For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

व्यवसाय-व्यवस्थापनाचे भविष्य आणि भवितव्य

06:32 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
व्यवसाय व्यवस्थापनाचे भविष्य आणि भवितव्य

भविष्यवेत्ते-जोतिषी व कॉर्पोरेट-व्यवस्थापन क्षेत्र यांचा सकृतदर्शनी काय संबंध असावा असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र हा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच आजच नव्हे तर पिढीजात स्वरुपात व वर्षानुवर्षे व्यवस्थापन करणारे व त्यात यशस्वी होणारे उच्च व्यवस्थापक हे व्यवस्थापनाला पूरक अशी व्यवस्थापन पद्धती या स्वरुपात जोतिषी आणि ज्योतिषशास्त्र यांचा वापर कसा आणि कशा प्रकारे करतात हे पाहणे लक्षणीय ठरते.

Advertisement

या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यावसायिक कंपन्यांमध्ये विशेषत: वरिष्ठ वा जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्यांचे प्रत्यक्ष काम आणि कामगिरी यावरच कंपन्यांचा व्यवसाय आणि व्यावसायिक भविष्य अवलंबून असते. यामध्ये संबंधित व्यवस्थापकांचे ग्रह भविष्य यावर भर देण्याचा काही कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट रिवाजच प्रस्थापित झाला आहे.

या कंपन्यांच्या मते त्यांच्या पूर्वानुभवानुसार व्यवस्थापन स्तरावर उच्च पदांवर काम करणाऱ्या व्यवस्थापकांना व्यावसायिक निर्णय घेणे, व्यावसायिक नेतृत्व करणे, इतरांना मार्गदर्शन करणे, व्यावसायिक चाहुल घेऊन प्रकल्प नियोजन व त्याच्याशी निगडित आर्थिक गुंतवणूक इ. मोठे व महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे या मंडळींनी सक्षम-कार्यक्षम असणे व्यक्ती व व्यवस्थापन या उभय संदर्भात विशेषत: या उच्च पदांवर काम करणाऱ्यांची सर्वांगीण पडताळणी करणे आवश्यक ठरते.

Advertisement

व्यवस्थापक पदावर काम करण्यासाठी निवड करताना त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, पूर्वानुभव व संबंधित जबाबदारी घेण्याबद्दलची क्षमता याची योग्य चाचपणी वेळेत व योग्य प्रकारे करणे महत्त्वाचे ठरते. व्यवस्थापक म्हणून निवड करताना जोखीम घ्यावी लागते. अशा पदांवरील उमेदवारांची निवड करताना संबंधित उमेदवारांची पात्रता, पूर्वानुभव, विशेष कामगिरी इ.शी निगडित कागदपत्रे उमेदवारांजवळ असतात. त्यानुसार या मुद्यांची पुष्टी केली जाऊ शकते. मात्र त्यांच्या उमेदवारीशी निगडित व्यावहारिक, व्यक्तिगत पण महत्त्वपूर्ण अशा मुद्यांवरून उमेदवारांना पारखणे तेवढेच नव्हे बऱ्याचदा तर अधिक महत्त्वाचे ठरते. यासाठी सखोल व सविस्तर मुलाखत चर्चेपासून विस्तृत चर्चा, मानसशास्त्रीय चाचणी इ. पर्याय असतात व त्यांचा व्यावहारिक संदर्भात उपयोग केला जातो. या प्रस्थापित व पूर्वांपार उपायांच्या जोडीलाच संबंधित उमेदवारांची कुंडली अभ्यासून त्यांची उमेदवारी अर्ज केलेल्या पदासाठी योग्य वा सर्वात योग्य आहे अथवा नाही याची नेमकी पडताळणी करण्यावर मात्र काही कंपन्या व्यवस्थापन आवर्जुन भर देतात.

Advertisement

व्यावसायिक संदर्भात संबंधित व्यवस्थापकातर्फे प्रभावी संवाद व नेतृत्व या बाबी व्यवसाय आणि व्यवस्थापन या उभय संदर्भात महत्त्वाच्या व निर्णायक ठरतात. त्यामुळे व्यवस्थापनात व्यवस्थापक म्हणून विशेष जबाबदारीचे काम करणाऱ्या व्यक्तीकडे या निर्णय नेतृत्व विषयक आवश्यक असे व्यवहारगुण आहेत अथवा नाही याची पडताळणी ज्योतिषी आणि ज्योतिष्यांकरवी केली जाऊ शकते. यावर काही कंपन्यांचा अद्यापही विश्वास असल्याचे दिसून येते. या कंपन्यांचा व्यावसायिक अनुभव म्हणजे उच्च पदांवरील व्यवस्थापकांची निर्णयक्षमता, संवादक्षमता व आकलन शक्ती याची नेमकी माहिती व्यवस्थापनाला उपयुक्त ठरते.  व्यवस्थापनशास्त्र स्तरावर या ज्योतिषभविष्य आकलनपद्धतीला मान्यता प्रदान करण्यात आली नसली तरी ही पद्धत मानणाऱ्या अधिकांश कंपन्या व्यावसायिक संदर्भात यशस्वीपणे कार्यरत आहेत. हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

या संदर्भातील काही अनुभवी मंडळींच्या मते व्यवस्थापन रचनेत व्यवस्थापकांना त्यांचे सहकारी सहाय्यक व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सविस्तर माहिती असल्यास त्यामुळे त्यांच्या कामकाजावर त्याचा पूरक व सकारात्मक परिणाम होत असतो. कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील या माहितीमध्ये प्रामुख्याने संबंधित व्यक्ती वा कर्मचाऱ्याचा स्वभाव, परस्पर व्यवहार पद्धती, काम आणि कामाच्या संदर्भातील मानसिकता, प्रतिसाद पद्धती इ.शी निगडीत माहितीचा समावेश असतो. हे सारे मुद्दे कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या संदर्भात महत्त्वाचे असल्याने त्याचे आकलन वरिष्ठांनी करणे परस्पर फायद्याचे ठरते.

कंपनीअंतर्गत व्यक्तिगत स्तरावर कामकाज व करिअर विषयक प्रगती उन्नतीच्या संदर्भात भविष्य विषयक मुद्यांची मोठी व महत्त्वाची भूमिका राहू शकते अशी धारणा प्रचलित आहे. कर्मचाऱ्यांची प्रगती-उन्नती हे मुद्दे कंपनी व्यवस्थापनाच्या व्यवसाय वाढीसाठी महत्त्वाचे मुद्दे ठरतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे काम-कर्तबगारीला ज्योतिष-भविष्याची साथ मिळाली तर कर्मचाऱ्यांना एक प्रकारचे पाठबळ मिळू शकते. याशिवाय कर्मचारी-कंपनी या उभयतांचा त्याद्वारे फायदा होऊ शकतो.

सध्याच्या अस्थिर, स्पर्धात्मक व्यावसायिक परिस्थितीत विशिष्ट व कालबद्ध स्वरुपात आणि यशस्वीपणे काम करण्याला पर्याय नाही. अशा पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत स्तरावर अधिक प्रभावीपणे काम करणे गरजेचे असते. हे काम करण्यासाठी विशेषत: महत्त्वाच्या व जबाबदारीच्या पदांवर काम करणाऱ्यांची ग्रह-नक्षत्र स्थिती पाहून काम करण्याची पद्धत विशेषत: व्यक्तिगत वा कौटुंबिक मालकीच्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने प्रचलित आहे व याकामी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते.

कॉर्पोरेट क्षेत्रात विशेषत: मोठे व महत्त्वाचे निर्णय घेताना व त्यानंतर अशा महत्त्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी व्यवस्थापनातील मंडळींना विलक्षण ताण तणावाला सामोरे जावे लागते. त्यांच्यावरील मानसिक तणावाचा त्यांच्या कंपनीच्या निर्णयावर व  पर्यायाने कंपनी व्यवसायावरसुद्धा परिणाम होतो. याच व्यवसाय व्यवस्थापन प्रक्रियेचा एक भाग असतो व्यवसाय-व्यवस्थापनाशी संबंधित व या विषयाला साधक-बाधक असणाऱ्या धोरणात्मक प्रक्रियेचा. या महत्त्वाच्या बाबी व्यक्ती म्हणून व्यवस्थापकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे विशेष जबाबदारीसह व महत्त्वपूर्ण बाबींच्या पदांवर काम करणाऱ्यांच्या मानसिकतेचा पडताळा त्यांच्या राशी भविष्यासह केला जाऊ शकतो व ही पद्धत काही कंपन्यांमध्ये अजूनही पाळली जाते.

आर्थिक मुद्दे व व्यवस्थापन हे मोठे जोखमीचे व महत्त्वाचे असते. व्यवस्थापनाच्या वतीने व्यावसायिक गुंतवणुकीपासून बँकिंग व्यवहार, खरीददारी, भविष्यकालीन आर्थिक तरतूद व त्यासाठीचे निर्णय घेणाऱ्या व या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेशी संबंधित व्यवस्थापकाची व्यावहारिक चाचपणी ज्योतिषी पद्धतीच्या आधारे करण्यावर काही कंपन्यांमध्ये भर दिला जातो व त्याचा फायदेशीर अनुभव येत असल्याचे या कंपनी व्यवस्थापनांद्वारा आवर्जुन नमूद केले जाते. एवढेच नव्हे तर या प्रक्रियेकडे आर्थिक जोखमीचे वेळेत नियोजन करण्याची पूर्वापार पद्धत म्हणून पाहिले जाते.

प्रत्येक व्यवस्थापन पद्धतीत व्यक्तिगत व परस्पर संबंध सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. व्यावसायिक संबंध हे कामाच्या संदर्भात अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ कनिष्ठ, व्यवस्थापक सहकारी तर व्यवसायात ग्राहक, पुरवठादार, गुंतवणूकदार, भागधारक, शासन प्रशासनातील अधिकारी, व्यावसायिक संस्था इ.शी नेहमी व कुठल्या ना कुठल्या स्वरुपात होतच असतो. हे संबंध अधिक चांगले, परस्परांशी सहकार्यावर आधारित व व्यवसायपूरक राखण्यासाठी हे गुण असणारी व्यक्ती व्यवस्थापक म्हणून निवडण्यासाठी त्यांची नेमणूक-निवड करताना त्यांची संभाव्य संबंध शैली पडताळून पाहिली जाते.

कंपनी स्तरावर व्यवस्थापन आणि व्यवस्थापक या उभयतांमध्ये समन्वय, सामंजस्य व एकजिनसीपणा या बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. या बाबी प्रभावीपणे असण्यावरच संबंधित कंपनी व्यवसायाचे यश अवलंबून असते. यासाठी नव्याने व्यवस्थापकांची निवड करण्यापासून कुणाची व्यवस्थापक वा अन्य जोखमीच्या व जबाबदारीच्या पदावर निवड करताना संबंधितांचे कामकाज अनुभव यांच्या जोडीलाच त्यांचे गुणमीलन होते अथवा नाही याचा पण अभ्यासपूर्ण कानोसा घेतला जातो. यामुळे असे उमेदवार कंपनीत दीर्घ काळासाठी राहतील अथवा नाही याची कल्पना व्यवस्थापनाला येऊ शकते. याचे कंपनीला विविध स्वरुपात व दीर्घगामी स्वरुपाचे फायदे होऊ शकतात, असा अनुभव आहे.

आर्थिक सेवा क्षेत्रात व विशेषत: कंपनीच्या मालकांकरवी ज्या कंपन्यांचे थेट व प्रत्यक्ष व्यवस्थापन पाहिले जाते अशा कंपन्यांमध्ये तर व्यवस्थापकपदी उमेदवारांची अंतिम निवड करताना उमेदवारांची पात्रता-योग्यता जोतिष्याच्या आधारावर पडताळून पाहण्याचा अलिखीत पायंडा पडला आहे. या कंपन्यांमध्ये ही निवड पद्धती वर्षानुवर्षे पाळली जात आहे. त्यामुळे कंपनीची व्यवस्थापक निवड प्रक्रिया अधिक बळकट प्रभावी होऊन पात्रताधारक उमेदवारांमधून योग्य उमेदवारांची निवड आम्ही वरिष्ठ पदांवर अधिक खात्रीशीर प्रकारे करू शकतो असा या कंपन्यांचा अनुभव आहे.

दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
×

.