पिडीत मुलीच्या न्यायासाठी आज गडहिंग्लज बंद
कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय : निषेध फेरी काढत बंदची माहिती
गडहिंग्लज :
शहरातील शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर काल झालेल्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गडहिंग्लज शहरात संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. शनिवारी दुपारी गांधीनगर हॉल येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत संबंधीत दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत उद्या रविवारी गडहिंग्लज बंदची हाक देण्यात आली आहे. रविवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर गडहिंग्लजकरांनी एकत्रित यावे असे आवाहन केले असुन त्यानंतर शहरात निषेध फेरी काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात शनिवारी सायंकाळी गडहिंग्लजकरांनी निषेध फेरी काढत बंदचे आवाहन केले. दरम्यान आमदार मुश्रीफ यांनीही सदर नराधमाला तत्काळ अटक करा अशा सुचना दिल्या आहेत.
शहरातील एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आल्यानंतर शहरातील नागरीकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी याप्रकरणी संशयीत शहजाद शेख (रा. शंभ्रपुर, उत्तरप्रदेश) आणि बरकतअली रईस पाशा (रा. गडहिंग्लज) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. बरकतअली याला अटक झाली असून शहजाद शेख हा अद्याप फरारी आहे. दरम्यान सदर मुलीची काल शुक्रवारी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बलात्कार झाल्याचे समोर आले. या मुलीनेही खरा घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. ही माहिती समजताच गडहिंग्लजात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होऊ लागल्या .
शनिवारी दुपारी गांधीनगर येथील गणेश मंगल कार्यालयात तातडीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा देण्याचा निर्णय जाहिर केला.
माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी गट, तट, पक्ष, जात, धर्म बाजूला ठेवून या मुलीला न्याय देण्यासाठी गडहिंग्लजकरांनी एकजूट दाखवावे असे आवाहन केले. अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करत पोलिस प्रशासन आणि वैद्यकीय कारभारावर टिका करत संशय व्यक्त केला.
दयानंद राठोड यांनी न्यायासाठी साऱ्या समाजाने मदत करावी असे आवाहन केले. हे प्रकरण दाबले गेल्यास आमचा समाज पुन्हा केवळ पालकांच्या भितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिल अशी भिती व्यक्त केली. महेश कोरी यांनी वैद्यकीय तपासणीचा हट्ट धरल्यानंतर या मुलीच्या संदर्भात घडलेला खरा प्रकार समोर आला आहे. याला राजकीय वास येत असून पोलिस आणि वैद्यकीय प्रशासनावर दबाव आणल्याचा संशय व्यक्त केला. एवढी मोठी घटना घडूनही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे याबाबत निषेध करत संताप व्यक्त केला. यावेळी सतिश हळदकर, आशा देवार्डे यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीला रामदास कुराडे, राजेश बोरगावे, प्रा. रमेश पाटील, संजय पाटील, सागर पाटील, मनोज पोवार, रविंद्र घोरपडे, काशिनाथ बेळगुद्री, बाळासाहेब भैसकर, गंगाधर हिरेमठ, विनायक काळगे, अमोल हातरोटे, सुनिता पाटील, प्रतिभा पाटील, समीर राऊत यांच्यासह शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उद्या रविवारी आठवड्याचा बाजार असतानाही कडकडीत बंद करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला. याला उपस्थितांनी पाठींबा देत बंद यशस्वी करण्याचे ठरवण्यात आले. तर तातडीने शहरात रॅली काढून निषेधाच्या घोषणा देत बंदचे आवाहन करण्यात आले.
पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणी नंतर आणि दिलेला फेरजबाब नोंदवून घेत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक सतिश होडगर यांनी दिली. तत्कालीन परिस्थितीनुसार संशयीतावर गुन्हा दाखल केला होता. आता चौकशीत वेगळी माहिती समोर आल्याने जादाची कलमे लावण्यात आली आहेत. गडहिंग्लज बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास हा बंद बेकायदेशीर असून कारवाईचा इशाराही त्यांनी बोलताना दिला.
संबंधितांना तत्काळ अटक करा : मुश्रीफ
पिडीत मुलीवरील बलात्काराचा प्रकरणाची गंभीर दखल आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली असून पोलिस निरीक्षक सतिश होडगर यांना संपर्क साधून संबंधीत नराधमाचा शोध लावून तत्काळ अटक करा असे सांगितले आहे. जलद न्यायालयात याची सुनावणी ठेवा अशा सूचनाही केल्या आहेत.
सारेच गहिवरले...
अल्पवयीन मुलीच्या संदर्भात घडलेल्या प्रकारानंतर माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी पिडीत कुटूंबाची भेट घेतली. मुलीला विश्वासात घेवून विचारणा केल्यानंतर त्या नराधमाने केलेल्या व्रुर घटनेची माहिती देताच उपस्थित सारेच गहिवरले. हा प्रकार समजल्यानंतर गडहिंग्लजकरानी एकजूट दाखवत पिडीतेला न्याय मिळेपर्यंत लढा द्यायचा निर्णय जाहिर केला.