Gabh Win Film Awards: राज्य मराठी चित्रपट सोहळ्यात 'गाभ'ला दोन पुरस्कार
60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले
कोल्हापूर : कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विषय घेऊन याच मातीत इथल्याच कलाकारांनी निर्माण केलेल्या ‘गाभ’ या चित्रपटाने 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले. ‘गाभ’ या चित्रपटाला ‘कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे दोन पुरस्कार प्राप्त झाले.
वरळी (मुंबई) येथे मंगळवारी रात्री झालेल्या दिमाखदार सोहळ्यात दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि निर्माते मंगेश गोटुरे यांना प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करून गौरविले.
अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘गाभ‘ चित्रपटाला अंतिम फेरीतील 10 उत्कृष्ट चित्रपटांसह अंतिम फेरीतील 10 उत्कृष्ट दिग्दर्शक या गटातही नामांकन मिळाले होते. त्याचप्रमाणे प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक या गटात अनुप जत्राटकर यांना आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री या गटात अभिनेत्री सायली बांदकर हिलाही नामांकन मिळाले होते.
तथापि, चित्रपटाला कै. दादा कोंडके यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटासाठीचा आणि कै. अनंत माने यांच्या नावे असणारा उत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकासाठीचा, असे दोन महत्त्वाचे विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविले.
जत्राटकर, गोटुरे यांची 'तरुण भारत'ला भेट
कोल्हापूर :‘गाभ’ या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर व निर्माते मंगेश गोटुरे यांनी गुरूवारी तरूण भारत संवाद कार्यालयाला भेट दिले. तरूण भारत संवादचे विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. चर्चेदरम्यान त्यांनी 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात गाभ चित्रपटाला मिळालेल्या दोन पुरस्काराची माहिती दिली.
राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘गाभ’ या चित्रपटाला ‘कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ असे दोन पुरस्कार प्राप्त झाले.
या चित्रपटाच्या निर्मितीपासून ते पुरस्कारापर्यंतचा प्रवास दिग्दर्शक अनुप जत्राटकर आणि निर्माते मंगेश गोटुरे यांनी सांगितला. सर्व कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासह चित्रपटाशी संबंधीत सर्व घटकांमुळे हे यश मिळाले आहे, अशा भावना जत्राटकर यांनी व्यक्त केल्या. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर, वृत्तसंपादक विनायक भोसले होते.
हा तर ठरला ‘कोल्हापुरी’ योगायोग
सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट पुरस्कार ज्यांच्या नावे आहे, ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कै. अनंत माने कोल्हापूरचे, मंचावर पुरस्कार वितरण करण्यासाठी उपस्थित प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हेही कोल्हापूरचे आणि ‘गाभ’ या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे हेही कोल्हापूरचे! असा त्रिवेणी संगम या पुरस्काराच्या निमित्ताने 60 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जमून आला.