पिडीतेच्या न्याय, हक्कासाठी ‘गडहिंग्लज’कर उतरले रस्त्यावर
कोल्हापूर
शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात ‘गडहिंग्लज’कर रस्त्यावर उतरत पिडीताला न्याय, हक्क मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला. या प्रकरणातील नराधमाला शिक्षा होईपर्यंत पिडीतेच्या कुटूंबाच्या मागे भक्कमपणे उभा राहण्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त करत गडहिंग्लज बंदला प्रतिसाद दिला. यावेळी या व्रुर अत्याचाराविरोधात विराट फेरी काढून या घटनेचा तिव्र निषेध केला. या बंदमध्ये शहरातील सर्व विक्रेत्यांनी सहभागी सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
शहरातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी ‘गडहिंग्लज’ बंदची निर्णय शनिवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार रविवारी सकाळी 9 वाजता दसरा चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत शहरातील मुख्य मार्गावरून जन आक्रोश आंदोलनाचे फलक घेवून फेरी काढण्यात आली. ही फेरी बाजारपेठ, लक्ष्मी मंदिर, नेहरू चौक, बसवेश्वर चौक, मुख्य रस्त्यावरून कडगाव रोड, शिवाजी बॅक, टिळक पथ मार्गे पून्हा शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर उपस्थितांच्या वतीने आरोपीला फाशी दिलीच पाहिजे, महिलांना संरक्षण मिळाले पाहिजे आदी जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, सुसंस्कृत शहरात अशा विकृत घटनेमुळे काळीमा फासण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रवृतीचा निषेध करत पिडीत कुटूंबाला आधार देण्याऐवजी त्रास देण्याचा काम सुरू असल्याची भावना व्यक्त केल्या. ‘गडहिंग्लज’करांच्या एकीमुळे वाढीव गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे सांगत आरोपी शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. बसवराज आजरी म्हणाले, या मुलीवरील अत्याचाराच्या विरोधात एकत्र लढा देण्यासाठी गडहिंग्लजकर कुठेही कमी पडणार नाही. पिडीत कुटूंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असेल तर लढाई आणखी तीव्र करावी लागणार असे आवाहन केले. संतोष चिक्कोडे म्हणाले, परप्रांतीयांनी शहरातील सामाजिक वातावरण बिघडू देवू नये अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा दिला. यावेळी आशा देवार्डे, काशिनाथ देवगोंडा, संतोष राठोड, प्रतिभा पाटील, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रितम कापसे, माजी सभापती अमर चव्हाण, आप्पा शिवणे, डॉ. बेनिता डायस, महेश कोरी, नागेश चौगुले आदींनी मनोगत व्यक्त करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. या फेरीत शहरातील विविध संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या. बंदच्या पार्श्वभुमीवर शहरात ठिकठिकाणी पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त लावण्यात ठेवण्यात आल्याने शांततेत बंद पार पडला. व्यवहार बंद असलेतरी वाहतूक व्यवस्था दिवसभर सुरळीत सुरू होती.
काहीकाळ तणाव..
निषेध फेरीनंतर मनोगत सुरू असताना यामध्ये पोलीस प्रशासनाची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांनी या गोष्टीचा विरोध केला. यामुळे शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. उपस्थित महिला पूढे येत बाजू सांगणाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याने आणखी वातावरण चिघळले. यामुळे दसरा चौकात काहीकाळ तणाव निर्माण झाला. दोन गट पडल्याचे चित्र दिसून आले. काहीवेळानंतर दोन्हीकडून पिडीतेच्या न्याय, हक्कासाठी घोषणा देत निघून जाणे पसंत केले.
दुपारनंतर अशंत: व्यवहार
गडहिंग्लजचा आठवडी बाजार रविवारी असल्याने या दिवशी मोठी उलाढाल होत असते. पण पिडीतेवरील अन्यायाच्या विरोधात शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत व्यवहार बंद ठेवत या घटनेचा निषेध केला. दुपारनंतर फळ विक्रेते आणि बाहेरून आलेले भाजीपाल्या विक्रेत्यांनी fिठकठिकाणी बसून विक्री सुरू केले. तुरळक ठिकाणी दुकाने सुरू झाली होती. सायंकाळ नंतर भाजीपाला खरेदीसाठी लक्ष्मी मार्गावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.