लिबियात गद्दाफींच्या पुत्राची हत्या
घरात गोळ्या घालून हत्या; हल्लेखोर पसार : घटनेबाबत दावे-प्रतिदावे
वृत्तसंस्था/ त्रिपोली
लिबियाचे हुकुमशाही मुअम्मर गद्दाफी यांचे पुत्र सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांची हत्या करण्यात आली आहे. लिबियातील माध्यमांनुसार, चार अज्ञात हल्लेखोरांनी झिंटान शहरातील त्यांच्या घरात घुसून हल्ला केला. हल्ल्यापूर्वी त्यांच्या घरात बसवलेले सुरक्षा कॅमेरे निक्रिय करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूमुळे लिबियाच्या आधीच अस्थिर राजकीय परिदृश्यावर आणखी अनिश्चितता निर्माण झाली आहे.
2011 मध्ये वडिलांच्या राजवटीच्या पतनानंतर सैफ अल-इस्लाम राजकीयदृष्ट्या सक्रिय होते. देशातील सत्तासंघर्षात ते एक प्रमुख नेते म्हणून पुढे येत असतानाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. सैफ अल-इस्लाम गद्दाफी हे त्यांच्या वडिलांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होते. 1969 ते 2011 पर्यंत लिबियावर राज्य करणाऱ्या मुअम्मर गद्दाफीनंतर त्यांना देशातील सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्ती मानले जात होते.
सैफ अल-इस्लाम गद्दाफी यांच्या हत्येबाबत वेगवेगळे दावे समोर येत आहेत. तथापि, त्यांच्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तसेच माध्यमांनीही हत्या झाल्याचे वृत्त दिले. या घटनेबाबत वेगळाच दावा केला जात आहे. एका लिबियन टीव्ही चॅनेलने सैफ अल-इस्लामच्या बहिणीचा हवाला देत त्याचा मृत्यू लिबिया-अल्जेरिया सीमेजवळ झाल्याचे म्हटले आहे. सैफ अल-इस्लामच्या वकिलाने चार जणांच्या कमांडो पथकाने लिबियाच्या झिंटान शहरातील त्यांच्या घरावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचे म्हटले आहे. हल्लेखोरांची ओळख आणि त्यांचे पुरस्कर्ते अज्ञात आहेत, परंतु ही पूर्वनियोजित हत्या होती, असेही वकिलांनी म्हटले आहे.
1972 मध्ये जन्मलेल्या सैफ अल-इस्लामने 2000 पासून लिबिया आणि पाश्चात्य देशांमधील संबंध सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तथापि, 2011 मध्ये गद्दाफी राजवटीविरुद्धच्या उठावादरम्यान त्यांच्यावर सरकारविरोधी निदर्शने दडपण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप होता. गद्दाफांच्या मृत्यूनंतर झिंटान शहरातील एका प्रतिस्पर्धी मिलिशियाने त्यांना जवळजवळ सहा वर्षे तुरुंगात टाकले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने त्यांच्यावर मानवतेविरुद्धच्या गुह्यांचा आरोप लावत त्यांचा खटला चालवण्याची मागणी केली होती. 2015 मध्ये त्रिपोली न्यायालयाने त्याला अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, परंतु 2017 मध्ये पूर्व लिबियातील एका मिलिशियाने त्यांना माफी कायद्याअंतर्गत सोडले होते.