काचेच्या कबरीत अंत्यसंस्कार
प्रत्येक मानव समुदायाची, त्या समुदायातील मृतांवर अंतिम संस्कार करण्याची पद्धती भिन्न भिन्न आहे. काही अंत्यसंस्कार पद्धती आश्चर्यकारक आहेत. अशीच एक पद्धती आहे, काचेच्या कबरीत अंत्यसंस्कार करण्याची. ही प्रथा चीनमधील असून ती बऱ्याच पूर्वीपासूनची आहे, असे प्रतिपादन करण्यात येते. काचेच्या कबरीत मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्याने संपूर्ण मृत शरीर सर्वांना दिसून येते. इतकेच नव्हे, तर जसशसे मृतदेहाचे विघटन होत जाते, तसतसे तेही लोकांना दिसून येते. त्यामुळे अनेक कबरींमध्ये केवळ मृतदेहांचे अस्थिपंजर झालेले दिसून येतात. त्यामुळे या स्मशानभूमीतील दृष्य अक्षरश: भीतीने गाळण उडविणारे, किंवा अंगावर काटा आणणारे असते, असे ही स्मशानभूमी प्रत्यक्ष पाहून आलेल्या लोकांचे म्हणणे असते. तथापि, चीनच्या ज्या समुदायात ही प्रथा आहे, त्या समुदायाला ती अत्यंत पवित्र वाटते. या समुदायात आणखी एक प्रथा अशी आहे, की पती आणि पत्नी यांचा मृत्यू जवळपासच्या काळात झाल्यास त्यांचे मृतदेह एकमेकांच्या शेजारीच काचेच्या कबरीत पुरले जातात. पुढच्या जन्मातही त्यांना एकमेकांचा सहवास लाभावा, हा हेतू यामागे असतो, अशी माहिती देण्यात येते.
अशा प्रकारच्या पारदर्शी कबरी या समाजात प्रेम, सन्मान आणि कृतज्ञतेचे प्रतीक मानल्या जातात. मृतदेह कधीही लपवू किंवा झाकून टाकू नयेत. मृत व्यक्ती जिवंत असताना त्यांचे ज्या स्वरुपात लोकांना दर्शन होत होते, त्याच स्वरुपात ते त्यांच्या मृत्यूनंतरही झाले पाहिजे, अशी या लोकांची श्रद्धा आहे. या लोकांना ही परंपरा पवित्र आणि सन्मानजनक वाटत असली, तरी इतरांना मात्र, ती अत्यंत विचित्र वाटते. अनेक विदेशी पर्यटक चीनमध्ये आल्यानंतर ही स्मशानभूमी पाहण्यासाठी जातात. तेथील छायाचित्रे सोशल मिडियावर पोस्ट करतात. सोशल मिडियावरही ही अद्भूत स्मशानभूमी असंख्य लोकांनी पाहिल्याचे दिसून येते.