फुकेरी 4G टॉवर जुलै अखेरपर्यंत कार्यान्वित करणार
बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन ;ग्रामस्थांचे उपोषण स्थगित
ओटवणे प्रतिनिधी
फुकेरी येथील जुना टॉवर बंदच असून नवीन 4G टॉवर गेले वर्षभर सुरू होण्याच्या प्रतिशत आहे. याबाबत अनेक वेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष करण्यात आल्याने फुकेरीवासीयांनी ज्ञानेश्वर आईर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडले. अखेर येत्या ३० जुलैपर्यंत हा 4G टॉवर सुरू करण्याचे लेखी आश्वासन बीएसएनएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर रविकांत जानू यांनी दिल्यानंतर फुकेरी ग्रामस्थांनी टॉवर कार्यान्वित करण्यासाठी पुकारलेले उपोषण स्थगित केले.या उपोषणात सरपंच निलेश आईर, ज्ञानेश्वर आईर, दिनेश आईर, शंभा आईर, शिवाजी आईर, आनंद आईर, सत्यवान आईर, शंकर आईर, दिलीप आईर, गणू आईर, महादेव आईर, राजाराम आईर, बाबू आईर, शुभांगी आईर, साक्षी कदम आदींनी उपोषणात सहभाग घेतला. दोडामार्ग भाजपा युवा उपाध्यक्ष पराशर सावंत यांनीही भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी बीएसएनएलचे अधिकारी श्री फुटाणे श्री माथुर तसेच पोलीस श्री कुबल उपस्थित होते.