For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्समध्ये आता इंधन तुटवडा

06:51 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समध्ये आता इंधन तुटवडा
Advertisement

प्रत्येक 9 पैकी एका पेट्रोल पंपावरील पेट्रोल-डिझेल समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

युरोपीय महासंघातील महत्त्वाची आर्थिक शक्ती असलेला देश फ्रान्समध्ये पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. फ्रान्समधील प्रत्येक 9 पैकी एक पेट्रोल पंपमध्ये इंधनसाठा संपुष्टात आला आहे. ही स्थिती पुढील काही दिवसांमध्ये आणखी गंभीर होत जनतेत आक्रोश निर्माण होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

मध्यपूर्वेतील तणाव, होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग बंद होणे, बाब-अल-मंदेब समवेत अन्य तेलगामार्गांवरील अडथळ्यांचा प्रभाव जगावर दिसून येत आहे. पाकिस्तानात एकीकडे पेट्रोल-डिझेल महाग होत चालले आहे, तर आणखी एक देश बेहाल झाला आहे. फ्रान्समध्ये इंधन संकट तीव्र झाले असून देशातील प्रत्येक 9 पैकी एका पेट्रोल पंपावरील पेट्रोल-डिझेलचा साठा संपुष्टात आला आहे.

डिझेलच्या किमतीत वाढ

तेलपुरवठ्यात सातत्याने घट होत असल्याने फ्रान्समध्ये इंधन संकटाचा मार जनतेला सहन करावा लागतोय. पुरवठा नसल्याने पेट्रोल पंपांवरील इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. खासकरून डिझेलची सरासरी किंमत 2.39 युरो प्रतिलिटरपेक्षा अधिक झाली आहे, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर किमतींचे मागील उच्चांक मोडीत निघाले आहेत. देशभरातील 700 हून अधिक पेट्रोल पंपांवर उच्चश्रेणीचे डिझेल 2.50 युरो प्रतिलिटरपेक्षा अधिक, तर अनेक इंधन केंद्रांवर हे 2.70 युरो प्रतिलिटरपर्यंत विकले जात आहे.

स्थिती चिंता वाढविणारी

फ्रान्समधील जनतेने अशाप्रकारचे इंधन संकट यापूर्वी कधीच अनुभवलेन नव्हते. एकीकडे डिझेलच्या किमती वाढून उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. तर सरकारच्या नव्या आकडेवारीनुसार देशभरातील जवळपास 11 टक्के पेट्रोल पंप स्टेशन्स म्हणजेच प्रत्येक 9 पैकी एक पेट्रोल पंप कमीतकमी एकप्रकारचे पेट्रोल किंवा डिझेलचा साठा कायम ठेवण्यासाठी संघर्ष करत आहे.

सरकारचे आवाहन

सौदी अरेबियाकडून तेलपुरवठ्यावर निर्बंध लादण्यात आल्याने युरोपीय पुरवठ्यावरील दबाव आणखी वाढला आहे. स्थिती इतकी खराब झाली आहे की फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जी-7 ला आपत्कालीन साठा जारी करण्याचे आवाहन करावे लागले आहे. पुरवठ्याशी संबंधित अडथळे पाहता मॅक्रॉन यांनी जी-7 नेत्यांची बैठक बोलाविण्याच्या योजनेची घोषणा केली आहे.

उच्चांकी दर, खर्चाचा दबाव

पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यात घट होण्यासोबत इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क मार्केटमध्ये युरोपीय डिझेलची किंमत 200 डॉलर्स प्रतिबॅरलपेक्षा अधिक झाली आहे आणि स्थानिक कर विचारात घेतल्यास रिटेल खर्चासोबत 300 डॉलर्स प्रतिबॅरलपेक्षा अधिक दर झाला आहे. सरकारच्या आकडेवारीपेक्षा वस्तुस्थिती खूप गंभीर होऊ शकते असे तज्ञांचे सांगणे आहे. निश्चित करण्यात आलेल्या मापदंडांनुसार कुठल्याही पेट्रोल पंपाला तेव्हाच इंधन तुटवड्याचा सामना करणारा मानले जाते, जेव्हा त्याच्याकडील सर्व ग्रेडचे पेट्रोल-डिझेल पूर्णपणे समाप्त होते, ज्यात पंपात एसपी95 समाप्त झाले आहे, परंतु एसपी98 किंवा एसपी95-ई10 चा साठा असेल तर त्याला राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल तुटवडा असलेल्या पेट्रोल पंपांच्या गणनेत सामील केले जात नाही.

वाहनचालकांची मोठी गर्दी

पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि इंधन पुरवठ्यात सातत्याने अडथळे येत असल्याने पेट्रोल पंपांवर वाहनचालकांची मोठी गर्दी होत असून स्थिती गंभीर होत चालली आहे. क्षेत्रीय स्तरावर ग्रँड एस्टमध्ये 16 टक्के फ्यूल स्टेशन्सवर इंधन तुटवडा निर्माण झाला आहे, तर सेंटर-वाल डे लोइरे आणि ओक्सिटानीमध्ये 14 टक्के, तर पेस डे ला लोइरेमध्ये 13 टक्के इंधन तुटवडा निर्माण झाला आहे.

Advertisement
Tags :

.