फर्निचर व्यावसायिक कंपनी आयकियाची पुण्यात होणार शोरुम
व्यवसाय विस्तारावर भर : 37 हजार चौ. फू. जागा घेतली
पुणे :
फर्निचरच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी आयकिया आता त्यांची नवी शोरुम पुण्यामध्ये सुरू करणार आहे. याकरिता कंपनीने 37,259 चौरस फूट इतकी जागा भाडेतत्त्वावर घेतली असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. यायोगे भारतीय बाजारामध्ये आयकिया आपला व्यवसाय विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनेला गती देत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आयकिया इंडिया यांच्यासाठी पुणे ही मोठी बाजारपेठ मानली जात आहे. ऑनलाइनवर आयकियाला विविध फर्निचर व यावर आधारीत वस्तुंची ग्राहकांची मागणी अधिक आहे. हे लक्षात घेऊन पुण्यामध्ये लोहगाव विमाननगर रोडवर फिनिक्स मार्केट सिटीजवळ वरील सदरची वर उल्लेखीत केलेली जागा 4 वर्ष आणि 11 महिन्यांच्या भाडेतत्त्वावर कंपनीने घेतलेली आहे. आयकिया इंडिया सुरुवातीला 38.12 लाख रुपये प्रति महिने भाडे भरणार आहे.
पुण्यात पहिली शोरुम
आयकिया इंडियाने जानेवारी 2020 मध्ये पुण्यात आपल्या ई-कॉमर्स व्यवसायाची सुरुवात केली होती. प्रत्यक्ष स्टोअर सुरू करण्याआधी कंपनीचा व्यवसाय हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीवर कार्यरत होता. त्या मार्फत ग्राहक आपल्या वस्तू मागवत होते. पण आता प्रत्यक्ष शोरुमच्या माध्यमातून पुण्यातील ग्राहकांना त्यांचे फर्निचर प्रत्यक्ष पाहून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.