For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

समुद्रातून विमानतळापर्यंत ; सोने तस्करीचे बदलते साम्राज्य !

06:42 AM Oct 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
समुद्रातून विमानतळापर्यंत    सोने तस्करीचे बदलते साम्राज्य
Advertisement

समुद्राने मुंबईला तस्करीचा इतिहास दिला आहे. तर विमानतळ आता त्याचा नवा अध्याय लिहितोय! 1993 साली समुद्रमार्गे उतरलेल्या शस्त्रs आणि स्फोटकांनी मुंबईला रक्तरंजित धडा दिला. यामुळे आज विमानतळावर उतरलेल्या सोन्याच्या प्रत्येक कणाकडे त्या इतिहासातून शिकून पाहण्याची वेळ आली आहे. प्रश्न आता ‘किती सोने पकडले?’ हा नसून या सोन्यामागे लपलेले साम्राज्य किती मोठे आहे?हा आहे.

Advertisement

मुं बईच्या गुन्हेगारी इतिहासात समुद्र आणि तस्करी यांचे नाते जुने आहे. एकेकाळी अरबी समुद्राच्या लाटांवरून छोट्या होड्या मुंबई, रायगड आणि गुजरातच्या किनाऱ्याकडे येत असत. अंधाराचा फायदा घेत किनाऱ्यावर उतरणारा माल काही क्षणांत ठरलेल्या हातात पोहोचत असे. सोने, चांदी, परदेशी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या तस्करीतून मोठा काळा पैसा निर्माण झाला आणि याच पैशातून मुंबईच्या अंडरवर्ल्डला आर्थिक ताकद मिळाली. मात्र, काळ पुढे गेला, सुरक्षा यंत्रणा बदलल्या आणि समुद्रावरची नजर अधिक करडी झाली. तस्करांनीही आपला मार्ग बदलला. समुद्रमार्गावरील लँडिंगची जागा विमानतळाने घेतली. होड्यांची जागा विमानांनी घेतली. किनाऱ्यावर माल स्वीकारणाऱ्यालँडिंग एजंटची जागा आता विमानतळावरील पायलट-कर्मचाऱ्यांनी घेतल्याने समुद्रातील सोने तस्करीला नवा आयाम मिळाला आहे.

मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेली ताजी कारवाई या बदललेल्या तस्करीच्या चेहऱ्याची धक्कादायक झलक दाखवते. 30 सप्टेंबर रोजी डीआरआयने विमानतळातील एका कर्मचाऱ्याला अडवले. तो दुबईला जाणाऱ्या भारतीय प्रवाशाकडे हिरे देत असल्याचे आढळले होते. त्याच्याकडे मेणाच्या स्वरूपात सोन्याची पावडर असलेल्या तीन कॅप्सूलही आढळल्या. त्यानंतर तपासाची साखळी पुढे सरकली आणि दुबई, दोहा, जेद्दाह आणि फुजैरा येथून येणारे आणखी पाच प्रवासी विमानतळातील त्याच कर्मचाऱ्याकडे सोने सुपूर्द करणार असल्याचे उघड झाले. डीआरआयने सापळा रचून या सर्वांना पकडले. या कारवाईत 8.564 किलो 24 कॅरेट परदेशी सोने, सुमारे 12.64 कोटी ऊपये किमतीचे, तसेच 1 हजार 168.97 कॅरेट हिरे, सुमारे 1.09 कोटी ऊपये किमतीचे जप्त करण्यात आले. आठ जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, या कथित जाळ्यात सोने भारतात आणणे ;आणि हिरे भारताबाहेर पाठवणे, असे साटेलोटे असल्याचे आढळून आले.  या कारवाईतील सर्वात गंभीर बाब म्हणजे विमानतळावरील गुप्त हात. सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून वाचण्यासाठी तस्करांनी बाहेरून माणूस शोधण्याऐवजी विमानतळावरीलच मासा गळाला लावला. परदेशातून आलेला प्रवासी सोने घेऊन येणार, ते विमानतळावरील गळ्याला लागलेल्या माश्याकडे सोपवणार आणि पुढे ते सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा कट होता. मात्र सदरचा कट डीआरआयने वेळीच हाणून पाडला. तर याचदरम्यान भारतातून दुबईला जाणाऱ्या प्रवाशामार्फत हिरे बाहेर पाठवले जात होते. म्हणजे सोने आत आणि हिरे बाहेर असा हा साटेलोट्याचा कार्यक्रम होता. एवढेच नाही तर जुलैमध्येही डीआरआयने मुंबई विमानतळावर 3.866 किलो सोन्याची, सुमारे 5.63 कोटी ऊपये किमतीची, जप्ती केली होती. या प्रकरणात विमानतळावरील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कथित वापर करून विमानात लपवलेले सोने बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले.

Advertisement

मात्र, मुंबईतील सोन्याच्या तस्करीचा हा नवा चेहरा पाहताना त्याचा जुना इतिहास विसरता येणार नाही. कारण या शहराने समुद्रमार्गे चालणाऱ्या तस्करीचा काळ जवळून पाहिला आहे. मुंबईच्या किनाऱ्यावरून परदेशी सोने उतरवण्याच्या व्यवसायाने अनेक गुन्हेगारी टोळ्यांना आर्थिक बळ दिले. हाजी मस्तानपासून पुढे दाऊद इब्राहिमपर्यंतच्या अंडरवर्ल्डच्या इतिहासात तस्करीचा संदर्भ वारंवार येतो. समुद्रातील निर्जन ठिकाणे, छोटी बंदरे, खाड्या आणि स्थानिक संपर्क यांचा वापर करून माल उतरवणे आणि तो शहरातील सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, ही त्या काळातील तस्करीची कार्यपद्धती होती. या समुद्री तस्करीच्या जाळ्याने पुढे किती भयंकर वळण घेतले, याचा पुरावा 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटाने दाखवून दिले.  1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाच्या कटात समुद्रमार्गे भारतात मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि आरडीएक्स आणण्यात आले होते. रायगडच्या किनाऱ्यावरील शेखाडी आणि दिघी येथे शस्त्रसाठा उतरवण्यात आला होता. 2026 मध्ये या जुन्या प्रकरणात जामनगरच्या विशेष टाडा न्यायालयाने 1993च्या गोसाबारा शस्त्रसाठा प्रकरणात 12 जणांना दोषी ठरवले. या प्रकरणात दाऊदशी संबंधित कट, पाकिस्तानशी जोडलेले समुद्री मार्ग आणि स्फोटके, रायफल्स, हँडग्रेनेड्स व इतर शस्त्रसाठा समुद्रमार्गे भारतात आणण्यात आला होता. हा शस्त्रसाठा ‘सदा अल बहार’ या नौकेतून आणण्यात आला होता.

हा इतिहास मुंबईसाठी केवळ भूतकाळ नाही तो एक इशारा आहे. कारण तस्करीचा मार्ग एकदा तयार झाला की त्याचा वापर केवळ आर्थिक गुह्यांसाठी होईलच असे नाही. 1993च्या घटनांनी हे अत्यंत भयावह पद्धतीने दाखवून दिले. सोन्याच्या तस्करीसाठी वापरले जाणारे समुद्री रस्ते, स्थानिक लँडिंग एजंट, वाहतूक व्यवस्था आणि गुप्त संपर्क याच प्रकारच्या संरचनेचा वापर पुढे अधिक गंभीर गुन्हेगारी कटात होऊ शकतो, ही मुंबईने अनुभवलेली कटू वस्तुस्थिती आहे. अर्थात, आज विमानतळावर पकडल्या जाणाऱ्या सोन्याच्या तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ही तस्करी देशाला आतून खोकला बनवित चालली आहे. कारण आज सोने तस्करी सुऊ आहे, उद्या स्फोटके देखील येतील, यामुळे या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याची चुक करता कामा नये. पूर्वी तस्करांना समुद्रात उतरण्यासाठी लँडिंग एजंटची गरज होती. किनाऱ्यावर माल घेणारा लँडीग एजंट तो माल सुरक्षित ठिकाणी घेऊन जात होता. आज त्याच साखळीचे आधुनिक रूप विमानतळावर दिसते. परदेशातून येणारा प्रवासी हा विमानतळावरील कर्मचाऱ्याकडे सोने अथवा तस्करीचा माल देत आहे. कारण हा माल कर्मचाऱ्यांच्या गुप्त हातात असल्याने, तो सुरक्षितपणे बाहेर येत आहे. म्हणूनच विमानतळावर पकडला गेलेला प्रवासी हा या गुन्हेगारी साखळीचा खरा सूत्रधार असेलच असे नाही. तो अनेकदा फक्त एक प्यादा असू शकतो. त्याच्या मागे परदेशातील पांढरपेशी गुन्हेगार मुंबईतील तस्कर, आर्थिक व्यवहार सांभाळणारे, विमानतळावरील गळाला लागलेले मासे अशी मोठी साखळी असू शकते. त्यामुळे तपास यंत्रणांसमोरचे आव्हान केवळ सोने जप्त करण्याचे नाही. तर सोन्याच्या मागचा पैसा आणि पैशाच्या मागची माणसे शोधण्याचे आहे. आज दुबई, दोहा, जेद्दाह आणि फुजैरा यांसारख्या मार्गांवरून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून तस्करी होत असल्याचे ताज्या कारवाईत दिसून आले आहे. म्हणजेच तपास यंत्रणांना फक्त प्रवाशांच्या संशयास्पद हालचालींकडे पाहून चालणार नाहीय तस्करीमागील संपूर्ण आर्थिक आणि मानवी नेटवर्क उघड करावे लागणार आहे. तरच या समुद्रातून विमनतळापर्यंत पोहचलेल्या सोने तस्करीच्या साम्राज्याचा आवाका समजेल.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.