पंतांचा वाडा ते अवकाशातील भरारी !
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
कोल्हापुरात महाद्वार रोडला लागून राजोपाध्ये बोळ आहे. या बोळातील पंतांच्या वाड्यात शिरोळकर कुटुंब राहायला. या शिरोळकर कुटुंबातील प्रभाकर शिरोळकर एस. एम. घाटगे अँड सन्स या खासगी कंपनीत कामाला. परिस्थिती कष्टाळू मध्यमवर्गियाला साजेशी. घर चालवण्यासाठी त्यांची दोन्ही मुलेही काहीतरी करून कुटुंबाला हातभार लावत होती. म्हटलं तर या माहितीत तसे फार काही वेगळे नाही. पण या पुढच्या माहितीत सारे काही वेगळेच आहे. इतरांना स्फूर्तीदायक आहे. कष्टावर एखाद्याला किती मोठे अवकाश पार करता येते, याचे हे उदाहरण आहे.
या शिरोळकरांचा शांताराम हा मुलगा भारतीय हवाई दलात सर्व्हिसेस कमिशनची परीक्षा देऊन पायलट ऑफिसर म्हणून रुजू झाला. महाद्वार रोडवरच्या पंत बोळातून तो चक्क अवकाशात हवेवर स्वार झाला. पायलट झाला म्हणजे जरूर एक वेगळे कर्तृत्व दाखवून गेला. पुढे तो ग्रुप कॅप्टन झाला. यातही काही जण म्हणतील, यात एवढे काय वेगळे? पण खरोखर याहून पुढे वेगळेच आहे.
या शांताराम यांना पत्नी भाग्यश्री मिळाली. तीही भारतीय वायुसेनेत ग्रुप कॅप्टन. नवरा-बायको दोघे हवेत. त्यांचा मुलगा रोहन हा देखील भारतीय वायुसेनेत स्क्वाड्रन लीडर म्हणून निवडला गेला. त्याला पत्नी मिळाली अदिती. ती ही वायुसेनेत स्क्वाड्रन लीडर. आई, वडील, मुलगा, सून चौघेही वायुसेनेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने क्षितीज भरारी घेतली. पण त्याही पुढे आणखी वेगळेच. त्यांची मुलगी रश्मी. ती आपले आई, बाबा, भैय्या, वहिनी यांची भरारी पाहून घरी निवांत कशी बसेल? तीनेही हवेत झेप घेतली. ती इंडिगो एअरलाईन्समध्ये पायलट झाली. एका घरातील आई, बाबा, मुलगा, सून, मुलगी या पाच जणांची ही खऱ्या अर्थाने गगन भरारी ठरली.
या कर्तृत्वामागे शिरोळकर कुटुंबातील कुटुंबाला कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मूळ कुटुंबाची परिस्थिती ही बेताची. सर्वसाधारण या कुटुंबाचे प्रमुख प्रभाकर खासगी नोकरीला. पण परिस्थितीवर कायम नकारात्मक बोलत न बसता त्यांनी मुलांना घडवले. एकालाही खासगी क्लास लावला नाही. कारण मोठी फी भरण्यासारखी त्यांची परिस्थिती नव्हती. मुलांनी ही परिस्थिती जाणली आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या कर्तृत्वावर टप्प्याटप्प्याने यशाची गगन भरारी घेतली. कुटुंबप्रमुख शांताराम हे चारच दिवसांपूर्वी ग्रुप कॅप्टन पदावरून निवृत्त झाले. आता त्यांची बायको भाग्यश्री, मुलगा रोहन, सून आदिती भारतीय वायुसेनेत चंदिगड येथे आहे. मुलगी बंगळूर येथे इंडिगो एअरलाईन्समध्ये पायलट आहे. शांताराम यांचे भाऊ संजीव हे नुकतेच न्यायालय अधीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. या शिरोळकर कुटुंबाचे खऱ्या अर्थाने हे गगनभरारी यश आहे आणि या यशाचे सारे श्रेय ते शिक्षण आणि आई-वडिलांच्या कष्टाला देत आहेत.