1 फेब्रुवारीपासून टाटाची सर्व प्रवासी वाहने महागणार
किमती 0.7 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्स 1 फेब्रुवारी 2024 पासून त्यांच्या प्रवासी वाहन विभागातील कारच्या किमती वाढवणार आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) देखील समावेश असेल. कंपनीने सांगितले की सर्व वाहनांच्या सरासरी किमतीत 0.7 टक्क्यांनी वाढ केली जाईल. टाटा मोटर्स हे पाऊल उत्पादन खर्चात झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी उचलत आहे.
यापूर्वी, मारुतीने 16 जानेवारीपासून आपल्या सर्व मॉडेल्स कारच्या किमती 0.45 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. याशिवाय, महिंद्राने थार, स्कॉर्पिओ एन, स्कॉर्पिओ क्लासिक आणि एक्सयुव्ही 700 च्या किमती देखील वाढवल्या आहेत. तथापि, महिंद्राने एक्सयुव्ही700 च्या काही व्हेरियंटची किंमतही कमी केली होती.
टाटांची व्यावसायिक वाहनेही 1 जानेवारीपासून महाग झाली आहेत.
एक महिन्यापूर्वी, 10 डिसेंबर रोजी, टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमती 3 टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते की, वाढलेल्या किमती 1 जानेवारी 2024 पासून लागू होतील. यानंतर व्यावसायिक वाहनांच्या वाढलेल्या किमती 1 जानेवारीपासून लागू झाल्या आहेत.