For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सामान्य ते सर्वमान्य’!

07:45 AM Jan 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘सामान्य ते सर्वमान्य’
Advertisement

दामू नाईक प्रदेशाध्यक्षपदी आरूढ : कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, शुभेच्छांचा वर्षाव

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

एखादी मोठी निवडणूक जिंकावी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत आपल्या नेत्याचे स्वागत करावे, तशा थाटात दामू नाईक यांनी शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली. अशाप्रकारे एखाद्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी ‘न भूतो’ अलोट गर्दी ‘याची डोळा’ पाहण्याची संधी कार्यकर्त्यांना लाभली आणि प्रत्येकाने जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी आधीच कार्यकर्त्यांच्या गर्दीने ‘ओव्हरफ्लो’ झालेले गोमंतक मराठा समाजाचे सभागृह सनई-चौघडा, ढोल ताश्यांचा दुमदुमणारा आवाज आणि कार्यकर्त्यांनी विक्रमी संख्येने आणलेल्या फुलांच्या प्रसन्न सुगंधाने भरून गेले होते.

Advertisement

पणजीत मराठा समाज सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मावळते प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांच्यासह तमाम मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल यांनी दामू नाईक यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तब्बल 40 फुटांचा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. त्याचवेळी बाहेर फटाक्यांचीही जोरदार आतषबाजी करण्यात आली.

अंतर्गत बाबी वाऱ्यावर घालू नका : दामू

त्यानंतर बोलताना दामू नाईक यांनी, भाजपशी संलग्न प्रत्येक कार्यकर्ता हा एका कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबातील कोणताही वाद-विवाद, नाराजी, अंतर्गत बाबी वाऱ्यावर (समाजमाध्यमांवर) घालू नका, असे आवाहन त्यांनी केले. आता 2027 मध्ये विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याने घरचे काम समजून आणि किमान 27 मतदारसंघ जिंकण्याचे ध्येय बाळगून वावरावे, अशी हाकही नाईक यांनी दिली.

आतापर्यंतच्या प्रत्येक प्रदेशाध्यक्षाने पक्षाचे संघटन बळ वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांचा वारसा चालवताना आपणही शक्य तेवढे योगदान देणार आहे. पक्षासाठी नवीन कार्यकर्ते तयार करणे हे आपले मुख्य ध्येय असेल व त्यांच्याच बळावर आगामी जिल्हा पंचायत, पालिका आाणि विधानसभा निवडणूक जिंकणार आहे, असे ते पुढे म्हणाले.

न्यूनता असलेल्या मतदारसंघांमध्ये पक्षबळ वाढविणार : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोलताना, भाजपला 2027 ची निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकून पुन्हा सत्तास्थानी यावयाचे असल्याचे सांगितले. कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद असून त्यांच्याच बळावर आगामी सर्व निवडणुका आम्ही जिंकणार आहोत. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे बळ वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही काही मतदारसंघात अद्याप अपेक्षित कार्यकर्ता बळ वाढलेले नाही. त्यात वेळ्ळी, मडकई आदी मतदारसंघांचा समावेश असून अशा मतदारसंघांवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नवीन मुख्यालयाचेही उद्घाटन करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

आगामी निवडणूक तयारी 50 टक्के पूर्ण : तानावडे

खासदार सदानंद तानावडे यांनी बोलताना, विधानसभा निवडणूक जरी 2027 मध्ये होणार असली तरी आम्ही यापूर्वीच त्यादृष्टीने काम सुरू केले असून आतापर्यंत 50 टक्के तयारी पूर्णही झाली आहे, असे सांगितले. मेळाव्यास उपस्थित अन्य मान्यवरांमध्ये मंत्री माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाई, राजेश फळदेसाई, आलेक्स सिक्वेरा, रोहन खंवटे, आमदार दिगंबर कामत, दिव्या राणे, प्रेमेंद्र शेट, ऊडाल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर यांच्यासह माजी खासदार नरेंद्र सावईकर, विनय तेंडुलकर तसेच असंख्य माजी आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.

श्री. तानावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सिद्धार्थ कुंकळकर यांनी सूत्रसंचालन केले तर निवडणूक निरीक्षक प्रेमानंद म्हांबरे यांनी आभार मानले.

दुखावलेले, दुरावलेले, फारकत घेतलेले कार्यकर्तेही उपस्थित

दामू नाईक यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभरातून शेकडो कार्यकर्ते पणजीत जमले होते. त्यामध्ये विविध कारणांमुळे दुखावलेले, दुरावलेले, फारकत घेतलेले नेते, पदाधिकारी यांचीही लक्षणीय उपस्थिती होती हे विशेष. त्यावरूनच दामूंच्या लोकप्रियतेची प्रचिती येत होती. सकाळी 10.15 पर्यंत सभागृह खचाखच भरले होते. तरीही कार्यकर्ते येतच होते. त्यामुळे न ओसरणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणखी खुर्च्या घालाव्या लागल्या. सरते शेवटी इमारतीच्या छतावर स्क्रीन उभारून व खुर्च्या घालून कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम पाहण्याची सोय करावी लागली.

शुभेच्छांचा दोनेक तास वर्षाव

दामू नाईक भाषणास उभे राहिले असता कार्यकर्त्यांनी ‘दामू तूम आगे बढो’, अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांना काही वेळ ब्रेक घ्यावा लागला. ही गर्दी एवढी प्रचंड होती की कार्यक्रम संपल्यानंतर पुढील दोनेक तास त्यांना कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी थांबावे लागले. त्यानंतर त्यांनी मिरामार स्व. मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन पुष्पांजली वाहिली.

Advertisement
Tags :

.