येळ्ळूर स्मशानभूमीत अपुर्या प्रकाशामुळे मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार
ग्राम पंचायतीचे हायमास्ट दुरुस्तीकडे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये तीव्र संताप
वार्ताहर/येळ्ळूर
येळ्ळूर स्मशानभूमीत अपुऱ्या प्रकाशामुळे मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. अशा ठिकाणी एवढे दुर्लक्ष होतेच कसे, हा प्रश्न नागरिकांनी अंत्यसंस्कार करताना विचारणा केली आहे. स्मशानभूमीत प्रकाशासाठी हायमास्टची सोय असूनही त्यावर ट्यूब नसल्याने सायंकाळ होताच स्मशानात अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे मिणमिणत्या प्रकाशात नागरिकांना मोबाईल बॅटरीचे सहाय्य घेत अंत्यविधिचा कार्यक्रम उरकावा लागतो. स्मशानसभोवती झाडा झुडपांचे साम्राज्य असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे मंदप्रकाशात नागरिकांना पावले जपून टाकावी लागतात. अंत्ययात्रेसाठी बाहेरगावाहून पाहुणे मंडळी येतात. त्यात महिलावर्गाचाही भरणा मोठा असतो. त्यांच्यावर दु:खाचे सावट असताना या अंधाऱ्या जागेत त्यांना जपून ये जा करावी लागते.
हायमास्ट बंद अवस्थेत
हायमास्टसाठी ग्रा.पं.च्या माध्यमातून हजारो रुपये खर्ची पडले असूनही नागरिकांना स्मशानात उजेड मिळत नाही ही गावच्या दृष्टीने शोकांतिका आहे. देखभाल दुरुस्तीसाठी खर्चाची तरतुद होत नसेल तर हे गावचे दुर्दैव म्हणावे लागेल. हा हायमास्ट बंद पडून जवळपास तीन चार महिने झाले आहेत. दुरुस्तीसाठी याआधी ग्रा.पं.कडे विचारणाही केली होती. पण अजून ग्रा.पं. व अधिकारी वर्गाचे डोळे उघडले नाहीत. आतातरी ही समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.
संबंधितांनी पाहणी करून उजेडाची सोय करावी
स्मशानात जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने व दोन्ही बाजुला झाडा झुडपांचे साम्राज्य व खड्डा असल्याने नजरचुकीने त्यात पडण्याच्या शक्यतेमुळे अंत्ययात्रेला जाताना व येतानाही जपून ये जा करावी लागते. त्यामुळे रात्रीच्या वेळी भरपूर प्रकाश असणे गरजेचे असताना नागरिकांना मात्र मोबाईल बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. या गैरसोयीकडे ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि पीडीओसारख्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून उजेडाची सोय कायम ठेवावी, अशी चर्चा सुरू आहे.