For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 वर्ल्डकप ते फिफा विश्वचषक

06:05 AM Jan 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
टी 20 वर्ल्डकप ते फिफा विश्वचषक
Advertisement

2026 वर्ष क्रीडाविश्वासाठी महापर्व : अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांची मांदियाळी

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

यंदाचे नवे वर्ष क्रीडाविश्वासाठी केवळ कॅलेंडर बदलणारे नाही, तर थरार, जल्लोष आणि वर्ल्ड कपच्या धमाक्यांनी भरलेले असणार आहे. क्रिकेटपासून फुटबॉलपर्यंत, पॅरा ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल स्पर्धांपर्यंत आणि हॉकी, बास्केटबॉल ते आशियाई क्रीडा स्पर्धांपर्यंत 2026 हे वर्ष म्हणजे क्रीडाविश्वासाठी महापर्व असेल. अर्थात, याची सुरुवात युवा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपासून होणार आहे. यंदाच्या वर्षी अनेक महत्वपूर्ण स्पर्धा होत असल्याने भारतीय खेळाडूंसाठी पदक जिंकण्याची नामी संधी असणार आहे.

Advertisement

क्रिकेटपासून सुरुवात, फुटबॉलपर्यंत शिखर

नववर्षाची पहिलीच चाहूल 19 वर्षांखालील युवकांच्या क्रिकेट वर्ल्ड कपने लागणार आहे. या स्पर्धेनंतर क्रिकेटचा खरा रंग चढेल तो पुरुषांच्या आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये, जो भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. विशेष म्हणजे, जून-जुलैदरम्यान आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये होणार असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी नॉनस्टॉप मेजवानी असणार आहे.

फिफा वर्ल्ड कपची मेजवानी

2026 मधील महत्त्वाची स्पर्धा म्हणजे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणारा फिफा वर्ल्ड कप. 48 संघ, 104 सामने आणि महिनाभर चालणारा फुटबॉलचा महासागर हा फिफा वर्ल्ड कप नव्या इतिहासाची नोंद करणार आहे. अवघे जग याची आतुरतेने वाट पाहत असून जगभरातील फुटबॉलप्रेमीसाठी ही नवी पर्वणी असणार आहे. याशिवाय, यंदाचा वर्ल्डकप गर्दीचा आणि कमाईचा वर्ल्ड कप ठरणार, याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत.

राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धांचा जल्लोष

ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा राष्ट्रकुलातील देशांना एकत्र आणण्यासाठी सज्ज होईल. या स्पर्धेत भारतीय संघ चुरस देण्यासाठी सज्ज असणार आहे. याशिवाय, इटलीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने त्याचीही उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये असणार आहे.

हॉकीप्रेमींसाठी पर्वणी

पुरुष आणि महिला हॉकी वर्ल्ड कप बेल्जियम-नेदरलॅण्ड्समध्ये एकाच वेळी होणार आहेत. पुरुषांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार असला तरी महिला गटात मात्र भारतीय संघाला सहभाग नोंदवता आलेला नाही. यामुळे भारतीय हॉकी संघ वर्ल्डकपमध्ये कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याशिवाय, हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्स या महत्त्वाच्या स्पर्धा इटलीत होणार आहेत.

आशियाई स्पर्धा भारतासाठी वर्चस्वाची संधी

यंदा आशियाई क्रीडा स्पर्धां जपानमध्ये होणार आहे. जपानमध्ये होणारा आशियाई क्रीडा स्पर्धेचा महोत्सव भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आशियाई स्पर्धेसह अन्य महत्त्वाच्या स्पर्धाही यंदाच्या वर्षी होणार असून यामुळे क्रीडाविश्वही भारावून जाणार आहे. विशेष म्हणजे, 2026 या नव्या वर्षी जगभरातील तसेच भारतातील क्रीडापटूंना आपली झेप दाखवण्याची संधी मिळणार आहे.

2026 मधील प्रमुख स्पर्धांचा कार्यक्रम

  • 15 जाने 19 वर्षांखालील युवा क्रिकेट वर्ल्ड कप, झिम्बाब्वे-नामिबिया
  • 23 जाने दक्षिण आशियाई स्पर्धा (पाकिस्तान)
  • 6 फेब्रु. हिवाळी ऑलिम्पिक गेम्स (इटली)
  • 7 फेब्रु ते 8 मार्च आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप
  • 15 मार्च हिवाळी पॅरालिम्पिक गेम्स (इटली)
  • 11 जून ते 19 जुलै फिफा वर्ल्ड कप (अमेरिका-कॅनडा-मेक्सिको)
  • 12 जून ते 5 जुलै महिला टी-20 वर्ल्ड कप (इंग्लंड)
  • 23 जुलै ते 2 ऑगस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (ग्लासगो, स्कॉटलंड)
  • 14 ते 30 ऑगस्ट पुरुष आणि महिला हॉकी वर्ल्ड कप (बेल्जियम-नेदरलॅण्ड्स)
  • 19 सप्टें. ते 4 ऑक्टो. आशियाई क्रीडा स्पर्धा (ऐची-नागोया)
Advertisement
Tags :

.