महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पथदीपांसह इतर समस्या सोडविण्यासाठी निधी मंजूर

10:40 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत ठराव : 15 व्या वित्त आयोगातून शहरातील प्रत्येक वॉर्डाला विशेष निधी मिळणार 

Advertisement

बेळगाव : शहरातील समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक सोमवारी घेण्यात आली. अध्यक्षा वाणी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये 1 ते 7, 8 ते 15, 23 ते 30 प्रभाग क्रमांकांतील पथदीपांची समस्या सोडविण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून त्याला सर्वांनुमते मंजुरी दिली गेली. 1 ते 7 प्रभागांसाठी 9 लाख 16 हजार, 8 ते 15 प्रभागांसाठी 10 लाख 72 हजार आणि 23 ते 30 प्रभागांसाठी 10 लाख 20 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याचबरोबर शहापूर येथील महात्मा फुले रोडवरील पथदीप व इतर दुरुस्तीसाठी 6 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्यासाठी सर्वांनी बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे. आरपीडी क्रॉस ते रेल्वेओव्हरब्रिजपर्यंत विशेष निधी देण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले. पथदीप तसेच वाहिन्यांची दुरुस्ती करण्याबाबत व नवी केबल घालण्याबाबत चर्चा झाली. त्याला सर्वांनीच मंजुरी दिली.

Advertisement

पाणी समस्या सोडविण्यासाठी लक्ष देण्याची सूचना

पावसाअभावी शहरामध्ये पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे. शहरामध्ये एकूण 786 कूपनलिका खोदाई करण्यात आल्या आहेत. त्या कूपनलिकांचे हस्तांतर महापालिकेकडे करण्यात आले आहे. मात्र अनेक कूपनलिकांना विजेची जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने वीजजोडणी करावी, अशी मागणी बैठकीत नगरसेवकांनी केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अजूनही काही कूपनलिकांचे हस्तांतर करण्यात आले नाही, असे सांगितले. मात्र एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हस्तांतर केल्याचे सांगितले. यामध्ये बराच गोंधळ उडाला. एकूणच या बैठकीमध्ये विविध समस्यांमुळे नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांची कमतरता

शहराचा विस्तार वाढत चालला आहे. पाणी समस्या असू दे किंवा ड्रेनेजची समस्या, ती लवकर सुटणे अवघड झाले आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे सध्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे. काही ठिकाणी केवळ तीन वॉर्डांना दोनच कर्मचारी काम करत आहेत. तेव्हा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबत प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

महानगरपालिकेतील जनरेटर खराब

महानगरपालिकेत सध्या असलेला जनरेटर दुरुस्तीला आला आहे. महापौर शोभा सोमणाचे या बैठक घेत असतानाच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे आम्हाला मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत बैठक घ्यावी लागली. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी जनरेटरची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, असे सांगितले. मात्र कधीपासून बिघाड झाला आहे, असा प्रतिप्रश्न नगरसेवकांनी केला. नवीन जनरेटर घेण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर त्याला मंजुरीही देण्यात आली.

महानगरपालिकेच्या आवारातील पथदीपांची दुरुस्ती

महानगरपालिकेच्या आवारामध्ये अनेक पथदीप बंद असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. काही ठिकाणी जुने पथदीप आहेत. ते बदलणे गरजेचे आहेत. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांनीच बैठकीमध्ये अध्यक्षांकडे केली. त्यानंतर तातडीने त्याला मंजुरीही देण्यात आली. बैठकीला महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, इतर नगरसेवक, उपायुक्त उदयकुमार तळवार, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, कायदा सल्लागार अॅड. महांतशेट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

लवकरच वॉर्डांना निधी मिळण्याची शक्यता...

15 व्या वित्त आयोगातून शहरातील प्रत्येक प्रभागाला विशेष निधी मिळणार आहे. येत्या काही दिवसांत निधी दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे निधीमधून समस्या सोडविता येतील. मात्र लवकरच तो निधी मिळावा, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article