मागण्या 21 दिवसांत पूर्ण करा
कदंब कर्मचाऱ्यांची मागणी,अन्यथा आंदोलनाचा इशारा : पणजी शहरात काढला मोर्चा
पणजी : कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या 21 दिवसांमध्ये पूर्ण करा, अन्यथा कदंब बसगाड्या बंद ठेवून कर्मचारी संपावर जातील, असा इशारा कदंब कर्मचाऱ्यांनी दिला आहे. काल गुऊवारी कदंब कर्मचाऱ्यांनी आयटकच्या झेंड्याखाली राजधानीत मोर्चा काढला. यावेळी कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकात चोडणकर यांच्यासह सुमारे दीडशे कर्मचारी उपस्थित होते. तसेच आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सेका आणि इतर नेते उपस्थित होते.
कदंब कर्मचाऱ्यांची 34 महिन्यांची थकबाकी आहे. ती लवकरात लवकर द्यावी. भविष्य निर्वाह निधी कमी करून 10 टक्के करण्यात आला आहे तो परत 12 टक्के करावा, या मागण्यांसाठी आम्ही सरकार दरबारी वेळोवेळी जातो, पण अद्यापही आम्हाला न्याय मिळत नाही, असे आयटकचे ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितले. हे कर्मचारी अनेकवेळा संबधित अधिकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली आहेत. कदंबच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेही त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. पण अजूनपर्यंत कोणताच विषय निकालात काढलेला नाही, असे ख्रिस्तोफर म्हणाले.
कर्मचाऱ्यांची 34 महिन्यांची थकबाकी आहे. 1 जानेवारी 2016 आणि 31 ऑक्टोबर 2018 दरम्यान 600 हून अधिक कामगार निवृत्त झाले. ते थकबाकी मिळणार म्हणून वाट पाहत होते, मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. कदंब कर्मचाऱ्यांचा 12 टक्के भविष्य निर्वाह निधी होता. 2019 नंतर तो 10 टक्के करून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षे झाली त्यांना नोकरीत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबतची फाईल अजूनही धूळखात पडलेली आहे, असे फोन्सेका यांनी सांगितले.
भविष्य निर्वाह निधी वाढवून परत 12 टक्के करण्याचे आणि उरलेली थकबाकी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आम्ही दरवेळी पत्रव्यवहार करून सरकारला आठवण करून देत आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना विनंती करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्यांची भेटच होत नाही. जर आमचे प्रश्न निकालात काढले नाही तर बेमुदत संप करणार आहोत. आम्ही सरकारला 21 दिवसांची मुदत देत आहोत. 19 मार्चपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कामगार रस्त्यावर येऊन कदंब बससेवा बंद करणार आहेत, असा इशारा त्यांनी दिला आहे.
वाहतूक संचालक आणि अधिकारी कदंब महामंडळ संपविण्याचा विचार करीत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे आम्ही खासगीकरणाचा विरोध करतो. जे खासगी कंत्राटदार आहेत ते आपल्या चालकाला 12 तास बस चालवायला लावतात. या प्रकारचाही निषेध करत असल्याचे फोन्सेका यांनी सांगितले. 22 जानेवारी रोजी कदंब महामंडळाच्या मुख्यालयावर धरणे धरून जे मुद्दे आम्ही मांडले होते त्याची पूर्तता व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे कदंब कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकार यांनी सांगितले. आमचे काम पाहून व्यवस्थापन आणि सरकार शाबासकी देतात, मात्र सगळा बोलाचा भात आणि बोलाची कडी असाच प्रकार आहे. इतर खात्यात 7 वा वेतन आयोग लागू केला आहे. इतकेच नव्हे तर थकबाकीही देण्यात आली आहे. 8 वा वेतन आयोग लागू करण्यासाठी आठ महिने राहिले आहेत त्यामुळे आम्हाला त्वरित थकबाकी द्यावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.