इंडोनेशियाच्या प्रकल्पामुळे शिकारी आता संरक्षक
इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावर एक अनोखी योजना राबविली जात असून त्यात वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांना त्यांच्या संरक्षकात बदलत आहे. पश्च्मा कालिमंतन प्रांताच्या गावांमध्ये राहणारे लोक आता जंगलात फिरून ओरंगुटान, माकड, पक्षी आणि अन्य प्राण्यांची छायाचित्रे किंवा आवाज रिकॉर्ड करतात, याच्या बदल्यात त्यांना रोख रक्कम मिळते.
हा केहातिकु प्रोजेक्ट पर्यावरण संस्था बोर्नियो फ्यूचर्सकडून चालविला जात आहे. पूर्वी स्थानिक लोक जंगलातील पक्ष्यांची शिकार करून देशांतर्गत बाजारात विकत होते. आता हेच लोक प्राण्यांना जिवंत ठेवून कमाई करत आहेत. प्राण्यांना मृतपेक्षा अधिक जिवंत अवस्थेत मूल्यवान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 9 गावांमधील शेकडो लोक यात सामील असून दैनंदिन कामासोबत उत्पन्नाचा हा अतिरिक्त स्रोत त्यांच्यासाठी निर्माण झाला आहे.
योजनेचे कार्यस्वरुप
प्रकल्पात भाग घेणारे लोक मोबाइल अॅपद्वारे छायाचित्रे किंवा रिकॉर्डिंग अपलोड करतात, साधारण पक्ष्याच्या एका छायाचित्रावर सुमारे 5 हजार रुपये मिळतात, तर लुप्तप्राय ओरंगुटानच्या छायाचित्रावर 1.30 लाख रुपयापर्यंत रक्कम मिळू शकते. सर्वात यशस्वी पर्यवेक्षक महिन्याला 10 लाख रुपयांपर्यंत कमाई करतो. हे प्रमाण सरासरी शेतमजूराच्या कमाईपेक्षा कित्येक पट अधिक आहे.
हा पैसा मुलांच्या कॉलेजचे शुल्क भरण्यास मदत करतो. जंगलात फिरताना आम्ही कान अन् डोळे उघडे ठेवतो. कधी शेतात काम करताना पक्ष्यांचा आवाज ऐकताच छायाचित्रे काढतो. आतापर्यंत 3 लाख 50 हजारांहून अधिक फोटो-रिकॉर्डिंग जमा झाले आहेत, ज्यातील निम्म्यांचे प्रमाणन होत रक्कम देण्यात आला rआहे. अॅप आणि आर्टिफिशियल सिस्टीमद्वारे नकली किंवा डुप्लिकेट दावे वगळले जातात असे 50 वर्षीय ऑक्टेवियस यांनी सांगितले आहे.
योजनेत सामील बहुतांश लोक शेतकरी असून ते भात, काकाओ, ड्यूरियन आणि क्रॅटमचे पीक घेतात. त्यांच्यासाठी हा साइड जॉब आहे, जो शेतीत अडथळा ठरत नाही. महिलांना खास लाभ झाला आहे. सुंगई अजुंग गावाच्या एंटोनिया उनेंग यांनी स्वत:च्या कमाईतून फ्रीज आणि कराओके मशीन खरेदी केले आहे.
विदेशात काम करणाऱ्या पतीवर निर्भर राहण्याऐवजी आता त्यांच्याकडे स्वत:चे उत्पन्न आहे. यामुळे स्वातंत्र्याची जाणीव वाढली आहे. वृद्ध शेतकरी इमेल्दा दररोज मित्रांसोबत जंगलात जाते. फिरल्याने आरोग्य चांगले राहते, पूर्वी जे रानडुक्कर किंवा हरिण पिक खराब करत होते, आता त्यांना आम्ही वाचवू इच्छितो. दोन गावांनी स्वेच्छेने शिकारीवर बंदी घातली आहे, यातून आर्थिक प्रोत्साहन वर्तन बदलत असल्याचे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षण आणि वैज्ञानिक लाभ
ही योजना केवळ उत्पन्न मिळवून देत नाही, तर वन्यजीवांचे वितरण आणि संख्येतील बदलांचा डाटाही जमविते. बोर्नियो फ्यूचर्सचे संचालक नार्दियोनो यांच्यानुसार पूर्वी एक पक्षी पकडल्यावर 50 हजार रुपये मिळायचे, परंतु आता 5 छायाचित्रांमधून तितकीच कमाई होते आणि पक्षी जिवंत राहून प्रजननही करत आहे.
दीर्घकाळात निरीक्षणामुळे कमाई शिकारीपेक्षा अधिक होऊ शकते. हे मॉडेल प्रोत्साहनाशिवाय लादण्यात आलेल्या संरक्षण कार्यक्रमांपेक्षा प्रभावी पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव पाडू शकतो. परंतु यात आव्हान निधीच्या निरंतरतेचे आहे, उत्साह कमी झाल्यास लोक पुन्हा जुन्या सवयींकडे वळू शकतात असे अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे संशोधक पॉल फेरारो यांचे सांगणे आहे. प्रकल्पाला आतापर्यंत सुमारे 3 लाख डॉलर्सची देणगी प्राप्त झाली आहे. निम्मा पैसा अॅप आणि एआय सिस्टीम विकसित करण्यात खर्च झाली आहे. 2028 पर्यंत निधी पुरणार आहे आणि आणखी दोन गावे लवकरच योजनेत जोडली जातील. यात 73 प्रजातींना सामील करण्यात आले आहे. दीर्घकाळापर्यंत निधी मिळत राहण्यावर आणि लोक संरक्षणाला सवयीत बदलत राहिल्यास योजना यशस्वी ठरणार आहे.