सुएज कालव्याच्या दुपदरीकरणातून आत्मनिर्भतेकडे
सुएज कॅनलमध्ये 2021 साली एव्हरग्रीन हे महाकाय जहाज अडकल्यानंतर झालेली कोंडी आणि त्यातून झालेल्या नुकसानीपासून धडा घेत अखेर इजिप्त सरकारने या कालव्याचे दुपदरीकरण पूर्ण करण्यात यश मिळविले. सरत्या वर्षाच्या अखेरीस त्या संबंधीची घोषणा इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष आब्देल फताह अल् सिसी यांनी केलेली आहे. सुएज कॅनलच्या दुपदरीकरणामुळे अटलांटिक महासागरातून हिंदी महासागरमार्गे प्रवास करणाऱ्या अधिकाधिक जहाजांना आता मार्गक्रमण करता येईल.
इजिप्त सरकारच्या महसुलात भरीव योगदान देणाऱ्या सुएज कालव्याचे बहुतांश दुपदरीकरण आता पूर्ण झालेले आहे. 193 किलोमीटर लांबीच्या या कालव्याच्या अरुंद मार्गाला आता समांतर असा 82 किलोमीटर्सचा समांतर कालवा बांधलेला आहे. 2014 साली या कालव्याच्या दुपदरीकरणाला प्रारंभ करण्यात आला होता. रुंदीकरणाबरोबरच सुएज कालव्याच्या काठावर इजिप्त सरकारने देशाच्या विकासाला गती देणाऱ्या सुएज कालवा कॉरिडोअर प्राधिकरणाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी औद्योगिक क्रांतीचा पायंडा रचला आहे.
दशकभराच्या कालावधीत सुएज कालव्याच्या समांतर असा नवा कालवा उभारतानाच त्याच्या परिसरात औद्योगिक विकासाला चालना दिली. या कालव्याच्या तटावर जहाज बांधणी आणि दुरुस्ती उद्योगांना वाव दिलेला आहे. त्याचबरोबर इजिप्तच्या कैरो, अॅलेक्झेंड्रीया व अन्य मोठ्या शहरांवरील ताण दूर करण्यासाठी कालव्याच्या बाजूला असलेल्या इस्माईलीया शहराचा 16,500 एकर भूभागावर विस्तार करण्यात येत आहे. या नव्या शहरात पाच लाख इजिप्शीयन नागरिकांना वसवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याबरोबर कालव्याला समांतर अशी औद्योगिक वसाहत उभी राहिलेली आहे. त्यासाठी 2018 साली इजिप्त सरकारने रशियाबरोबर 50 वर्षांसाठी औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी करार केलेला आहे.
इजिप्तच्या चौफेर विकासासाठी रुंदीकरणाबरोबरच 5 ऑगस्ट 2014 साली समांतर सुएज कालव्याच्या उभारणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी समांतर सुएज कालवा उभारताना सरकारने इजिप्तच्या स्वयंपूर्णतेवर भर देत कालव्याच्या काठावर उद्योग वसाहत, महाकाय मासळी उत्पादन प्रकल्प, जहाज बांधणी व दुरुस्ती उद्योगांना चालना आणि सिलीकॉन व्हॅलीच्या धर्तीवर वाडी अल् टेक्नॉलॉजीची स्थापना करण्याचा महत्वाकांक्षी व अवाढव्य असा प्रकल्प उभारलेला आहे. मात्र यासाठी विदेशी गुंतवणुकीऐवजी इजिप्शीयन नागरिकांकडून आकर्षक अशा 15.50 टक्के परतावा देणाऱ्या बँक ठेवी स्वीकारून निधी उभारण्यात आला. त्यावेळी एकूण 4.2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित होती.
समांतर सुएज कालव्याचा भाग टप्याटप्याने पूर्ण करून त्यातून वाहतूक सुरु करण्यात आली. यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानावर भर देण्यात आला. कालव्याचे खोदकाम इजिप्त लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाने पूर्ण केले. 1859 साली पहिल्या सुएज कालव्याचे काम करणाऱ्या फ्रान्समधील कंपनीने हा कालवा 99 वर्षांसाठी आपल्या ताब्यात ठेवला होता. त्यानंतर ब्रिटिशांनी त्याचा ताबा घेतला होता. इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जमाल अब्देल नासर यांनी या कालव्याचे 1956 साली राष्ट्रीयीकरण करून हा कालवा आपल्या ताब्यात घेतला होता. त्याची आठवण ठेवत नव्याने बांधण्यात आलेल्या समांतर सुएज कालव्याचे बांधकाम विदेशी गुंतवणुकीपासून दूर ठेवण्यावर विद्यमान राष्ट्राध्यक्ष आब्देल फताह अल् सिसी यांनी भर दिला. तसेच जगासाठी अत्यावश्यक असलेल्या या कालव्याच्या माध्यमातून केवळ विदेशी जहाजांना सेवा देण्यापुरते काम न करता त्याच्या काठावर औद्योगिक वसाहत व जहाज उद्योगाची भरभराट घडवून आणण्याचे काम विद्यमान सरकारने केलेले आहे.
युरोप आणि आशियातील देशांना इजिप्तमधील सुएज कालवा म्हणजे एक वरदान ठरले आहे. दोन्ही बाजूंनी व्यापार करणाऱ्यांसाठी आफ्रिकेला वळसा घालण्याचा मार्ग सुएज कॅनलमुळे टाळता आल्याने हे अंतर सात हजार किलोमीटर्सनी कमी झाले. त्यामुळे नऊ दिवसांचा वेळ वाचू लागला. 1975 साली हा कालवा जलवाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. 2014 साली या कालव्याचे रुंदीकरण हाती घेण्यात आले होते. 2020 पर्यंत 72 किलोमीटरपर्यंत कालव्याचे दुपदरीकरण करण्यात इजिप्त सरकारला यश आले. पण 2021 साली एक एव्हरग्रीन हे महाकाय जहाज या कॅनलमध्ये अडकून पडल्याने इजिप्तचा करोडो डॉलर्सचा महसूल बुडाला. या घटनेनंतर प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असलेली अडचण दूर करण्यासाठी आणखीन 10 किलोमीटरचे रुंदीकरण पूर्ण करून 28 डिसेंबर 2024 रोजी नव्याने बांधलेल्या अतिरिक्त कालव्यातून जहाजांना प्रवेश दिला.
समांतर सुएज कालव्यासाठी आतापर्यंत 8 अब्ज डॉलर्स इतका खर्च करण्यात आलेला आहे. दुपदरीकरणापूर्वी इजिप्त सरकारला वर्षाकाठी 17 हजार जहाजांना हाताळण्यासाठी 8 अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्त होत असे. आता समांतर कालव्यामुळे दिवसाकाठी 48 जहाजांऐवजी 97 जहाजांना मार्गक्रमण करणे शक्य होणार असल्याने या महसूलात वाढ होऊन तो वर्षाकाठी 12.5 अब्ज डॉलर्सवर पोहचणार आहे. त्याचप्रमाणे समांतर कालव्याच्या काठावर औद्योगिक वसाहत उभारल्याने त्याचा फायदा कैकपटीने वाढणार आहे. समांतर सुएज कालव्याच्या उभारणीने राष्ट्राध्यक्ष आब्देल फताह अल् सिसी सरकारने इजिप्तच्या आत्मनिर्भतेकडे वाटचाल सुरु केली आहे.
प्रशांत कामत