खोची ते नरंदे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
खोची प्रतिनिधी
अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या हातकणंगले तालुक्यातील खोची ते नरंदे या पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.खोची ते नरंदे दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती.
तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी रहदारीचा आणि सोयीचा मार्ग असल्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती.अशी माहिती हातकणंगले तालुका भाजपा अध्यक्ष पाटील यांनी दिली.
या मागणीची दखल घेत माजी आमदार अमल महाडिक यांनी जुलै महिन्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत या रस्त्यासाठी निधी देण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. दुरुस्ती अभावी रस्त्यावरील वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू असून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे,ही बाब महाडिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खोची ते नरंदे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल १ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी माजी आमदार अमल महाडिक यांचे आभार मानले आहेत.