For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मेघदूत’पासून ‘ईमेल’ पर्यंत...

06:40 AM Jul 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मेघदूत’पासून ‘ईमेल’ पर्यंत
Advertisement

सध्याच्या स्मार्टफोन्सच्या युगात पोस्टाचे महत्व राहिलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ काही वर्षांपूर्वीच ‘पोस्टमन’ची वाट पाहणे हा अनेकांचा, विशेषत: मुलांचा छंद असायचा. कारण त्याने आणलेली पत्रे वाचणे आणि त्यांना उत्तरे लिहून पाठविणे हे एक महत्वाचे काम त्यावेळी असायचे. पण आता ती हुरहुर आणि तो आनंद यांना आपण पारखे झालेलो आहोत. पण त्या काळाच्या स्मृती जपण्याचे काम जे करत आहेत, त्यांच्यात राजस्थानातील बिकानेर येथे वास्तव्य करणारे भारत भूषण गुप्ता हे आहेत. त्यांच्याकडे भारतात पोस्ट विभागाचा प्रारंभ झाल्यापासून ते आत्तापर्यंतची पोस्टकार्डे, आंतरदेशीर पत्रे आणि पाकिटे यांचा एक दुर्मिळ संग्रह आहे. भारतात 1889 मध्ये देशव्यापी पोस्टसेवेचा प्रारंभ झाला, असे मानण्यात येते. तेव्हापासून आतापर्यंतची सर्व किमतींची पोस्टकार्डे, तसेच आंतरदेशीर पत्रे आणि पाकिटे गुप्ता यांच्या संग्रही आहेत. अनेकजण हा संग्रह पाहण्यासाठी त्यांच्या वास्तव्यस्थानाला भेट देत असतात. त्यांच्या संग्रहात महाराणी व्हिक्टोरिया, महाराजा एडवर्ड, महाराजा पंचम जॉर्ज, महाराजा शष्ठम जॉर्ज आदींच्या काळातली कार्डे, पाकिटे सुरक्षित आहेत. हा केवळ संग्रह नाही, तर तो भारताच्या पोस्ट सेवेचा सांस्कृतिक इतिहासच आहे, असे गुप्ता यांचे म्हणणे आहे.

Advertisement

प्रारंभी एका पोस्टकार्डाची किंमत 3 पैसे होती. कालांतराने ती आज 50 पैशापर्यंत पोहचली आहे. आजच्या ईमेलच्या युगातही काही प्रमाणात पोस्ट कार्डे उपयोगात आणली जातात. याचा अर्थ असा की इतर वस्तूंच्या तुलनेत पोस्ट कार्डांचे दर काही फार महागलेले नाहीत, असे दिसून येते. अशी प्रथमपासून आजवरची 50 हून अधिक पोस्टकार्डे त्यांच्या संग्रही आहेत. जुन्या काळात ‘स्पर्धा पोस्टकार्ड’ नावाचा प्रकार होता. त्याची किंमत त्याकाळीही 2 रुपये होती. आज या प्रकारची पोस्टकार्डे पहावयासही मिळत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. पण हे पोस्टकार्डही त्यांच्या संग्रही आहे. भारताच्या पोस्टसेवेला 100 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा काढलेले पोस्टकार्ड आणि ‘एअरमेल’च्या माध्यमातून पाठविले जाणारे जुने पोस्टकार्डही त्यांच्यापाशी असून ते इच्छुकांना दाखविले जाते. गुप्ता यांच्या पित्याने लिहिलेली पोस्टकार्डेही त्यांनी संग्रही साठविलेली आहेत. पोस्टसेवेने भारतात एक क्रांतीच एकेकाळी घडविली. त्या क्रांतीचे सर्व टप्पे आणि या क्रांतीत झालेली आतापर्यंतची परिवर्तने यांचे दर्शन त्यांच्या संग्रहातून घडते, असे दर्शक म्हणतात.

Advertisement
Advertisement
Tags :

.