For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजगाव , सोनुर्लीसाठी ३४ लाखांचा निधी मंजूर

03:31 PM Mar 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माजगाव   सोनुर्लीसाठी ३४ लाखांचा निधी मंजूर
Advertisement

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांचा विकासकामांचा धडाका

Advertisement

न्हावेली /वार्ताहर

माजगाव पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच विकासकामांचा धडाका लावला असून माजगाव आणि सोनुर्ली येथील विविध कामांसाठी तब्बल ३४ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.त्यांच्या या कार्यतत्परते बद्दल संपूर्ण मतदारसंघातून त्यांचे कौतुक होत असून जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे.जितेंद्र गावकर हे माजगाव पंचायत समिती मतदारसंघातून प्रचंड बहुमताने निवडून आले होते.जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वासाची परतफेड केवळ विकासकामांच्या माध्यमातूनच होऊ शकते.या भावनेतून त्यांनी अवघ्या दोन महिन्यांच्या कार्यकाळात निधी खेचून आणण्यात यश मिळविले आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी असलेले थेट संबंध आणि जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यातून त्यांनी हा निधी मंजूर करुन आणला आहे.सोनुर्ली येथील माऊली मंदिरासमोरील जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक बनली होती.विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता या इमारतीच्या वर्गखोल्या निर्लेखित करुन त्या ठिकाणी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी श्री.गावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली होती.त्यातून शाळेच्या या नवीन इमारतीसाठी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.शाळेसोबतच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.यामध्ये माजगाव गावातील दळवी दुकान ते म्हालटकर वाड्यापर्यत जाणाऱ्या जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.या दोन्ही महत्वाच्या कामांमुळे श्री.गावकर यांनी आपल्या कामाचा झंझावात सुरु केला असून येणाऱ्या काळात माजगाव सोनुर्ली आणि वेत्ये या तिन्ही गावामध्ये जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करुन गावाचा सर्वांगीण विकास साधण्यावर आपला भर राहिल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.