कच्चे तेल ते इंधन-गॅस
इराण आणि इस्रायलमधील युद्धाची तीव्रता आता भारतीय स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचत आहे. देशातील अनेक भागात स्वयंपाकाच्या गॅस (एलपीजी) पुरवठ्याबद्दल चिंता वाढली आहे. सात समुद्रापार चालणाऱ्या या युद्धाचा थेट परिणाम आता देशवासीयांच्या घरातील गॅस सिलिंडरवर होत आहे. भारतीय स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी वापरला जाणारा एलपीजी आखाती देशांमधून आयात केलेल्या कच्च्या तेलापासून बनवला जातो. मध्य-पूर्वेत सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाने या तेलाची पुरवठा साखळी गंभीरपणे विस्कळीत केली आहे. या आंतरराष्ट्रीय संकटाच्या काळात स्वयंपाकघरातील एलपीजी आखाती देशांमधून येणाऱ्या कच्च्या तेलापासून कसा बनवला जातो आणि तो देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या घरातील स्वयंपाकघरापर्यंत कसा पोहोचतो, हे जाणून घेण्यासाठी एलपीजी निर्मितीमागील सर्व कथा अन् व्यथांचा घेतलेला आढावा...
जगाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी ऊर्जा पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि एलएनजीची कहाणी पृथ्वीच्या गर्भातून सुरू होते. या ऊर्जा वस्तू समुद्रीमार्गे, पाइपलाईन आणि मोठ्या टँकरद्वारे सामान्य माणसापर्यंत पोहोचतात. अलिकडच्या काळात पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे, विशेषत: इराणशी संबंधित तणावांमुळे ही संपूर्ण पुरवठा साखळी जागतिक चर्चेचा विषय बनली आहे.
भूगर्भापासून प्रारंभ
कच्चे तेल हे पेट्रोल, डिझेल आणि इतर अनेक इंधनांचा मूलभूत स्त्रोत आहे. इराणसारख्या देशांमध्ये तेल आणि वायूचे प्रचंड साठे आहेत. इराण हा एक प्रमुख ओपेक उत्पादक देश असून दररोज अंदाजे 33 लाख बॅरल कच्चे तेल तयार करतो. जमिनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तेल विहिरी आणि ऑफशोअर प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. कधीकधी ऑफशोअर प्लॅटफॉर्मवरून तेल काढले जाते आणि पाईपलाईनद्वारे किनाऱ्यावर आणून तरंगत्या साठवणुकीच्या जहाजांमध्ये साठवले जाते.
खरे परिवर्तन रिफायनरीमध्ये
कच्चे तेल थेट वापरासाठी योग्य नसते. ते सुरुवातीला रिफायनरीमध्ये म्हणजेच शुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाठवले जाते. रिफायनरीमध्ये ते वेगवेगळ्या तापमानांना गरम करून विविध इंधनांमध्ये रुपांतरित केले जाते. या प्रक्रियेला ‘फ्रॅक्शनल डिस्टिलेशन’ म्हणतात. रिफायनरीज पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी, नाफ्था, बिटुमेन आणि ल्युब्रिकंट्ससह कच्च्या तेलापासून विविध उत्पादने तयार केली जातात. इराणमध्ये अनेक मोठे रिफायनरी कॉम्प्लेक्स असून त्यांची एकूण क्षमता दररोज अंदाजे 26 लाख बॅरल आहे. या प्रक्रियेतून पेट्रोल आणि डिझेल इंधन तयार होण्यासोबतच एलपीजी आणि इतर वायूदेखील वेगळे केले जातात.
‘गॅस सिलिंडर’ची कथा अन् व्यथा...
महासागरातील विहिरीपासून स्वयंपाकघरापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा साखळी म्हणून विचार केला तर ऊर्जेचा प्रवास असा होतो...
- भूगर्भातून कच्चे तेल आणि वायूचे उत्पादन
- पाईपलाईनद्वारे रिफायनरी, गॅस प्रक्रिया संयंत्रात नेणे
- रिफायनरीमध्ये पेट्रोल, डिझेल, एलपीजीमध्ये रुपांतर
- मोठ्या टँक फार्ममध्ये साठवणूक करण्यासाठी पाठवणे
- सुपरटँकर, पाईपलाईन, रेल्वे किंवा टँकरद्वारे वाहतूक
- तेलडेपो आणि इतर वितरण केंद्रांपर्यंत पोहोच्&विणे
- पेट्रोल पंप आणि गॅस सिलिंडरच्या स्वरुपात वितरण.
एलपीजीची निर्मिती
एलपीजी किंवा द्रवीभूत पेट्रोलियम वायू हे प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन वायूंचे मिश्रण असते. ते दोन प्रकारे मिळते...
रिफायनरी प्रक्रिया : जेव्हा कच्चे तेल जमिनीतून काढले जाते आणि पेट्रोल आणि डिझेल तयार करण्यासाठी रिफायनरीजमध्ये शुद्ध केले जाते. या
प्रक्रियेदरम्यान एलपीजीदेखील उप-उत्पादन म्हणून तयार केले जाते.
नैसर्गिक वायूपासून : या व्यतिरिक्त नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करून प्रोपेन आणि ब्युटेन वेगळे केले जातात.
उत्पादन झाल्यानंतर हा वायू उच्च दाबाने द्रवीभूत केला जातो आणि मोठ्या पाइपलाईन, गॅस टँकर किंवा विशेष जहाजांद्वारे विविध ठिकाणी असलेल्या संयंत्रांपर्यंत पोहोच्&विला जातो. त्यानंतर तो सिलिंडरमध्ये भरून विविध एजंट्स किंवा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केला जातो. सिलिंडर किंवा टँकरमध्ये साठवणूक करून वाहतूक सुलभ करण्यासाठी या वायू दाबाने द्रवीभूत केला जातो. नंतर हा वायू घरगुती सिलिंडरमध्ये भरला जातो आणि लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचविला जातो.
‘एलएनजी’चे स्वरुप...
एलएनजी किंवा द्रवीभूत नैसर्गिक वायू हे नैसर्गिक वायूचे द्रवरुप आहे. जेव्हा समुद्रमार्गे लांब अंतरापर्यंत गॅस वाहून नेला जातो, तेव्हा तो अंदाजे -163 अंश सेल्सिअसपर्यंत थंड करून द्रवीकृत केला जातो. यामुळे त्याचे प्रमाण अंदाजे 600 पट कमी होते. ते विशेष क्रायोजेनिक टँकरमध्ये वाहून नेले जाऊ शकते. इराणच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेले ‘साऊथ पार्स गॅस फील्ड’ हे जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असून ते मोठ्या प्रमाणात ‘एलएनजी’ तयार करते.
इंधन साठवणूक
तेल आणि वायू ज्वलनशील असल्यामुळे ते सुरक्षितपणे साठविण्यासाठी मोठ्या
प्रमाणात साठवणूक प्रणाली तयार कराव्या लागतात. ही सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी करता येत नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरुपात इंधन साठवावे लागते.
- भूगर्भातील साठवणूक टाक्या : रिफायनरीज, टर्मिनल्समध्ये
- सागरी टाकी फार्म : समुद्री बंदरे व आसपासचा परिसर
- तरंगती साठवणूक जहाजे : समुद्रात तेल साठविण्यासाठी
- स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह : आपत्कालीन साठवणूक.
इराणच्या खार्ग बेटासारख्या निर्यात टर्मिनल्सवर शेकडो मोठ्या तेल टाक्या अस्तित्वात असून तिथून जगभरात तेल पाठविले जाते. संकटाच्या काळात निर्यात सुरू ठेवण्यासाठी इराण समुद्रातील जहाजांमध्येही सुमारे 20 कोटी बॅरल तेल साठवतो.
इंधन वाहतूक
पाईपलाईनपासून सुपर टँकरपर्यंत विविध मार्गांनी तेल आणि वायूची वाहतूक अनेक टप्प्यात केली जाते.
- पाईपलाईन नेटवर्क : उत्पादन स्थळ म्हणजेच भूगर्भातील साठ्यांपासून रिफायनरीपर्यंत पाईपलाईनद्वारे तेल किंवा वायूची वाहतूक केली जाते.
- रेल्वे आणि ट्रक : पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक तेल टँकर किंवा रेल्वे टँकरद्वारे रिफायनरीजमधून शहरांमधील ऑईल डेपोंपर्यंत वाहून नेले जातात.
- सागरी टँकर : सर्वात जास्त प्रमाणात तेल समुद्रमार्गे वाहून नेले जाते. प्रचंड सुपरटँकर एकावेळी 2 लाख टन तेल वाहून नेऊ शकतात.
होर्मुझची सामुद्रधुनी : जगातील सर्वात महत्वाचा ऊर्जा मार्ग
ऊर्जा व्यापारासाठी इराणचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियन आखातातून बाहेर पडण्याचा मुख्य मार्ग आहे. या अरुंद समुद्री मार्गावरून दररोज जगभरात सुमारे 2 कोटी बॅरल तेल आणि मोठ्या प्रमाणात एलएनजीची वाहतूक केली जाते. हे जागतिक तेल व्यापाराच्या अंदाजे 20 टक्के प्रतिनिधीत्व करते. त्यामुळेच तेथील कोणत्याही तणावाचा जागतिक इंधन-वायू बाजारावर त्वरित परिणाम होतो.
अलिकडील संघर्ष आणि लष्करी तणावामुळे या मार्गावरील वाहतूक वारंवार विस्कळीत झाली आहे. रिफायनरीज, पाईपलाईन आणि गॅस टर्मिनल्सवरील हल्ल्यांमुळे जागतिक पुरवठा साखळीही विस्कळीत होते. याचा थेट परिणाम पश्चिम आशियातून तेल आयात करणाऱ्या देशांवर होतो. भारत या प्रदेशातूनच कच्चे तेल व एलपीजी आयात करत असल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील कोणत्याही व्यत्ययाचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींपासून ते एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेपर्यंत सर्व गोष्टींवर होतो.
इराण, आखाती देश, समुद्री मार्ग आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध हे सर्व जगभरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत आणि स्वयंपाकाचा गॅस किती सहज उपलब्ध असेल हे ठरवतात. अशाप्रकारे जेव्हा-जेव्हा पश्चिम आशियात तणाव वाढतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ तेल बाजारपेठेपुरता मर्यादित नसून तो जगभरातील घरांच्या स्वयंपाकघरापर्यंत, वाहनांच्या इंधन टाक्यांपर्यंत आणि औद्योगिक यंत्रसामग्री निर्मितीपर्यंत जाणवतो.

सावधगिरीच्या उपाययोजना...
होर्मुझ परिसरात भारताच्या युद्धनौका
इराणच्या आखातातील होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात भारताने आणखी युद्धनौका पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या सामुद्रधुनीतून आता भारताच्या तेलवाहक नौका येत असताना या नौकांना अधिक संरक्षण देण्यासाठी भारताने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या आठवडाभरात दोन इंधनवायू वाहन नौका आणि दोन तेलवाहक नौका या सामुद्रधुनीतून सुखरुपपणे भारतात आल्या. अद्यापही जवळपास 18 ते 20 भारतीय ऊर्जावाहक नौका होर्मुझ परिसरात अडकून पडल्या आहेत. त्यांना ही सामुद्रधुनी पार करण्याची अनुमती इराणकडून मिळविण्यासाठी भारताच्या परराष्ट्र विभागाचे सातत्याने प्रयत्न होत आहेत.
युद्ध थांबविण्यासाठी दबाव आवश्यक
हे युद्ध लवकरात लवकर थांबवा, असे आवाहन काही युरोपियन देशांनीही केले आहे. या युद्धामुळे केवळ इंधनाची नव्हे, तर अन्य आवश्यक वस्तुंचीही टंचाई निर्माण होऊ शकते. तसे झाल्यास जगभर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना त्रासाला तोंड द्यावे लागू शकते. जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांनी या संदर्भात पुढाकार घेऊन युद्धमान देशांना परिस्थिती समजावून सांगावी आणि त्यांना युद्धापासून परावृत्त करण्याची गरज आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सागरी संघटनेने (आयएमओ) आखाती प्रदेशातील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी हस्तक्षेप करून तातडीची बैठक घेण्याची आवश्यकता आहे.
- संकलन : जयनारायण गवस