For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेफ सिटीपासून स्ट्रेस सिटीपर्यंत

06:01 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
सेफ सिटीपासून स्ट्रेस सिटीपर्यंत
Advertisement

पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे राज्य पुन्हा हादरून गेले आहे. तर याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंवेदनशील वक्तव्य केल्याने संताप वाढला आहे. ममता बॅनर्जी यांनी जवळपास व्हिक्टिम ब्लेमिंग करत युवती रात्री उशिरापर्यंत बाहेर होती असे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बेजबाबदार वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे कोलकाता समवेत पूर्ण राज्य महिलांसाठी सुरक्षित मानले जात होते, परंतु आता कोलकाता तसेच पश्चिम बंगाल राज्यच आता महिलांसाठी असुरक्षित ठरत चालले आहे. यात संदेशखाली येथील महिलांचे राजकीय नेत्याकडून झालेले लैंगिक शोषण, मुर्शिदाबाद येथील दंगलीवेळी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे.

Advertisement

जवळपास एक वर्षापूर्वी कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची धग अद्याप कायम असताना पश्चिम बंगालमधील आणखी एक शहर दुर्गापूरमध्ये अशीच घटना घडली आहे. येथील एका खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. विद्यार्थिनीच्या गंभीर स्थितीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यामुळे लोकांचा संताप वाढला आहे. घटनेवर दु:ख व्यक्त करताना मुख्यमंत्री पीडिता रात्री बाहेर होती याची पुस्ती जोडण्यास विसरल्या नाहीत.

नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) सातत्याने अनेक वर्षांपर्यंत कोलकाता शहराला देशातील सर्वात सुरक्षित शहर मानले. येथे दर लाख लोकसंख्येमागे सुमारे 90 गुन्हे नोंद झाले. हे प्रमाण अन्य शहरांच्या तुलनेत कमी आहे. 2016 पूर्वी  कोलकात्यात गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होते, परंतु त्यानंतर गुन्ह्यांचा दर कमी होऊ लागला, एवढेच नाही तर महिलांसाठी देखील निवडक सुरक्षित शहरांमध्ये कोलकाता सामील होते. कोलकात्यात महिला रात्री उशिरापर्यंत सुरक्षितपणे फिरू शकतात असा दावा करण्यात येत होता. परंतु आता कोलकाता समवेत पश्चिम बंगालच्या अनेक मोठ्या शहरांच्या सुरक्षा व्यवस्थेला बसलेला धक्का ठळकपणे दिसू लागला आहे. खासकरून मुख्यमंत्री पदावर बसलेल्या महिला नेत्याकडून महिलांनी रात्री फिरू नये, किंवा निर्जन भागात सतर्क रहावे अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात आल्यावर सुरक्षेची खात्रीच देता येत नाही.

Advertisement

मागील वर्षी ऑगस्टमध्ये कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. यानंतर अनेक महिन्यांपर्यंत कोलकात्यात निदर्शने होत राहिली. मृत महिला डॉक्टराच्या पालकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर असंवेदनशीलतेचे आरोप देखील केले. तर चालू वर्षात जुलै महिन्यात कोलकात्यातीलच एका लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले.

आता दुर्गापुरात मिळतीजुळती घटना घडली आहे. खासगी मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर 10 ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार झाला, ज्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली होती. महिला सुरक्षेवरून पश्चिम बंगाल सातत्याने घेरला जात आहे. देशातील सर्वात गुन्हेमुक्त शहरांमध्ये देखील त्याचा दर्जा खालावला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल

राष्ट्रीय महिला आयोगाची शाखा नॅशल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी (एनएआरआय)चा नवा अहवाल प्रकाशित झाला आहे. याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, गंगटोक आणि ईटानगर या शहरांना महिला सुरक्षेप्रकरणी आघाडीचे स्थान देण्यात आले आहे. तर कोलकाता आता सर्वात असुरक्षित शहरांमध्ये सामील आहे. कोलकात्याच्या श्रेणीतच दिल्ली, जयपूर, फरिदाबाद, श्रीनगर आणि रांची यासारखी शहरे सामील आहेत. 31 शहरांच्या जवळपास 13 हजार महिलांशी झालेल्या चर्चेनंतर हे सर्वेक्षण ऑगस्टमध्ये सादर करण्यात आले हेते. नॅशनल सेफ्टी स्कोरशी तुलना करत महिलांना स्वत:च्या शहराला अधिक चांगले, कमी सुरक्षित, अत्यंत कमी सुरक्षित या श्रेणी द्यायच्या होत्या. सर्वेक्षणात कोलकात्याला सर्वात असुरक्षित शहर ठरविण्यात आले. ही स्थिती देखील लैंगिक हिंसेला तोंड दिलेल्या महिला कमी संख्येत त्यासंबंधी तक्रार नोंदवत असताना आहे. शोषणग्रस्त तीनपैकी दोन महिला त्यासंबंधी मौन बाळगत असल्याचे नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्युरो देखील मानतो. कोलकात्याच्या महिलांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला अत्यंत सुरक्षित ठरविले आहे. सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करताना हिंसा झेलल्याचे 7 टक्के महिलांनी मान्य केले आहे. तर 24 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांसाठी हा आकडा दुप्पट झाला आहे. रात्री उशिरा प्रवास या जोखिमीला अनेक पटीने वाढवत असतो.

अवैध स्थलांतरितांमुळे होतेय समस्या?

कोलकाता समवेत पूर्ण पश्चिम बंगालमध्ये विदेशी स्थलांतरितांची संख्या वाढल्याचा आरोप काही काळापासून सातत्याने केला जात आहे. कथित स्वरुपात घुसखोर बांगलादेशातून येत असून ते मुख्य प्रवाहाशी ताळमेळ न राखता आल्यावर गुन्हेगारीत सामील होतात. राज्यात घुसखोरांची अचूक संख्या सांगणे अवघड आहे, वेगवेगळ्या स्रोतांनुसार यातील अनेक बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगालमधून देशाच्या इतर हिस्स्यांमध्ये फैलावत असल्याने अचूक आकडा सांगणे शक्य नाही. भारत-बांगलादेश सीमा पुंपणाशिवाय असणे अत्यंत मोठे आव्हान ठरले असून दलदलयुक्त क्षेत्रात अवैध स्थलांतरासोबत तस्करीसारख्या कारवाया घडत असल्याचे गृह मंत्रालयाने 2022 च्या अहवालात नमूद केले होते.

पोलिसांची तुलनेत कमी संख्या

राज्यात पोलीस दलात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नागरी स्वयंसेवक योजना सुरू करण्यात आली आहे. यात सामील लोक सामान्य असतात, जे पोलिसांना मदत करतात. उत्सव, निवडणूक किंवा व्हीआयपी दौऱ्यावेळी स्थिती सांभाळण्यास हे नागरी स्वयंसेवक पोलिसांना मदत करतात. याकरता त्यांना भत्ता देखील मिळतो. ही योजना प्रत्यक्षात ‘विन-विन’ची स्थिती निर्माण करण्यासाठी लागू करण्यात आली हाती, परंतु यात त्रुटीच अधिक निघू लागल्या. हे लोक पोलिसांचा गणवेश परिधान करून शक्तिचा गैरवापर करू लागले. आरजी कर रुग्णलयातील बलात्कार-हत्या प्रकरणाचा दोषी संजय रॉय स्वत: नागरी स्वयंसेवक होता. लोकसंख्येनुसार पोलिसांचे संख्याबळ वाढविण्याऐवजी राज्याने प्रशिक्षणरहित युवांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यास का सुरुवात केली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ढिसाळ कारवाई

राज्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी झालेली कारवाई देखील अपुरी आहे. तर या प्रकरणातील गुन्हेसिद्धीचा दर तर त्याहून कमी आहे. 2021 मध्ये पोलिसांनी महिलांवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी पावणेचार लाख गुन्हे नोंद केले, यातील केवळ 5 टक्के प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली तर केवळ 750 प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे. हे प्रमाण सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामंध्ये सर्वात कमी आहे. या स्थितीपासून वाचण्यासाठी महिला देखील गुन्हे घडल्यावरही पोलिसांकडे जात नसल्याचे चित्र वाढले आहे.

काय-काय बदलतेय कोलकात्यात

- शहराचे काही भाग म्हणजेच सॉल्ट लेक आणि पार्क स्ट्रीटनजीक, रात्री उशिरा पोलिसांची उपस्थिती अत्यंत कमी असते.

-मेट्रो किंवा बससेवा रात्री लवकर बंद होते, रात्री उशिरा परतणाऱ्या महिलांना कॅब घ्यावी लागते किंवा निर्जन रस्त्यांवरून जावे लागते, यामुळे असुरक्षितता वाढते.

-राज्याच्या सीमा अत्यंत संवेदनशील मानल्या जात राहिल्या आहेत, तेथून दहशतवादी संघटनांच्या कारवाया रोखण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा अनेकदा छापे टाकतात.

-सीमेला लागून असलेल्या हिस्स्यांमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत आहे. मालदाच्या कलियाचकची तुलना तर आता अफगाणिस्तानसोबत केली जाते. तेथून अमली पदार्थांपासून शस्त्रास्त्रांची तस्करी होत असते.

कोलकाता सुरक्षित असल्याची धारणा

अनेक वर्षांपासून कोलकाता हे शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याची धारणा होती. परंतु पोलिसांकडे नोंद गुन्ह्यांची आकडेवारी बहुधा खरे सत्य लपवित असावे. सुरक्षेच्या नॅरेटिव्हकरता राज्य सरकारकडून ‘संख्यात्मक ब्लँकेट’ पसरवून स्थिती सामान्य असल्याचा देखावा केला जातो, परंतु प्रत्यक्षात मोठ्या संख्येत अनेक कारणांमुळे गुन्हेच नोंदविले जात नाही, असे जादवपूर विद्यापीठ आणि प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनांचे सांगणे आहे. पश्चिम बंगालमध्ये आता व्हिक्टिम ब्लेमिंगचा प्रकार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच केल्याने त्यांची री आता त्यांच्या पक्षाचे सर्वच नेते ओढत असल्याचे दिसून येते. कोलकात्यासह राज्यातील सर्व शहरांमध्ये विद्यार्थिनी आता परस्परांना सतर्क करू लागल्या आहेत. कुठला रस्ता टाळायचा, कुठली कॅब स्वीकारू नये, लवकर कसे परतावे याबद्दल विद्यार्थिनींचा समूह मार्गदर्शन करत आहे.

संकलन : उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :

.