कुंभमेळ्यात बळी गेलेल्या वडगावच्या मायलेकींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
बेळगाव : उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीत बळी पडलेल्या नाझर कॅम्प, येळ्ळूर रोड, वडगाव येथील मायलेकींच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी पुण्यस्नानासाठी बेळगाव येथील भाविक प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर पोहोचले होते. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्ली येथून विमानाने दोन मृतदेह गुरुवारी सायंकाळी सांबरा विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर वडगाव येथील मायलेकींचे मृतदेह गोवामार्गे मध्यरात्री 12 नंतर बेळगावला पोहोचले.
सिव्हिलमध्ये उत्तरीय तपासणी
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पहाटे दोन्ही मृतदेहांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. एपीएमसी पोलिसांनी यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर ज्योती दीपक हत्तरवाट (वय 50), त्यांची मुलगी मेघा (वय 24) या दोघा जणांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पाळीव कुत्र्यानेही घेतले अंत्यदर्शन
दोन्ही मृतदेह वडगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यावेळी पाळीव कुत्र्यानेही या मायलेकींचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर शहापूर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण कोपर्डे (वय 61) रा. शेट्टी गल्ली यांच्यावर गुरुवारी रात्रीच सदाशिवनगर स्मशानभूमी येथे तर महादेवी बावनूर-संकनगौडर (वय 48) यांच्यावर हुबळी तालुक्यातील नुलवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.