विमान तिकीट 48 तासात रद्द केल्यास पूर्ण रिफंड
उ•ाण तारखेच्या 7 दिवस अगोदर बुकिंगची अट : डीजीसीएचे नवे नियम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नागरी उड्डाण क्षेत्राचे नियमन करणाऱ्या डीजीसीएने विमानाच्या तिकीट रिफंडच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता प्रवासी बुकिंगच्या 48 तासांच्या आत कुठलेही अतिरिक्त शुल्क न देता विमानाचे तिकीट रद्द किंवा बदलू शकतो. याकरता काही अटीही असणार आहेत. याकरता संबंधित तिकीट हे उड्डाणाच्या किमान 7 दिवसांपूर्वी बुक केलेले असणे आवश्यक आहे. तिकीट थेट एअरलाइनच्या वेबसाइटवरून बुक केले असल्यास प्रवासी बुकिंगच्या 24 तासांच्या आत चूक सांगत असल्यास एअरलाइनने नावातील चूक सुधारण्यासाठी कुठलेच अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे डीजीसीएने म्हटले आहे.
डीजीसीएच्या नव्या नियमांमुळे विमानप्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानुसार तिकीट रद्द करणे किंवा बदलण्याकरता 48 तासांपर्यंत कुठलेच अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. याचबरोबर तिकीट बुकिंगवेळी नावात झालेली चूक सुधारण्यासाठीही कुठलेच शुल्क आकारता येणार नाही.
ट्रॅव्हल एजंट किंवा पोर्टलकडून तिकीट खरेदी केलेले असल्यास रिफंडची जबाबदारी एअरलाइन्सची असेल, कारण एजंट त्यांचे प्रतिनिधी असतात. रिफंडची प्रक्रिया कामकाजाच्या 14 दिवसांमध्ये पूर्ण होईल हे एअरलाइन्सने सुनिश्चित करावे असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय आपत्कालीन स्थिती
याचबरोबर प्रवाशाच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमुळे तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. प्रवासी किंवा त्याच्या परिवाराचा सदस्य (जो त्याच पीएनआरवर आहे) प्रवासादरम्यान रुग्णालयात भरती होत असल्यास एअरलाइनला एक तर पूर्ण रिफंड द्यावा लागेल किंवा ‘क्रेडिट शेल’ची (जो नंतर वापरता येऊ शकेल) सुविधा द्यावी लागेल. अन्य आजारांप्रकरणी एअरलाइनच्या एअरोस्पेस मेडिसीन तज्ञ किंवा डीजीसीएच्या पॅनेलमध्ये सामील डॉक्टरच्या फिटनेस अहवालाच्या आधारावर निर्णय घेतला जाणार आहे.
इंडिगो प्रकरणाची पार्श्वभूमी
एअरलाइन तिकीट रिफंड वेळेत मिळत नसल्याच्या प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे डीजीसीएने नियमांमध्ये बदल केले आहेत. डिसेंबर 2025 मध्ये इंडिगोच्या अनेक फ्लाइट्स रद्द झाल्या होत्या, त्यावेळीही तिकीट रिफंडचा मुद्दा समारे आला होता. त्यावेळी नागरी उ•ाण मंत्रालयाने एअरलाइनला एका निश्चित कालावधीत रिफंड प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्देश दिला होता.