For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्ती

06:30 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्ती
Advertisement

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका महत्त्वाच्या आश्वासनाची पूर्ती ते सलग तिसऱ्यांदा देशाच्या नेतेपदी आल्यानंतर तीन महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. भारतातील 70 वर्षे वयाच्या वरील सर्व नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चाचा वैद्यकीय उपचार विमा विनामूल्य देण्यात येईल, असे ते आश्वासन आहे. ही योजना लागू करण्यात आल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली आहे. ही योजना आर्थिक स्थिती किंवा अन्य कोणताही निकष न लावता सर्व नागरिकांसाठी आहे. देशातील साधारणत: 6  कोटी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेची सविस्तर माहिती आता केंद्र सरकारने प्रसारित केली असून या माहितीवरुन या योजनेचे महत्त्व लक्षात येते. आयुष्मान भारत ही योजना यापूर्वीपासून क्रियान्वित करण्यात आलेली आहेच. या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत भारताचे जितके नागरिक येतात, त्यांच्या जवळपास 23 टक्के नागरिक 70 वर्षांच्या वरचे आहेत. त्यांच्यासाठी, विषेशत: त्यांच्यातील आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेतील लोकांसाठी ही योजना वरदान ठरु शकेल. ही योजना खर्चिक असली तरी ती ‘विनामूल्य रेवडीवाटपा’ सारखी नाही. अशा कल्याणकारी योजनांची गरीबांना आणि निम्नउत्पन्नगटातील लोकांना खऱ्या अर्थाने आवश्यकता असते. वृद्धापकाळी माणसाचे आरोग्य विषयक खर्च वाढलेले असतात पण पैसा मिळविण्याची क्षमता कमी झालेली असते किंवा नाहीशीच झालेली असते. आरोग्यविषयक अडचणी आणि आजारपणे याच वयात अधिक असतात. उत्पन्नाची बाजू कमजोर झालेली असल्याने इतरांवर बोजा बनून राहण्याची वेळ अनेकांवर येते. अशा स्थितीत आजारपण उद्भवल्यास पैशाअभावी आबाळ होण्याची शक्यता निश्चितच असते. अशा स्थितीतील नागरिकांना सन्मानपूर्व वैद्यकीय उपचार मिळावेत, एवढी क्षमता या योजनेत आहे. सध्या देशात साडेचार कोटी कुंटुंबांमधील साधारणत: सहा कोटी नागरिक 70 वर्षे वयाच्या वरचे आहेत. त्यांच्यात गरीब आणि निम्नउत्पन्न गटातील लोकांची संख्या 90 टक्क्यांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. हे सर्व लोक या योजनेचे लाभार्थी असतील. तसे पाहिल्यास आज खासगी क्षेत्रात अनेक आरोग्य विमा योजना क्रियान्वित करण्यात आलेल्या आहेत. तथापि, या योजनांचा लाभ वृद्धांना मिळत नाही. कारण त्यांना आजार होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांसंबंधीचा विमा दिल्यास ते अशी सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य विमा योजना आज उपलब्ध असल्या तरी 70 व्या वर्षानंतर या योजनांमध्ये प्रवेश दिला जात नाही. काही वैद्यकीय सेवा पुरवठादार कंपन्यांनी 70 वर्षांवरील वयाच्या लोकांसाठी वैद्यकीय विमा योजना आणल्या आहेत. मात्र, त्यांचे हप्ते मोठ्या रकमेचे असतात. ते गरीब आणि निम्नउत्पन्न गटातील लोकांच्या आवाक्याबाहेरचे असतात. साहजिकच ज्या वयात वैद्यकीय सेवा अधिकतम प्रमाणात आवश्यक असते, त्या वयात अनेकांना अशा सुविधांपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे केंद्र सरकारची ही योजना प्रभावीपणे लागू केल्यास अशा नागरिकांची मोठीच सोय होणार असून त्यांचा वृद्धापकाळातील एक महत्त्वाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटू शकतो. कुटुंबातील आजारी माणसांना त्यांच्या उपचारांचा खर्च परवडत नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढल्याची किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याची उदाहरणे अनेक आहेत. अशी वागणूक दिली गेलेल्या अनेक वृद्धांवर भीक मागून उदरनिर्वाह करण्याची वेळ येते. अशा स्थितीत वैद्यकीय उपचार मिळण्याचे स्वप्नही पाहता येत नाही. अशा व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना या योजनेमुळे मोठी सुविधा प्राप्त होऊ शकते. कोरोनाच्या उद्रेकानंतरच्या काळात अशा योजनेची आवश्यकता आणखीनच वाढली आहे, असे तज्ञांचे मत आहे. कारण ज्या वृद्धांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांची रोगप्रतिकार शक्ती क्षीण झालेली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोना काळानंतर असे वृद्ध आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आजार गंभीर स्वरुपाचा असेल तर त्यावरचे उपचारही महाग असतात. जवळपास 80 टक्के लोकांच्या ते आवाक्याबाहेरचे असतात, असेही सर्वेक्षणांमधून आढळून आलेले आहे. अशा स्थितीत ही योजना त्यांची जीवनायिनी सिद्ध होऊ शकते. आयुष्मान भारत योजना पाच वर्षांपूर्वी लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ 70 वर्षांवरील नागरिकांना आता देण्यात आला आहे. ज्या कुटुंबाचा सहभाग आयुष्मान भारत योजनेत पूर्वीपासून आहे अशा कुटुंबातील 70 वर्षांवरील वयाच्या सदस्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त संरक्षण दिले जाणार आहे. हे संरक्षण अशा वयोगटातील व्यक्तींसाठीच असून ते त्यांना आपल्या कुटुंबातील 70 वर्षांखालच्या सदस्यांशी वाटून घ्यावे लागणार नाही, अशीही सुविधा या योजनेतून देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका अटीची पूर्तताही करावी लागणार आहे. ज्या वृद्धांना केंद्र सरकारी आरोग्य विमा योजना (सीजीएचएस), माजी सैनिक आरोग्य विमा योजना (ईसीएचएस), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आयुष्मान योजना (सीएपीएफ) इत्यादी योजनांचा लाभ मिळत आहे, त्यांनी त्यांची जुनी योजना किंवा ही नवी योजना यांच्यापैकी एका योजनेची निवड करायची आहे. ही अट विनासायास पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे ती अवघड आहे असे म्हणता येणार नाही. एकंदर, केंद्र सरकारने एक अभिनंदनीय योजना क्रियान्वित केली आहे, असे म्हणता येते. अर्थात, ही योजना लागू करताना तिचा लाभ अपात्र नागरिकांकडून उठविला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. आपल्याकडे कोणत्याही सरकारी कल्याणकारी योजनेची घोषणा झाली, की तिचा गैरफायदा कसा उठविता येईल, याचा विचार त्वरित केला जातो आणि कालांतराने त्या योजनेची वाट लागते. तसे या योजनेसंबंधी होणार नाही, याची दक्षता प्रारंभापासूनच घ्यावी लागणार आहे. तरच, या व्यापक आणि महत्वाकांक्षी योजनेचा लाभ खऱ्या गरजवंतांना आणि पात्र व्यक्तींना मिळून ती सत्कारणी लागणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.