गडहिंग्लजच्या फुटबॉलपटूंचा ‘भाव’ वाढला! 12 फुटबॉलपटूंची कोल्हापुरात नोंदणी
युनायटेडच्या सहा खेळाडूंचा समावेश
गडहिंग्लज प्रतिनिधी
कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) अंतर्गत वरिष्ठ गटात यावर्षी गडहिंग्लजच्या 12 खेळाडूंनी नऊ संघातून नोंदणी केली. यंदा परराज्यातील खेळाडू वाढूनही गडहिंग्लजकरांचा भाव टिकून राहिला. यात गडहिंग्लज युनायटेडचे सहा खेळाडू आहेत. नव्या हंगामात हे खेळाडू कोल्हापुरात कशी कामगिरी करतात याची उत्कंठा आहे.
अर्धशतकापेक्षा अधिक काळापासून कोल्हापूरच्या संघाकडून येथील उत्कृष्ट खेळाडूंना नेहमीच मागणी राहिली आहे. जिह्यात कोल्हापूर शहरानंतर केवळ गडहिंग्लजमध्येच फुटबॉल मोठ्या प्रमाणात ऊजला आहे. साहजिकच साठच्या दशकात (कै.) ए. बी. पाटील, भैरू चौगुले, तर सत्तरमध्ये (कै) विष्णू देवेकर, भिमराव देसाई यांनी कोल्हापुरातील बालगोपाल, प्रॅक्टिस संघातून मैदान गाजविले. ऐशींच्या दशकात कोल्हापुरात व्यावसायिक धर्तीवरील मेनन संघातून नाना चव्हाण आणि (कै.) शंकर मोहिते, रंजन लाखे या अव्वल खेळाडूंनी छाप पाडत संघाचे नेतृत्व देखील केले.
गेल्या दोन दशकांपासून कोल्हापुरातील बहुतांश संघांनी व्यावसायिकपणा अंगीकारत जिल्हा, राज्य आणि देशाबाहेरील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना मानधनावर सामावून घेण्याचे सुरु केले. तेव्हापासून कोल्हापुरात खेळणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. शकिल पटेल, नागेश राजमाने, किरण मोहिते, निखिल खन्ना, सचिन बारामती, इम्रान बाणदार अशी लांबलचक खेळाडूंची यादी आहे. कणखर, शिस्तबध्द आणि स्टॅमिन्याला वरचढ यामुळे गडहिंग्लककरांची मागणी सर्वच संघाकडून असते.
यंदा सुल्तान शेख, सूरज कोंडूस्कर, सूरज हनिमनाळे आणि साकिब मणियार हे चार खेळाडू पर्दापण करणार आहेत. बारा खेळाडूत युनायटेडचे सहा खेळाडू आहेत. या सर्वांच्या कामगिरीची उत्कंठा आहे. यावर्षी नोंदणी केलेल्या खेळाडूत निखिल खन्ना (बालगोपाल), सचिन बारामती (सोल्जर्स), ओमकार जाधव (प्रॅक्ट्रीस), सचिन मोरे (जुना बुधवार), सुरज कोंडूस्कर, सुरज हनिमनाळे (सम्राटनगर), आदित्य रोटे (फुलेवाडी), अमित सावंत, महेश जगताप (बीजीएम), अनिकेत कोले (झुंझार), सुल्तान शेख, साकिब मणियार (वाघाची तालीम) यांचा समावेश आहे. गेली दोन दशके कोल्हापूर फुटबॉल विश्वात स्थानिक बचावपटू शकिल पटेलने कौशल्यपूर्ण खेळाने दरारा निर्माण केला. केरळच्या संघाकडून आयलिग खेळल्यानंतर शकीलने खंडोबा, बालगोपाल, प्रॅक्ट्रिस संघातून चौफेर खेळाने छाप पाडली. त्याने आपल्या नेतृत्वाखाली कोल्हापूरला पहिल्यांदा आंतरजिल्हा स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून दिले. यंदा त्याने कोणत्याच संघाकडून नोंदणी न करता विश्रांतीला पसंती दिली.