For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव शहरात पुन्हा इंधनाचा तुटवडा

12:14 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव शहरात पुन्हा इंधनाचा तुटवडा
Advertisement

काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे फलक : वितरण मात्र मर्यादित स्वरुपात

Advertisement

बेळगाव : इराण-अमेरिका-इस्त्रायल देशांमधील युद्धाचा परिणाम आता पुन्हा एकदा बसू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यांमध्ये इंधनाचा तुटवडा जाणवू लागला. काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा नाही, असा फलक लावल्याने इंधनासाठी इतर पेट्रोल पंपावर वाहन चालक पोहोचत आहेत. दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे इंधनाचा तुटवडा जाणवल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पेट्रोल व डिझेल मिळविण्यासाठी तासन्तास रांगांमध्ये उभे रहावे लागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नानंतर पेट्रोल व डिझेल विक्रीवर काही नियमावली लागू करण्यात आल्यानंतर पेट्रोलचा पुरवठा सुरळीत पद्धतीने सुरू झाला.

भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या पेट्रोल पंपावर मागील काही दिवसांपासून मर्यादित स्वरुपात इंधनाचा साठा पाठविला जात होता. परंतु इंडियन ऑईल पेट्रोल पंप मात्र सुरळीत सुरू होते. परंतु मागील दोन दिवसांपासून त्या पेट्रोल पंपांनाही मर्यादित इंधन पुरवठा केला जात आहे. रविवारी व सोमवारी शहरातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नसल्याचे दिसून आले. विशेषत: मोठे पेट्रोल पंप बंद ठेवल्याने नागरिकांना इतर ठिकाणी पेट्रोलसाठी धावाधाव करावी लागली. बेळगाव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा असला तरी त्याचे वितरण मर्यादित स्वरुपात केले जात आहेत. पेट्रोल मिळण्यास विलंब होत असला तरी जिल्ह्यात मुबलक साठा असून गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.