ध्येयासह पालकांची स्वप्नंही पूर्ण करा
कोल्हापूर :
आपल्या ध्येयाबरोबर पालकांची स्वप्नेही पूर्ण करा, असा सल्ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना दिला.
व्हिएतनाम येथील होचीझीन्ह येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अबॅकस-पामा ग्लोबल इंटरनॅशनल यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत विविध 28 देशातील 600 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. यामध्ये जिह्यातील विविध शाळांमध्ये शिकत असलेल्या व मास्टर एज्युकेशन अकॅडमी इचलकरंजीच्या 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चॅम्पियनशिप मिळवली. याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला व त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अबॅकसमध्ये एकाग्रता, चपळता व अचुकता दाखवून चॅम्पियनशिप मिळवली त्यानुसारच विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर शालेय विषयांमध्ये तसेच खेळ व कला प्रकारांमध्ये यश मिळवून पालकांची इच्छा, स्वप्ने पूर्ण करावीत. समाजाचे, देशाचे नाव मोठे करावे. यावेळी उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, संस्थेचे संचालक शिवराज पाटील, गणेश नायकुडे, डॉ. शरद जाधव, सविता भन्साळी, सुनीता गजरे, स्नेहा सूर्यवंशी, पूनम शेट्टी उपस्थित होते. शरद जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.