दाबोळीत इंधन वाहिनी फुटली
इंधन नसल्याने धोका टळला : परिसरात खळबळ,दुरुस्तीचे काम सुरू
वास्को : आल्त दाबोळी नाक्यावर काल शुक्रवारी सकाळी उड्डाण पुलाच्या कामाच्या वेळी भूमिगत इंधन वाहिनीला ठेच लागल्याने ती फुटण्याची घटना घडली. या घटनेच्या वेळी सदर वाहिनीतून जोराने हवा बाहेर पडू लागल्याने खळबळ उडाली. मात्र, घटनेवेळी सदर वाहिनीत इंधन नव्हते. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रशासनानेही घटनेवर नियंत्रण ठेवले. वास्कोतील आल्त दाबोळी नाका ते एमईएस कॉलेज नाक्यापर्यंत सध्या महामार्गावरील उड्डाण पुलाच्या कामाने गती घेतलेली आहे. महामार्गाच्या मधोमध खांब उभारले जात आहेत. तसेच महामार्गाच्या विस्ताराचेही काम चाललेले आहे. त्यासाठी पोकलीनव्दारे खोदकामही करण्यात येत आहे.
या खोदकामावेळी शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास दाबोळीच्या नाक्यावरच इंधन वाहिनीला ठेच लागली. त्यामुळे ती फुटून त्यातून हवा बाहेर पडू लागली. मात्र, सदर वाहिनीत इंधन नव्हते. त्यामुळे इंधन गळतीचा प्रश्न निर्माण झाला नाही. इंधन वाहिनी जेव्हा वापरात नसते तेव्हा त्या वाहिनीमध्ये हवा भरून ठेवण्यात येत असते. हीच हवा जोराने धुरासह बाहेर पडू लागल्याने मात्र, काही प्रमाणात भिती व खळबळ निर्माण झाली. वाहिनीमधून हवा बाहेर पडू लागल्याने सदर वाहिनी फुटल्याचे इंधन वाहिनीच्या कंपनीला कळून आले. त्यामुळे त्यांचे पथक अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस व अग्निशामक दलही घटनास्थळी दाखल झाले.
वाहतूक वळवली अन्य मार्गाने
खबरदारी म्हणून दाबोळी नाक्यावरील हा रस्ता काही तासांसाठी बंद ठेवणे भाग पडले. त्यामुळे वाहतूक चिखली ते दाबोळी अशा मार्गाने वळवण्यात आली. या घटनेमुळे प्रवाशांचीही बरीच गैरसोय झाली. वाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या वाहिनीच्या पूर्ण दुरूस्तीसाठी पुढील चार ते पाच दिवस लागण्याची शक्यता झुआरी आयएव्ही प्रा. लि. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मुरगावचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. वाहिनीच्या प्राथमिक दुरूस्तीनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तेथील कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी साडे अकराच्या सुमारास रस्त्याच्या खोदकामावेळी इंधन वाहिनी फुटली. यावेळी सदर कामगार आणि जवळपास राहणारे लोक घाबरले. मात्र, लगेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास यश आल्याने तणाव निवळला. सदर इंधन वाहिनीतून पेट्रोल व डिझेलचे वहन झुआरीनगरातील झुआरी आयएव्ही प्रा. लि. या कंपनीच्या तेल टाक्यांपर्यंत करण्यात येत असते. मात्र, मुरगाव बंदराला इंधनाचे जहाज लागलेले नसल्याने या वाहिनीतून इंधन वहन होत नव्हते. त्यामुळे तीत केवळ हवा भरून ठेवण्यात आली होती. इंधन वहनाच्या वेळी सदर वाहिनी फुटली असती तर गंभीर धोका निर्माण झाला असता. जवळपासच्या लोकांच्या जीवावरही बेतले असते.
उपलब्ध माहितीनुसार आज शनिवारपासून या वाहिनीतूनही तेल टाक्यांना इंधन पुरवठा होणार होता. मात्र, या अपघातामुळे आता पुढील चार ते पाच दिवस तेल टाक्यांना इंधन पुरवठा होणार नाही. मात्र, संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे पुढील दहा दिवस पुरेल ऐवढा इंधन साठा आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही असे कंपनीचे अधिकारी श्रीप्रसाद नाईक यांनी म्हटले आहे. मात्र, अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी म्हणून येत्या सोमवारी रस्त्याच्या कामाचे ठेकेदार, इंधन कंपनीचे अधिकारी तसेच पोलिस व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे मामलेदार प्रविणजय पंडित यांनी म्हटले आहे.
2011 साली वाहिनी फुटल्याने घडली होती दुर्घटना
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दाबोळी व झुआरीनगर भागात रस्ता खोदण्याचे काम चाललेले असल्याने या मार्गावरील काम व इंधन वाहिनीच्या मार्गावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलेले आहे. धोका निर्माण होऊ नये म्हणून वाहिनीचा मार्ग अधोरेखीत करण्यात आलेला आहे. तसेच इंधन पुरवठा सुरू असताना वाहिनी जवळ काम करू नये अशी सूचना रस्त्याच्या कामाचे ठेकेदार व कामगारांना करण्यात आलेली आहे. तरीही निष्काळजीपणा झाल्याने वाहिनी फुटण्याची घटना घडली. या घटनेमुळे 2011 साली वरूणापुरी मांगोरहिल भागात हीच भूमिगत वाहिनी फुटून घडलेल्या आठवणी जाग्या झाल्या. अशाच पध्दतीने महामार्गाच्या कामाच्यावेळी खोदकाम करताना ठेच लागली होती. मात्र, वाहिनी फुटल्याचा कुणालाच पत्ता लागला नव्हता. शेवटी वाहिनीतील सारे इंधन वरूणपुरी ते धाकतळे या गावातील जमिनीत झिरपले होते. त्यातूनच आग दुर्घटना निर्माण झाली होती. मागच्या वर्षी माटवे दाबोळी गावातही इंधन झिरपले जाऊन तेथील विहिरींनी पेट घेतला होता व पर्यावरणाचीही हानी झाली होती.