जोतिबा विकास आराखड्यासाठी निधीचा दुष्काळ
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर आणि वाडी रत्नागिरी गावासह परिसरातील गावांचा विकास व्हावा, यासाठी श्रीक्षेत्र जोतिबा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाद्वारे संपूर्ण परिसराच्या विकासासाठी 1 हजार 816 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे चार टप्प्यांत परिसराचा विकास केला जाणार आहे. जोतिबा मंदिर, परिसराचा विकास करताना वाडीरत्नागिरी हे गाव नव्याने वसवण्यात येणार आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार आहे. शासनाकडून हा आराखडा तयार केला असला तरी नुकत्याच सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही.
जोतिबा विकास आराखड्यामध्ये संपूर्ण परिसरात वृक्षलागवड, बर्ड पार्क, सुशोभीकरण, यात्री निवास, भाविकांना विविध सुविधा आदींचा विकास केला जाणार आहे. देवस्थानसह परिसरातील सुमारे 8 ते 9 हजार एकर जमिनीवर प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकासकामे केली जाणार आहेत. टप्प्याटप्याने प्राधिकरण अस्तित्वात येणार आहे. शासनाने जोतिबा मंदिर विकासासाठी पहिल्या टप्प्यात आराखडा तयार केला असला तरी त्यासाठी आवश्यक निधीची पुर्तर्ता करून तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर मंदिर विकास कधी होणार अशी विचारणा भाविकांतून होत आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थान आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या उद्देशाने विकास आराखडा तयार करण्यात आला. जोतिबा देवस्थानसह परिसरातील 23 गावांचा समावेश असलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विकास आराखड्याबाबत स्पर्धा घेण्यात आली, त्याद्वारे जोतिबा देवस्थानचा एकात्मिक विकास आराखडा अंतिम करण्यात आला आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. या आराखड्यामध्ये जोतिबा डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सोयी सुविधांचा विचार केला जाणार आहे. या परिसरातील 23 गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन रोजगार निर्मितीला चालना देऊन गावांच्या वैशिष्ट्यांचा विचार करून त्याचा प्रचार प्रसार करा, जेणेकरून जोतिबा डोंगर परिसरातील या गावांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल, पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्याचा विचार आराखडा तयार करताना केला आहे. हा आराखडा यापूर्वी शासनाला सादर केला होता. त्याची रक्कम 1530 कोटी रुपये होती. या आराखड्यात काही सुधारणा केल्यामुळे सुधारित आराखडा सध्या 1816 कोटी रकमेचा झाला आहे.
- आराखड्यात अपुऱ्या सुविधांचा विचार, आता प्रतिक्षा प्रत्यक्ष विकासाची
वाडीरत्नागिरीची सध्याची लोकसंख्या 6,300 इतकी आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबाच्या दर्शनासाठी महिन्याला लाखो भाविक येतात. कोल्हापूर शहर आणि परिसरातून दर रविवारी जोतिबाला हजारो भाविक जात असतात. एकूणच वर्षभर या ठिकाणी येणारे भाविक, त्यांची वाहने, त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा, भविष्यात होणारी गर्दी आणि अपुऱ्या सुविधा यांचा विचार करून हा आराखडा तयार केला आहे. डोंगरावर फेब्रुवारी ते मार्च दरम्यान रविवारी होणारे पाच खेटे, चैत्र यात्रेच्या आधी तीन दिवस, मुख्य यात्रा आणि नंतरचे तीन दिवस, चैत्र महिना, पाकाळणी यात्रा, उन्हाळी सुटी, श्रावण षष्ठी यात्रा, नगर प्रदक्षिणा, दसरा, दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा, पौर्णिमा, अन्य शासकीय सुट्यांच्या काळात जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठीच्या या आराखडा मंजूर होऊन प्रत्यक्ष विकास कधी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- पहिल्या टप्प्यातील नियोजित विकासकामे
दक्षिण दिग्विजयोत्सव मैदान, दुकान गाळ्यांसहित खुला रंगमंच नवे तळे परिसरात 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती, शासकीय निवासस्थान, नियोजित अन्नछत्र ज्योतीस्तंभ व ध्यानधारणा केंद्र, केदार विजय उद्यान दर्शनरांग सुविधा केंद्र आणि पाणपोई वाहनतळ माहिती केंद्र, विविध तलाव आणि मंदिरांची सुधारणा केल्या जाणार आहेत. पण शासनाकडून त्यासाठी आवश्यक निधीची तत्काळ पुर्तता करणे अपेक्षित आहे.
- वर्षभरात 1 कोटी 31 लाख भाविकांनी घेतले जोतिबाचे दर्शन
गेल्या वर्षभरात सोमवार ते शनिवार 16 लाख 64 हजार भाविक डोंगरावर आले. प्रत्येक रविवारी 16 लाख, यात्राकाळात 42 लाख 75 हजार, उत्सवकाळात 32 लाख, अन्य दिवशी 24 लाख 45 हजार असे वर्षभरात एकूण 1 कोटी 31 लाख 84 हजार भाविक जोतिबा दर्शनासाठी डोंगरावर आले.
- आराखड्यातील समाविष्ट बाबी
भाविकांसाठी अन्नछत्र, यात्री निवास त्यासाठी स्वतंत्र न्यासाची स्थापना. अकरा मारुती, नगर प्रदक्षिणा मार्गाचा विकास. जोतिबा ते पन्हाळा रोप वे, हरितपट्टा, जंगल संवर्धन केले जाणार आहे.