फ्रिट्ज, डिमीट्रोव्ह तिसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था / शांघाय
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या शांघाय मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा सातवा मानांकित टेलर फ्रिट्ज आणि बल्गेरियाचा डिमीट्रोव्ह यांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
दुसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या 26 वर्षीय फ्रिट्जने अॅडमेनीचा 7-6 (7-4), 7-6 (7-5) असा पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. हा सामना 152 मिनिटे चालला होता. दुसऱ्या एका सामन्यात बल्गेरियाच्या डिमीट्रोव्हने बर्गजचा 6-3, 3-6, 6-2 असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत डिमिट्रोव्हची गाठ ऑस्ट्रेलियाच्या पॉपीरीनशी होईल. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या टिफोईने चीनच्या झोयु ईचा 6-2, 6-4, ग्रिकस्पूरने थॉमसनचा 6-3, 6-2 असा पराभव केला. रोमन सैफुलीनने बुबलीकचा 6-4, 6-2 अशह पराभव केला.
वूहान क्लासीक महिलांच्या टेनिस स्पर्धेत 12 व्या मानांकित बिट्रेझ हदाद माईयाने अमेरिकेच्या मॅडीसन किजचा पहिल्याच फेरीतील सामन्यात 7-6(7-5), 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. कॅनडाच्या लैला फर्नांडीसने डायना स्नेडरचा 6-7(5-7), 6-3, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत अमेरिकेच्या कोको गॉफला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. गॉफने अलिकडेच चायना खुल्या टेनिस स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे.