For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अष्टावधानी अध्यापक

06:41 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अष्टावधानी अध्यापक
Advertisement

प्रत्येक विद्यार्थ्याची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न भिन्न असते. शिक्षकाला याची जाण हवी. एकच उदाहरण किंवा दाखला सर्व विद्यार्थ्यांना समजत नाही, हेही लक्षात घ्यावं लागतं. ज्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे असे शिक्षक असतात. पण प्रस्तुत करण्यात ते कमी पडताहेत. संवाद, संभाषण कौशल्य नसल्यामुळे अध्यापन नीरस, कंटाळवाणं होतं. हा नीरसपणा टाळता यायला हवा. त्यासाठी प्रयत्न आणि अभ्यासाची गरज असते. आपलं शिकवणं एकसूरी, कंटाळवाणं होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. नर्म विनोदाचा शिडकावा करता यायला हवा.

Advertisement

इदं मे ब्रह्म क्षत्रं चोभे श्रियमश्नुताम् ।

मयि देवा दधतु श्रियमुत्तमां तस्यै ते स्वाहा ।।

Advertisement

(माझं ज्ञान खूप बहरो, फुलो, माझी शक्ती खूप वाढो. विश्वात विख्यात होवो आणि हे प्रभू मला कीर्ती, धन, ऐश्वर्य प्राप्त होवो जे मला तुझ्याच चरणी अर्पण करायचे आहे.)

ही आहे एक वैदिक प्रार्थना. किती विशाल, उदार आणि अर्थपूर्ण. वर्गात प्रवेश करताना प्रत्येक शिक्षकाने मनातल्या मनात स्वत:साठी तर म्हणावीच. पण वर्ग आरंभ करण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांकडून नीट अर्थ समजून आणि समजावून म्हणवून घेतली तर अध्ययन-अध्यापनाची गुणवत्ताच एका वेगळ्या उंचीवर जाईल. अशा अध्ययन-अध्यापनाची फलनिष्पत्ती निश्चितपणे अधिक असेल.

आज आपल्याला अमुक पाठ्यांश ‘संपवायचाय’ एवढ्याच मर्यादीत हेतूने अनेक शिक्षक वर्गात प्रवेश करत असतात. पाठ्यांश पुरा करायचा हाच एकमेव उद्देश त्यांच्या डोळ्यांसमोर असतो. इतर कोणत्याही गोष्टी दिसतच नाहीत. आपल्या परीने भरपूर तयारी करून हे शिक्षक विद्यार्थ्यांच्या डोक्यात लवकरात लवकर कसं कोंबता येईल या घाईत असतात.

पण शिकणं-शिकवणं ही दिसते तितकी सरळ सोपी प्रक्रिया नसते. ती अत्यंत नाजूक प्रक्रिया असते. काहीशी गुंतागुंतीचीही असते. काही घटक दिसत असतात. पण न दिसणारे घटकच अधिक असतात. डोळ्यांना दिसणारे घटक कमी. चर्मचक्षूंना न दिसणाऱ्या अनेक आंतरक्रिया दिसण्यासाठी मन:चक्षू, प्रज्ञाचक्षू लागतात. ही दृष्टी ज्या शिक्षकापाशी असेल त्याची अध्यापन पद्धती प्रभावी ठरेल.

अमेरिकन जर्नलमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रियेबद्दल गमतीदार पण मार्मिकपणे म्हटलं आहे, ‘ही एक अशी गूढ प्रक्रिया आहे जिच्यामध्ये प्राध्यापकांच्या वहीतली माहिती पेनाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या वहीत स्थलांतरीत होते. दोघांच्याही डोक्यात काही जात नाही.’ हा फक्त विनोद नाही. गांभीर्याने बघण्याची बाब आहे.

दिसणारे आणि न दिसणारे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतले घटक शिक्षकाने विचारात घ्यायला हवेत. आपण जशी अष्टभूजा देवीची पूजा करतो तसेच शिक्षकानेही अष्टावधाने सांभाळायला हवीत.

शिक्षक अष्टावधानी हवाच!

शिक्षकासाठी वर्गातील चाळीस मिनिटं किंवा एक तास ही तारेवरची कसरत असते. अनेक गोष्टींची जाण, भान, व्यवधान, अवधान सांभाळलं गेलं तर शिकण्या-शिकवण्याची प्रक्रिया यशस्वी होऊ शकते. वर्ग व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. ठरावीक वेळेत, ठरवलेला पाठ्याघटक, नेमकी उद्दिष्टं पूर्ण करत प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता लक्षात घेत शिकवणं ही साधी सोपी गोष्ट नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची, समजून घेण्याची पद्धत वेगळी असते. काही विद्यार्थी बघून अधिक शिकतात, तर काहीजण ऐकून अधिक चांगलं समजू शकतात. काहींना कृतीद्वारेच समजू शकतं. म्हणून शिक्षकाला आपल्या अध्यापनात या सर्व पद्धतींचा अंतर्भाव करावा लागतो. हे किती कठीण काम आहे याची जाणीव शिक्षकाव्यतिरिक्त कोणाला असण्याची शक्यता फार कमी. सगळ्याच शिक्षकांनाही याचं अवधान असत नाही.

वर्गात शिक्षकांच्या समोर बसलेले तीस-चाळीस विद्यार्थी स्वतंत्र अनुभव घेऊन आलेले असतात. प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि स्तर भिन्न भिन्न असतात. शिक्षकाला याची जाण हवी. एकच उदाहरण किंवा दाखला सर्व विद्यार्थ्यांना समजत नाही, हेही लक्षात घ्यावं लागतं. ज्यांच्याकडे भरपूर माहिती, ज्ञान आहे असे शिक्षक असतात. पण प्रस्तुत करण्यात ते कमी पडतात. संवाद, संभाषण कौशल्य नसल्यामुळे अध्यापन नीरस, कंटाळवाणं होतं. त्यासाठी प्रयत्न आणि अभ्यासाची गरज असते. आपलं शिकवणं एकसूरी होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. शिक्षकाला आपण कोणत्या वेळी वर्गात जात आहोत याचीही जाणीव हवी. आपला तास सकाळी लवकर असणार की दुपार होता होता असणार हेही लक्षात घ्यायला हवं.

आपल्या विद्यार्थ्यांचं शब्दभांडार, शब्दसंपत्ती कशी आणि किती आहे हे माहीत असेल तर शिक्षकाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. शहरी, ग्रामीण, वनवासी भागातील विद्यार्थ्यांचं शब्द भांडवल सारखं असणार नाही, ही गोष्ट शिक्षकाने लक्षात घ्यायला हवी.

विद्यार्थ्यांची देहबोली जो शिक्षक ओळखू शकत नाही त्याचं अध्यापन प्रभावी होण्याची शक्यता खूपच कमी. शाळाशाळांतून फिरताना, वर्गात निरीक्षण करताना खूपदा दृष्य अत्यंत खराब दिसतं. शिक्षक आपल्या जागेवर उभं राहून तास संपेपर्यंत बोलत असतात. पण वर्गातील विद्यार्थ्यांच्या अनावश्यक हालचाली त्यांना दिसतच नाहीत. किंवा तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असतं. जांभया देणं, डेस्कवर डोकं टेकवून किंवा वाकून बसणं, कसले तरी चाळे करीत राहणं, आपसात बोलत राहणं, कुठेतरी नजर लावून बसणं अशा कितीतरी गोष्टी घडत असतात. आणि इकडे शिक्षक आपला धडा संपवण्याच्या घाईत. असा निर्विकार, ‘स्थितप्रज्ञ’ शिक्षक काय कामाचा?

सोप्याकडून कठीणाकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, जवळून दूर ही अध्यापनातील काही महत्त्वाची सूत्रं. या सूत्रांचा जाणीवपूर्वक, हेतूपूर्वक उपयोग शिकताना व्हायला हवा.

शिक्षक हाही माणूस आहे. त्याचं व्यक्तिगत, कौटुंबिक जीवन आहे. त्यामुळे त्याचेही प्रश्न, विवंचना असणारच. वर्गात जाताना हे सगळं ओझं बाहेर ठेवता आलं पाहिजे. हे सोपं नाही. पण ते बाहेर ठेवलं तरच अध्यापनात परिणाम दिसतील.

कोविडच्या काळात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. ऑनलाईन अध्यापन. ज्या शिक्षकाला स्वत:च्या अध्यापनात सुधारणा घडवून आणायच्या, स्वत:चं अध्यापन गुणवत्तापूर्ण करायचं त्यानं तंत्रज्ञानाची मदत घ्यायला हवी. काही शाळांमध्ये आणि वर्गातही कॅमेरे बसवलेले असतात. त्या कॅमेऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बहुतेक नकारात्मक असतो. हे कॅमेरे म्हणजे आपल्यावर हेरगिरी करण्यासाठी आहेत, अशी काहींची समजूत. याच कॅमेऱ्यांचा शिक्षक उपयोगही करून घेऊ शकतात.

आपले पाठ आपल्याच मोबाईलच्या मदतीने

रेकॉर्ड केले तर आपल्या अध्यापनातील गुण-दोष कमी कसे होतील हे पाहिलं तर शिक्षक स्वत:च स्वत:ला सुधारू शकतो. मीच माझा उद्धारकर्ता हा भाव हवा. आपण साधक आहोत याचा विसर न पडावा. माझं अध्यापनकार्य ही माझी साधना आहे, अशी प्रामाणिक भावना असेल तर विनोबा म्हणतात, ‘जेथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते,’ हा अनुभव येईल.

- दिलीप वसंत बेतकेकर

Advertisement
Tags :

.