भाजपमधील तिकीट वंचितांमध्ये नाराजी; नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
समर्थकांच्या बैठका घेऊन पुढील वाटचाल ठरविण्याच्या हालचाली :
बेंगळूर : राज्यातील 20 लोकसभा मतदारसंघांसाठी भाजप हायकमांडने बुधवारी उमेदवारांची घोषणा केली. मात्र, तिकिटापासून वंचित रहावे लागलेले खासदार आणि इच्छुक नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून गुरुवारी त्याचे पडसाद उमटले. बेंगळूर उत्तर, कोप्पळ, हावेरी, शिमोगा, चामराजनगर, म्हैसूर, दावणगेरे, बिदर आणि तुमकूर मतदारसंघांमध्ये असमाधानाची धग दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना नेत्यांची नाराजी उफाळून येऊ नये यासाठी भाजपश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यामार्फत नाराजी दूर करण्याची कसरत सुरू केली आहे. तिकिटापासून वंचित रहावे लागल्याने अनेकांनी आपल्या समर्थकांची बैठक बोलावून पुढील भूमिका निश्चित करण्याच्या हालचाली आरंभिल्या आहेत. काहींनी तर बंडखोरी करण्याची भाषा केली आहे. त्यामुळे भाजपश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली आहे. हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपले पुत्र कांतेश यांना तिकीट मिळेल, अशी अपेक्षा माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी बाळगली होती. मात्र, संधी हुकल्याने ईश्वरप्पा यांनी येडियुराप्पांवर टीकास्त्र सोडले. भाजपश्रेष्ठींवरही नाराजी व्यक्त केली. शिमोगा मतदारसंघातून बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ईश्वरप्पा यांनी शुक्रवारी शिमोग्यात समर्थकांची सभा बोलावली असून त्यात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
शिमोग्याप्रमाणे दावणगेरेतही भाजप नेत्यांमध्ये नाराजीची लाट आहे. येथील विद्यमान खासदार जी. एम. सिद्धेश्वर यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला तिकीट दिल्याने काहीजण नाराज आहेत. तर काहीजण सिद्धेश्वर यांच्या कुटुंबाऐवजी एस. ए. रविंद्रनाथ यांना तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. दावणगेरेतून गायत्री सिद्धेश्वर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाराज असलेले माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य, एस. ए. रविंद्रनाथ, माजी आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांनी स्थानिक नेत्यांची बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे. हे तिन्ही नेते लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे मागील निवडणुकीत उडुपी-चिक्कमंगळूरमधून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांना बेंगळूर उत्तर मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे बेंगळूरमधील काही प्रभावी नेत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, ही नाराजी अद्याप उफाळून आलेली नाही. स्थानिक नेत्यांनी ‘शोभा करंदलाजे गो बॅक’ मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी करंदलाजे यांना नाराजीचा अंतर्गत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमकूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असणारे माजी मंत्री जे. सी. माधुस्वामी यांची निराशा झाली आहे. त्यांची वाटचाल काय असेल, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांना तिकीट मिळाल्याने माधुस्वामी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. चिक्कमंगळूरमध्ये माजी मंत्री सी. टी. रवी तिकिटासाठी इच्छुक होते. मात्र, येथे विधानपरिषद विरोधी नेते कोटा श्रीनिवास पुजारी यांना संधी देण्यात आली आहे. कोप्पळमध्ये तिकीट हुकल्याने खासदार संगण्णा करडी यांनी काँग्रेसची वाट धरण्याचा विचार चालविला आहे. काँग्रेसकडून त्यांना तिकिटाची ऑफर मिळाल्यास येथील लढत अधिक रंगतदार होईल. परंतु, याचा असर भाजपवर पडण्याची शक्यता आहे.
येडियुराप्पा ‘आखाड्यात’
उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर विविध मतदारसंघांमध्ये निर्माण झालेली नाराजी शमविण्याची जबाबदारी भाजपश्रेष्ठींनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे तिकिटापासून वंचित असलेल्यांशी चर्चा करण्यासाठी येडियुराप्पा ‘आखाड्यात’ उतरले आहे. त्यामुळे आगामी काळात नाराजी दूर होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींना आहे.
बंडखोरी करणार नाही!
बेंगळूर उत्तर मतदारसंघातून तिकीट हुकल्याने माजी मुख्यमंत्री सदानंदगौडा आणि म्हैसूरमध्ये खासदार प्रतापसिंह नाराज आहेत. मात्र, त्यांनी आपण बंडखोरी करणार नाही, असे सांगितल्याने भाजपश्रेष्ठींना दिलासा मिळाला आहे. बळ्ळारीत खासदार देवेंद्रप्पा यांचे तिकीट कापण्यात आले आहे. मात्र, येथे भाजपमध्ये नाराजी नाही. त्यामुळे बी. श्रीरामुलू यांना अनुकूल वातावरण आहे.