतर झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून निर्णय होईपर्यंत शहरातील पथदिवे जनरेटरवर लावले जातील असे लेखी आश्वासन राष्ट्रीय प्राधिकरणाचे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी दिल्यानंतर बैठकीची समाप्ती झाली. सुमारे साडेचार तास ही बैठक सुरू होती.
शहरातील पथदिवे सुरू करावे यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी आज रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. गणेशोत्सव सणात रास्ता रोको आंदोलनामुळे साऱ्यांची कुंचबणा होणार हे लक्षात घेवून प्रशासने दुपारी चार वाजता पालिकेच्या शाहू सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. या प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, राष्ट्रीय प्राधिकरणचे उपअभियंता आर. बी. शिंदे, अमर पाटील, मुख्याधिकारी संजय गायकवाड, नायब तहसिलदार व्ही. एम. बुट्टे, पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांची उपस्थिती होती. गेल्या सहा महिन्यापासून पथदिवे सुरू करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नगरपालिका प्रशासन चालढकल करत आहे. सणाचे दिवसात शहर अंधारात ठेवून समस्त गडहिंग्लजकरांची चेष्टा लावली असल्याचा राग व्यक्त करत धजदच्या नेत्या स्वाती कोरी, महेश कोरी, शरद पवार राष्ट्रवादीच्या डॉ. नंदाताई बाभुळकर, मनसेचे जिल्हा प्रमूख नागेश चौगुले, भाजपाचे राजेंद्र तारळे, प्रितम कापसे, सुदर्शन चव्हाण, कॉग्रेसचे शहराध्यक्ष बसवराज आजरी, अॅड. fिदग्विजय कुराडे, सागर पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमूख संजय संकपाळ, युवराज बरगे यांनी चर्चेत भाग घेतला.
सणात देखील शहर अंधार ठेवणे प्रशासनाचे अपयश असल्याचा आरोपक करत प्रशासन एकमेकाकडे बोट दाखवत असल्याचा संतप्त सवाल डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी उपस्थित केला. माणुसकीच्या नात्याने विचार करण्याची वेळ आली असताना प्राधिकरणाचे अधिकारी चुकीचे पध्दतीने वर्तन करत असल्याचा त्यांनी निषेध केला. संयमी गडहिंग्लजकराचा आता अंत पाहू नका. सणाचे दिवस सुरू झाले तरी महामार्गावरील पथदिवे बंद आहेत. जबाबदारी राष्ट्रीय महामार्गाची असताना देखील प्रशासन चालढकल करत वेळ काढत असल्याचा आरोप धनजच्या नेत्या स्वाती कोरी यांनी उपस्थित करत प्रशासनाने पथदिवे सुरू केल्याशिवाय येथून हटणार नाही असा पवित्रा घेतला. प्रशासन गडहिंलजकरांची फसवाफसवी करत असेल तर कोणत्याही अधिकाऱ्यांना सभागृहाच्या बाहेर सोडणार नाही अशा इशारा मनसेचे नागेश चौगुले यांनी यावेळी दिला.
जवळपास तीन तासहून अधिक चाललेल्या बैठकीत कोणताच निर्णय होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत थेट व्यासपीठासमोर जावून साऱ्यांनी जाब विचारला. न्याय मिळत नसल्याने अखेर अधिकाऱ्यांना शाहू सभागृहात कोडून घालून कुलूप घातले. अधिकारी सभागृहात आंदोलक सभागृहाबाहेर बसून होते. तासाबरानंतर 8 वाजता कुलपे काढून पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्राधिकरणाचे उपअभियंता शिंदे यांनी शहरातील पथदिव्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होईपर्यंत शहराचा पथदिव्याचा विज पुरवठा जनरेटवर सुरू राहिल असे लेखी दिल्यानंतर बैठकीची समाप्ती झाली.
साडेचार तासाने जनरेटर आले
पथदिवे सुरू केल्याशिवाय राहणार नाही अशी भुमिका घेतल्यानंतर सणाच्या काळात तात्पुर्ता पर्याय म्हणून प्रशासनाने जनरेटचा पर्याय व्यवस्था केल्याचे सांगितले. हिरलगे येथे जनरेटर असल्याचे राष्ट्रीय प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. ते जनरेटर गडहिंग्लजला आणण्यासाठी जवळपास चार तासाहून अधिक कालावधी गेला. बैठकीनंतर जनरेटर पालिकेत दाखल झाला होता. पण रात्री उशिरापर्यंत पथदिवे सुरू करण्यात यश आले नव्हते.
बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करा
शहरातील पथदिवे सुरू करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असताना शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही. शांत, संयमी गडहिंग्लजकरांची सर्वच अधिकारी चेष्टा करत असून बैठकीत देखील राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांच्याकडे उपस्थितांने दिले आहे. याची दखल घेवून कार्यवाही होणार काय ? याकडे लक्ष आहे.