For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिंदेंची ग्लोबल ओळख ते शहांसोबतचा प्रवास

06:23 AM Sep 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिंदेंची ग्लोबल ओळख ते शहांसोबतचा प्रवास
Advertisement

राज्यात सध्या गणेशोत्सवाची धुम सुरू असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. दोनच दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ लॉर्डस येथे सन्मानित करण्यात आले, यावेळी एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत भाषण करत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा चेहरा म्हणून संदेश दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकत्र केलेला प्रवास, त्यामुळे शिंदे आणि शहा यांच्या जवळीकीमुळे भाजपात पुन्हा अस्वस्थता पहायला मिळत आहे.

Advertisement

राज्यातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका झाल्यानंतरही राज्याच्या राजकारणात नेहमी राजकीय भूकंपाच्या शक्यता अधुनमधुन वर्तविण्यात येते. त्याला कारण म्हणजे महायुतीतच शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असेलेली वर्चस्वाची लढाई. ऑपरेशन टायगरनंतर एकनाथ शिंदे यांचे दिल्लीतील वजन वाढले आहे. ‘ग्रामीण जनतेतला नेता’ ही एकनाथ शिंदे यांची प्रतिमा, तर देवेंद्र फडणवीस यांना अभ्यासू आणि राज्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून देवाभाऊंची ओळख. नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परदेश दौरा करताना लंडनमध्ये केलेले इंग्रजी भाषण हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे यांना यापूर्वी दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 रोजी शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या पुरस्कारानंतर शिवसेना उबाठाने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत एकत्र असले तरी ते अधुनमधुन एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व वाढविण्यासाठी खेळी करत असतात. राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान जवळपास 30 वर्षानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी विधानभवनात आलेल्या पवारांनी शिंदे यांच्या दालनाला भेट दिली. आता तर शिंदे यांना थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर लंडन येथे तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यामुळे शिंदे यांची राजकीय प्रतिमा आतापर्यंत प्रामुख्याने जमिनीवरचा, सामान्य कार्यकर्त्याशी जोडलेला नेता अशी राहिली. मात्र परदेशातील इंग्रजी भाषणातून त्यांनी स्वत:ला महाराष्ट्राच्या पलीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आत्मविश्वासाने वावरणारा नेता म्हणून दाखविले आहे. या पुरस्कारांनंतर आणि लंडन दौऱ्यानंतर मुंबईत विमानतळावर शिंदे यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. तसेच शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले. शिंदेंना जर उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळालीच तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील महाराष्ट्राची भूमिका मांडायची आपली तयारी असल्याचे शिंदे यांनी दाखवून दिले आहे. दुसरीकडे मुंबई दौऱ्यात पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करत भाजपच्या शीर्ष नेतफत्वाशी असलेले संबंध अधोरेखित करणारा ठरतो. शिंदे आणि शहा यांच्यात यावेळी बंद दाराआड चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येऊन जितके आक्रमक होतील, तेवढे महायुतीतील आणि अमित शहांच्या बुकमध्ये शिंदे यांचे महत्त्व वाढताना दिसणार आहे. अशा वेळी शिंदेंकडून देखील आपली स्वतंत्र राजकीय ओळख अधिक ठळक करण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी भाजपने बंडखोर गोकुळ गीते यांना बळ दिल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा झालेला पराभव, या पराभवासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजप बंडखोर गोकुळ गीते यांना केलेली मदत, त्यामुळे शिंदे यांच्या नाराजीनंतर गीते विजयी झाल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत नाशिकहून गीते यांना घेऊन थेट मुंबईला आले, आणि त्यांचा शिवसेनेत अधिकृत प्रवेश कऊन घेतला गेला. त्यानंतर रायगडचे पालकमंत्री पदावर भरत गोगावले यांची निवड झाल्यानंतर, कुठे तरी राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे हे फडणवीस यांना भारी पडत असल्याचा संदेश गेला. विधानपरिषद उपसभापती पदासाठी शिंदे यांनी सचिन अहिर यांना उमेदवारी देत केलेली खेळी बघता, शिंदे यांचा हा राजकारणातील मास्टरस्ट्रोक मानला गेला. झेन-झीच्या आंदोलनानंतर देशात आणि राज्यात भाजपविरोधी वातावरण होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय हे त्यांची जनसामान्यांचा नेता म्हणून प्रतिमा बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरले. मग ती लाडकी बहीण योजना असो, की आनंदाचा शिधा असो, त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वावरच विश्वास हा गेल्या अडीच वर्षानंतरही कमी होताना दिसत नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्याला कोणाला संधी मिळणार यावर आता राज्यातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहे.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.