For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून पणजीत मराठीचा जागतिक गजर

12:09 PM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजपासून पणजीत मराठीचा जागतिक गजर
Advertisement

पणजीत 21 वे जागतिक मराठी संमेलन रंगणार : देशविदेशांतून येणार मान्यवर मराठी प्रतिनिधी

Advertisement

पणजी : येथील कला अकादमीत आज शुक्रवार दि. 9 पासून 11 जानेवारीपर्यंत मराठी भाषेचा, विचारांचा आणि जागतिक कर्तृत्वाचा उत्सव साजरा होणार आहे. जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या 21 व्या जागतिक मराठी संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाची संकल्पना ‘शोध मराठी मनाचा’ अशी असून, देश-विदेशांतील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मराठी माणसांच्या विचारांचा, अनुभवांचा आणि योगदानाचा हा जागतिक मेळा ठरणार आहे.

दुपारपासून कार्यक्रमांना प्रारंभ

Advertisement

संमेलनाची सुऊवात आज दुपारी 2 वा. ‘चित्रपटातील मराठी माणूस’ सत्राने होईल. यात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांच्याशी ब्रिटिश नंदी संवाद साधतील. दुपारी 2.45 वा. ’लक्ष्मीची पावले’ या सत्रात उद्योग, उद्योजकता आणि जागतिक यशाचा वेध घेतला जाईल. यात अनिल खंवटे, भरत गीते (जर्मनी) आणि वैभव खांडगे (इंग्लंड) आपले अनुभव मांडतील. सायं. 4 वा.  औसा येथील श्री नाथ संस्थान यांचा ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा चक्री भजनाचा कार्यक्रम सादर होईल.

नांदीने उद्घाटन सत्राची सुरुवात 

सायं. 5.15 वा. संजीवन संगीत अकादमीतर्फे नांदी सादरीकरण झाल्यानंतर सायं. 5.30 वा. संमेलनाचा उद्घाटन व पुरस्कार वितरण सोहळा होणार असून, उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उदय सामंत, आशिष शेलार, दिगंबर कामत, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर, रामदास फुटाणे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. अनिल खंवटे यांना जागतिक मराठी भूषण सन्मान तर महेश मांजरेकर यांना कला जीवन गौरव सन्मान यावेळी देण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर रात्री 7.30 वा. ‘मर्मबंधातली ठेव ही’ हा नाट्यागीतांचा सवेश, साभिनय कार्यक्रम (निर्मिती  नितीन कोरगावकर) सादर होईल.

Advertisement
Tags :

.