शेतकरी संघाच्या पाठपुराव्याला यश, फळपीक विम्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविली; नारळ, सुपारी आणि केळी उत्पादकांना दिलासा
सावंतवाडी : सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघासह जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नारळ, सुपारी आणि केळी या फळपिकांसाठी विमा उतरविण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ वरून १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नारळ, सुपारी आणि केळी या पिकांचा प्रथमच फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला होता. मात्र, विमा उतरविण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे अनेक शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
२२ ऑक्टोबर रोजी कृषी संचालक, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये वेबिनारद्वारे चर्चा झाली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती.
मात्र, ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असणे, प्रशासकीय पातळीवरील विलंब आणि मोबाईल नेटवर्कच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात संघाने २३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन सादर केले होते. अल्प मुदतीमुळे पाच टक्के शेतकऱ्यांनाही विमा योजनेचा लाभ घेणे शक्य होणार नसल्याची बाब संघाने मांडली होती.
नारळ, सुपारी आणि केळी या पिकांचा विमा योजनेत समावेश व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. त्यामुळे या पिकांचा समावेश झाल्यानंतर केवळ अपुऱ्या मुदतीमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी संघाने महसूल व कृषी विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने रात्री उशिरा निर्णय जारी करून विमा अर्ज भरण्याची मुदत १५ नोव्हेंबरपर्यंत वाढविली.
बागायतदारांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी
मुदतवाढीचा लाभ जिल्ह्यातील सर्व नारळ, सुपारी आणि केळी उत्पादक बागायतदारांनी घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करावी. सातबारा उताऱ्यावर फळपिकांची ई-पीक नोंदणी होईपर्यंत आपल्या बागेत जाऊन जिओ ट्रॅकिंग करून घेणे आवश्यक आहे. यासाठी मोबाईलमध्ये ‘नोटकॅम’ ॲप डाउनलोड करून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या मुदतवाढीच्या निर्णयामुळे नारळ, सुपारी आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासन, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. वाढीव मुदतीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विलास सावंत यांनी केले आहे.
