नंदगड लक्ष्मीयात्रेसाठी पूर्ण सहकार्य करू!
खासदार विश्वेश्वर हेगडे यांची ग्वाही : समस्या सोडविण्याबाबत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना
वार्ताहर/नंदगड
नंदगड हे ऐतिहासिक प्रसिद्ध गाव आहे. 24 वर्षांनंतर ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा येत्या फेब्रुवारी महिन्यात भरणार आहे. यात्रेसाठी भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी गावात पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता व आरोग्य आदी सुविधा होणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी लक्षपूर्वक काम करावे. खासदार या नात्याने नंदगड गावची यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी आपणही संपूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी नंदगड येथे आयोजित केलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील होते.
व्यासपीठावर आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, नंदगड ग्रा.पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष पि. के. पाटील, ता. पं. कार्यकारी अधिकारी विलास राज, भाजपाचे खानापूर तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, जि. पं. माजी सदस्य जोतीबा रेमाणी व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.
स्वागत शंकर सोनोळी यांनी केले. माजी आमदार अरविंद पाटील यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. नंदगड गावातील विविध समस्या मार्गी लावाव्यात. नंदगड गावाला जोडणाऱ्या नागरगाळी-कटकोळ, खानापूर-तालगुप्पा, रस्त्यांची यात्रेपूर्वी दुरुस्ती करावी, असे आवाहन केले. खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी, यात्रा फेब्रुवारीत असली तरी ग्रामस्थांनी आतापासूनच मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. त्यामुळे ग्रामस्थांचे खासदारांनी अभिनंदन केले. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी ज्यादा अश्वशक्तीच्या ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करावी. स्वच्छता व आरोग्यासाठी आरोग्य खाते व ग्राम पंचायतीने आतापासूनच कामाला लागावे, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली.
आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, यात्राकाळात पाणी व वीज या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गावातील पाणी योजनेत सुधारणा करावी. गरज भासल्यास खासगी कूपनलिका मालकाकडून पाणी मिळत असल्यास पाणीपुरवठा खात्याच्या सहकार्याने ग्रा.पं.ने तशी व्यवस्था करावी. गावातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी रोहयोंतर्गत जास्तीत जास्त विशेष निधीची व्यवस्था करून देणार असल्याचे सांगितले. नंदगडच्या पश्चिमेला असलेल्या जलाशयाची वेळीच गळती थांबविल्यास यात्राकाळात पाण्याचा उपयोग ग्रामस्थांना होणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना गळती बंद करण्याबाबत बैठकीत सूचना केली.