मार्गशीर्षसाठी फळा-फुलांची रेलचेल
उद्या शेवटचा गुरुवार, विविध वस्तू खरेदीसाठी महिलांची लगबग
बेळगाव : मार्गशीर्ष महिना सुरू झाल्यापासून फळा-फुलांची आवक वाढू लागली आहे. महिन्यातील शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असल्याने बाजारात फळा-फुलांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. विशेषत: महिलावर्गातून पूजेचे साहित्य, फळे, फुले यांची खरेदी वाढणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात महिलांकडून दर गुरुवारी व्रत केले जाते. त्यामुळे पूजेच्या साहित्याला विशेष मागणी असते. त्यामुळे बाजारपेठेतही फळे, फुले आणि इतर साहित्याची खरेदी वाढली आहे. बाजारात चिकू 100 रुपये किलो, सफरचंद 120 ते 240 रु., संत्री 80 ते 100 रु., डाळींब 140 ते 180 रु. किलो, पेरू 100 रु. किलो, पपई 30 ते 60 रु. एक, सीताफळ 100 रु. किलो, जवारी केळी 60 रु. डझन, रामफळ 50 रु. किलो, द्राक्षे 120 ते 150 रु. किलो, ड्रॅगन फ्रुट 80 रुपये एक, अननस 40 ते 60 रु. एक, कलिंगड 80 ते 100 रु. नग असा फळांचा दर आहे. मागील चार मार्गशीर्ष गुरुवारी फळा-फुलांची मोठी खरेदी-विक्री झाली होती. या पार्श्वभूमीवर या गुरुवारी फळा-फुलांची विक्री वाढणार आहे. पूजेच्या साहित्याबरोबर फळे, फुले, अंबोती, दुर्वा आणि इतर साहित्याची रेलचेल पाहावयास मिळत आहे.