सांगलीत रविवारपासून फळमहोत्सव
सांगली :
सांगलीत येत्या रविवारपासून फळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवसाच्या या महोत्सवात सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, ड्रॅगन फ्रुट, केळी, कलिंगड, पेरु, स्ट्रॉबेरी, आंबा, चिकू यासह अनेक प्रकारची फळे विक्रीसाठी उपलब्ध असतील. थेट शेतकरी विक्रीसाठी स्टॉल मांडणार असून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण व्हावी या हेतूने हा महोत्सव होत आहे. जिल्ह्यातील विविध फळ उत्पादकांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली जिल्हा परिषद व शासनाचा कृषी विभाग, पणन महामंडळ आणि महानगरपालिका, फळ महोत्सव समिती, द्राक्ष बागायतदार संघ आदी विभाग-संघटना संयोजक आहेत. सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगलीत महाशिवरात्री हा दिवस द्राक्ष दिन म्हणून साजरा व्हावा अशी मागणी गतवर्षी झाली. त्यानंतर हा उपक्रम सुरु झाला. यंदा हा फळ महोत्सव अधिक व्यापक प्रमाणात नेमीनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी तयार व्हावी असे प्रयत्न आहेत. ग्राहकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात खरेदी करून प्रतिसाद द्यावा असे आवाहन सभापती सुजय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृती धोडमिसे, आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, मनोज वेताळ यांनी केले आहे.
बाजार समितीचे यंदाचे हिरकमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने फळ महोत्सव मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्णय झाला. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील उत्पादकांचे द्राक्षाचे विविध २० प्रकारचे वाण खरेदी करता येतील. डाळिंबाचेही विविध वाण, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी पेरू, केळी, कलिंगड या प्रमुख फळांसह अन्य विविध फळांपासून बनविलेले उपपदार्थ यामध्ये जाम, जेली, ज्यूसही खरेदी करता येणार आहेत. गतवर्षीपासून कृषी निविष्ठा उत्पादकांच्या पुढाकाराने महाशिवरात्री द्राक्ष दिन दिनाचे औचित्य साधून हा महोत्सव सुरू केला आहे. यंदाचे महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. यंदा जिल्हा प्रशासनातील सर्व महत्त्वाच्या आस्थापनांच्या पुढाकाराने आणि फळ महोत्सव समितीच्या सहकार्याने या महोत्सवाला व्यापक स्वरूप दिले आहे. महोत्सवा दरम्यान विविध उपक्रम होणार आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटापर्यंत असणाऱ्या चित्रकला स्पर्धा, पाककृती स्पर्धा, फळ सजावट आरास स्पर्धा तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा असे कार्यक्रम होणार आहेत.