इंधनाची बचत... कशी आणि का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सर्व भारतीयांना ‘इंधनाची शक्य तितकी बचत करा. परदेश दौरे टाळा. सोन्याची खरेदी कमीत कमी करा, आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावा’ अशा अर्थाचे आवाहन केले आहे. यावर बऱ्याच उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांनी तर ‘देशाची अर्थव्यवस्था आता बुडालीच’ असा कंठशोष चालविला आहे. तर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा अर्थ योग्यप्रकारे समजून घ्या आणि या आवाहनाचे महत्व ओळखा, अशी भूमिका मांडली आहे. या सर्व गदारोळात मूळ विषय बाजूला पडू नये, म्हणून इंधन बचत आणि तिचे महत्त्व या विषयावर प्रकाश टाकला जाणे आवश्यक आहे. तेच करण्याचा हा प्रयत्न...
इंधन आणि त्याचे उपयोग
पेट्रोल, डिझेल, वीज, नैसर्गिक इंधन वायू, कोळसा, बायोमास हे सर्व इंधनाचे प्रकार आहेत. इंधनाची आवश्यकता वाहने चालविण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, पाणी तापविण्यासाठी, सर्व प्रकारची औद्योगिक उत्पादने निर्माण करण्यासाठी आणि एकंदरीतच कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यासाठी होतो, हे सर्वांना माहित आहे.
ड पूर्वीच्या काळी इंधनाचा उपयोग कमी प्रमाणात होत असे. जे इंधन आवश्यक असे, ते स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असे. उदाहरणार्थ, लाकूडफाटा, शेण, गवत, वाळलेली पाने, लोणारी कोळसा, इत्यादी प्रकारच्या इंधनांचा उपयोग केला जात असे. पण सध्याच्या आधुनिक काळात इंधनाचे स्वरुप पूर्णत: पालटले आहे.
इंधनाची उपलब्धता
ड सध्या आपण प्रामुख्याने जे इंधन उपयोगात आणतो, ते स्थानिक पातळीवर निर्माण झालेले नसते. पेट्रोल, डिझेल, इंधन वायू आणि वीज या चार प्रकारच्या इंधनांचा आपण 99 टक्के कामांसाठी उपयोग करतो. यांपैकी वीज कोळसा, अणुइंधन, वायू, सौरऊर्जा, पाणी आदी स्रोतांपासून बनते. हे स्रोत भारतात उपलब्ध आहेत. त्यामुळे वीज उत्पादनासाठी आपला देश विदेशांवर विशेष अवलंबून नाही.
ड तथापि, पेट्रोल, डिझेल आणि इंधन वायू यांचे स्रोत भारतात अत्यल्प आहेत. पेट्रोलियम किंवा कच्चे इंधन तेल यापासून पेट्रोल आणि डिझेल बनते. इंधन वायू हाही पेट्रोलियम पासून बनू शकतो. तसेच तो पृथ्वीच्या पोटात मिळू शकतो. भारताला आपल्या आवश्यकतेपैकी जवळपास 90 टक्के पेट्रोलियम आणि 60 टक्के इंधन वायू आयात करावा लागतो, ही वस्तुस्थिती समजून घ्यावी लागते.
ड सध्याच्या काळातील आपले व्यवहार आणि अर्थव्यवस्था अशा प्रकारची आहे, की आपल्याला या आयात इंधनावरच अवलंबून रहावे लागते. आपण ते टाळू शकत नाही. या इंधनांचा उपयोग केला नाही, तर नव्या जगात आणि टिकूच शकणार नाही. त्यामुळे मोठी किंमत मोजून आपल्याला इंधन आयात करावी लागते. कारण आपल्या देशात अद्यापतरी या इंधन स्रोतांचा शोध लागलेला नाही.
आयात इंधनाचा खर्च
ड आपल्याला किती इंधन आयात करावे लागते...
- इंधन वायू किंवा स्वयंपाकाचा गॅस प्रत्येक वर्षाला जवळपास 2.2 कोटी टन
- कच्चे इंधन तेल किंवा पेट्रोलियम प्रत्येक वर्षाला जवळपास 24 कोटी टन
- बॅरलच्या हिशेबात प्रतिवर्ष आयात करण्याची आवश्यकता 200 कोटी बॅरल

यासाठी किती खर्च करावा लागतो...
- इंधन वायूसाठी प्रत्येक वर्षी होणारा आयात खर्च 2 लाख कोटी रुपये
- कच्चे इंधन तेल आयातीसाठी होणारा वार्षिक खर्च 20 लाख कोटी रुपये
- एकंदर इंधनासाठी प्रत्येक वर्षीचा आयात खर्च 22 लाख कोटी रुपये
ड हा हिशेब कच्च्या इंधन तेलाची आजची प्रतिबॅरल किंमत आणि इंधन वायूची आजची किंमत गृहित धरून केलेला आहे. कच्च्या तेलाच्या आणि वायूच्या दरात नेहमी चढउतार होत असतात. हे दर आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर ठरतात. ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या हातात असतेच असे नसते. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेलाही या परिस्थितीनुसार हेलकावे खावेच लागतात. त्यामुळे विद्यमान सरकारला किंवा अन्य कोणालाही दोष देऊन परिस्थिती सुधारणार नसते.
आयातीचे पेमेंट कसे केले जाते...
ड कच्च्या तेलाच्या आणि इंधन वायूच्या आयातीचे पेमेंट केंद्र सरकारला डॉलरमधूनच करावे लागते. कारण तसा आंतरराष्ट्रीय नियम आहे. 70 च्या दशकात तेल उत्पादन देश आणि अमेरिका यांच्यात झालेल्या करारानुसार तेलाचे पेमेंट डॉलरमध्येच करावे लागते. हा नियम साऱ्या जगाला पाळावाच लागत आहे.
देशात इंधनाचे दर कसे ठरतात...
- कच्चे इंधन तेल आयात करण्याचा खर्च
- ते भारतातील तेल शुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणावयाचा खर्च
- त्याचे शुद्धीकरण करुन त्यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि इतर प्रकारची तेले निर्माण करण्याचा खर्च
- पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क
- पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारांचा मूल्यवर्धित कर, स्थानिक कर
- पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरण केंद्रापासून पेट्रोल पंपांपर्यंत आणण्याचा खर्च
- पेट्रोल, डिझेल विकणाऱ्या पेट्रोल पंपचालकाला दिले जाणारे कमिशन
या सर्व खर्चांची बेरीज करुन जे उत्तर येईल तेवढे पैसे दिल्यानंतरच आपल्याला पेट्रोल आणि डिझेल मिळू शकते.
हे दर कशावर अवलंबून असतात...
ड पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रामुख्याने कच्च्या इंधन तेलाच्या आंतरराष्ट्रीय दरावर अवलंबून असतात. हा दर 60 डॉलर प्रतिबॅरल असेल तर 95 ते 100 रुपये प्रतिलिटर या दराने (सर्व करांसह) पेट्रोल किंवा डिझेल विकता येणे शक्य आहे, असे पेट्रोलियम कंपन्यांचे म्हणणे आहे. तज्ञांचे म्हणणे असे आहे, की 60 डॉलर प्रतिबॅरलच्या वर कच्च्या तेलाचे दर गेल्यास प्रतिडॉलर 1 रुपया या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढवावे लागतात. अन्यथा पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो, असे त्यांचे म्हणणे आहे. काही जण या हिशेबाला विरोध करतात. तथापि, सर्वसाधारणपणे काही पैशांचे अंतर सोडल्यास हेच सूत्र आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल-डिझेलचे दर वाढवावेच लागतात.
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात काय...
ड आज पेट्रोल साधारणत: 110 ते 115 रुपयाला लिटर या दराने उपलब्ध आहे. डिझेल साधारणत: 90 ते 95 रुपयांना उपलब्ध आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनुक्रमे उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित कर तसेच स्थानिक कर काढून टाकल्यास, किंवा मोठ्या प्रमाणात कमी केल्यास आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात. तथापि, तसे करणे हे आणखी संकटाला निमंत्रण दिल्याप्रमाणे असते. म्हणून कर कमी न करणेच योग्य, असे तज्ञांचे मत आहे.
कर काढून टाकल्यास काय होईल...
- पेट्रोल-डिझेल आत्ताच्या दरापेक्षा स्वस्त होईल. पण जसे ते स्वस्त होईल, तसे त्यांच्या उपयोगाचे प्रमाण वाढेल. म्हणजेच मागणी वाढेल. तसे झाल्यास ही वाढीव मागणी भागविण्यासाठी जास्त प्रमाणात कच्चे इंधन तेल आयात करावे लागेल. त्यामुळे आयात खर्च वाढेल. परिणामी अर्थव्यवस्थेवरचा ताणही वाढणार आहे.
- पेट्रोल आणि डिझेल या जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यांचा खप सुनिश्चित असतो. त्यामुळे त्यांच्यावर कर लावल्यास केंद्र आणि राज्य सरकारांना निश्चित प्रमाणात खात्रीचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न जनतेच्या इतर मागण्या भागविण्यासाठी खर्च केले जाते. केंद्र आणि राज्य सरकारांना पेट्रोल आणि डिझेलच्या करांमधून मिळणारे उत्पन्न न मिळाल्यास किंवा कमी मिळाल्यास इतर कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील किंवा त्यांचे प्रमाण कमी करावे लागेल. म्हणजे लोकांचाच तोटा होईल. ही बाब लक्षात घेणे सध्याच्या स्थितीत अत्यंत आवश्यक आहे.

यातून आपण काय लक्षात घ्यायचे आहे...
ड आपण जितक्या अधिक प्रमाणात पेट्रोल-डिझेलचा आणि इंधन वायूचा उपयोग करु तेव्हढ्या अधिक प्रमाणात कच्च्या तेलाची वायूची आयात करावी लागणार आहे. यासाठी अधिक प्रमाणात परकीय चलन म्हणजेच डॉलर खर्च करावे लागणार आहेत. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची सुदृढता त्या देशाकडे असणाऱ्या परकीय चलनाच्या साठ्यावर अवलंबून असते. हा साठा कमी झाल्यास अर्थव्यवस्थेवर ताण येतो आणि अंतिमत: सर्वसामान्य जनतेचीच मोठी हानी होते.
ड ही हानी टाळायची असेल तर आपल्याला इंधनाचा उपयोग जपून करावा लागणार आहे. केवळ आवश्यकता असतानाच ते उपयोगात आणायचे आहे. केवळ चैन करण्यासाठी किंवा मजेसाठी त्याचा उपयोग केल्यास अखेरीस आपल्यालाच त्याची किंमत भोगावी लागेल. त्यामुळे शक्य तितक्या प्रमाणात इंधन वाचविले पाहिजे. तरच आपण आपला खर्चही नियंत्रणात ठेवू शकणार आहोत. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेवरचाही ताण कमी करु शकणार आहोत, हे ध्यानात घ्यावे.
पेट्रोल-डिझेल बचतीचे काही मार्ग
- वाहने शेअर करणे : एका दुचाकीवरून किंवा कारमधून एकट्याने जाण्याऐवजी त्याच मार्गावरून जाणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना, सहाध्यायांना किंवा आपल्या कार्यालयात तसेच आसपासच्या भागात काम करणाऱ्यांना आपल्या समवेत नेल्यास पेट्रोलची लक्षणीय बचत होऊ शकते. जितक्या स्थानी आणि जितक्या प्रमाणात हे करता येणे शक्य आहे, तितके केल्यास मोठा फरक पडू शकणार आहे. आपल्यासमवेत येणाऱ्यांना आपण पैसे शेअर कारण्यास निश्चितपणे सांगू शकतो.
- वीजेची वाहने उपयोगात आणणे : वीजेवर किंवा बॅटरीवर चालणारी वाहने हा एक उपाय आहे. वीजेचे उत्पादन आपल्या देशात समाधानकारक आहे. शिवाय वीज निर्मिती आपण आपल्या देशात मिळणाऱ्या इंधनापासून करु शकतो. त्यामुळे देशातला पैसा देशातच राहतो, अर्थव्यवस्थेवर अधिक ताण येत नाही. अर्थव्यवस्था स्थिरस्थावर राहिल्यास त्याचा लाभ अंतिमत: आपल्यालाच निश्चितपणे होतो.
- वाहनांचा अनावश्यक उपयोग टाळणे : आपले गंतव्य स्थान जवळ असेल, (उदाहरणार्थ भाजीबाजार, कार्यालय, मंदीर, शाळा, महाविद्यालय, अन्य नित्यस्थाने इत्यादी) तर पेट्रोल किंवा डिझेलचे वाहन उपयोगात आणण्यापेक्षा चालत जाणे श्रेयस्कर आहे. यामुळे इंधत तर वाचतेच, शिवाय शरिरालाही व्यायाम होऊन ते सदृढ राहण्याची शक्यता वाढते. शक्य तितक्या प्रमाणात हे करणे योग्य ठरेल.
- सार्वजनिक वाहनांचा उपयोग : आपल्या कामाच्या किंवा अन्य स्थानी जाताना खासगी वाहन नेण्याऐवजी सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा. यात वेळ अधिक जातो. पण इंधनाची बचत होते. यामुळेही चांगला फरक पडू शकतो.
- इलेक्ट्रिक ओव्हनचा उपयोग : स्वयंपाकाच्या इंधन वायूची बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक ओव्हनचा किंवा वीज शेगडीचा उपयोग केला जाऊ शकतो. हा उपायही शक्य तितक्या प्रमाणात केल्यास परिणाम चांगलाच होणार हे निश्चित आहे.
- याशिवाय, इंधन बचतीचे कल्पक मार्ग प्रत्येकाला सुचू शकतात. ते प्रयोग आवश्य करून बघावेत. त्यासाठी तज्ञांचा सल्लाही घेता आल्यास पहावा. शेवटी उद्देश साध्य होणे अत्यंत महत्वाचे आहे, हे प्रत्येकाने ध्यानात घेणे आवश्यक आहे.
इंधन बचत का आवश्यक आहे...
ड केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे म्हणून नव्हे, किंवा कच्च्या इंधन तेलाचे तर भडकले आहेत म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय आणि वैयक्तिक आवश्यकता आणि अनिवार्यता म्हणून इंधन बचत केलीच पाहिजे. कच्च्या इंधन तेलाचे तर उद्या कमी झाले आणि पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले तरी त्यांची बचत करण्याची सवय लावून घ्यावी लागणारच आहे. कारण ज्या वस्तू आपल्या देशात निर्माण होत नाही, आणि जी आपल्याला आयात करावी लागते, तिच्या उपयोगासंबंधाने आपण सजग, सतर्क आणि दक्ष असलेच पाहिजे. त्याशिवाय आपल्यासमोर तरणोपाय नाही, हे स्वयंप्रबोधन आपण करून घ्यावेच लागणार आहे.
अजित दाते