For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रागाच्याभरात मित्राचा सुरा भोसकून खून

08:42 AM Mar 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
रागाच्याभरात मित्राचा सुरा भोसकून खून
Advertisement

पत्नीला अपशब्द वापरल्याने वाद : अवघ्या सहा तासात संशयिताला अटक

Advertisement

प्रतिनिधी/ म्हापसा

कळंगुटमध्ये सध्या चोऱ्या, पर्यटकांना मारहाण, हाणामारीच्या घटना वाढत असतानाच खुनाच्या घटनेने कळंगुट पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. गोव्यात कळंगुट येथे कॅसिनोत काम करण्यासाठी मुंबईहून एकत्रित आलेले मित्र येथील एका रिसॉर्टमध्ये उतरले असता पहाटे त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. संशयित आरोपी कोमल उत्तम बारासकर (रा. मध्यप्रदेश वय 28) याने त्याच्यासमोर असलेला राजभर रविनारायण रामदर्शनभाई याला आपल्यास तुझ्या पत्नीबरोबर बोलायचे आहे, तिला व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये घे, तिला मला पाहायचे आहे आदी अपशब्द वापरल्याने या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले व त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन दोघेही भांडत ऊममधून बाहेर पडले व या रिसॉर्टमध्ये असलेल्या स्विमींग पूलजवळच रागाच्या भरात संशयित आरोपी कोमलने राजभर रविनारायण रामदर्शनभाई याच्या छातीत व पोटात सुरा भोसकल्याने तो जागीच गतप्राण झाला. घटनास्थळाहून संशयिताने पळ काढला असता अवघ्या सहा तासाच्या आत कळंगुट पोलिसांनी आरोपीस जेरबंद करण्यात यश मिळविले. याप्रकरणी अन्य एका संशयिताच्या शोधात पोलिस आहेत. ही घटना शनिवारी सकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान घडली.

Advertisement

याबाबत पोलिस अधीक्षक हरीष मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून एक गट गोव्यात आला होता. हा गट ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, तिथेच हा ‘ऑफ-शोर’ कॅसिनो आहे. या कॅसिनोमध्ये त्यांना काम मिळणार होते म्हणून ते गोव्यात आले होते. या मित्रांनी त्याच हॉटेलमध्ये चार खोल्या आरक्षित केल्या होत्या. काल शनिवारी सकाळी कॅसिनोमधील आर्थिक देवाण-घेवाणवरून प्रथम या मित्रांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या दरम्यान संशयित आरोपीने आपल्यास तुझ्या पत्नीला व्हिडिओ रिलवरून पहायचे आहे, असे म्हणून त्याच्या पत्नीबाबत अपशब्द वापरल्याने दोघांमध्ये बाचाबाची व हाणामारी झाली. संशयित आरोपी कोमल उत्तम बारासकर (रा. मध्यप्रदेश, वय 28) याने राजभर रामदर्शन याला मारीत बाहेर आणले व स्विमींग पुलाजवळ चाकूने त्याला भोसकले असता रक्बंबाळ होऊन तो खाली कोसळला व गतप्राण झाला. त्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिसस्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर व पोलिस पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला आहे. संशयितांनी वापरलेली सुरी पोलिसांनी स्विमींग पुलाच्या पाण्यातून हस्तगत केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस संशयितांच्या मागावर होते. उपअधीक्षक विश्वास कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लक्षी आमोणकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

सुरा स्विमींग पूलमध्ये फेकून आरोपीचे पलायन

जीव वाचवण्यासाठी जखमी राजभर रक्ताळलेल्या अवस्थेतच हॉटेलमधून बाहेर पडला. त्याने रस्ता ओलांडून समोरील एका रिसॉर्टमध्ये जीवाच्या आकांताने आश्रय घेण्याचा प्रयत्न केला मात्र, रागाच्या भरात असलेल्या संशयितांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ दोघांनी त्याला घट्ट पकडले आणि तिसऱ्याने त्याच्यावर सुरीचे सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या राजभरचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी ती सुरी स्विमिंग पूलमध्येच फेकून दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. पीडिताच्या छातीवर आणि पोटावर शस्त्राने केलेले वार दिसत होते, अशी माहिती अधीक्षकांनी दिली.

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खून करण्यासाठी वापरण्यात आलेला सुरा जप्त केला आहे. श्वानपथकाची मदत घेण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटवण्याचे काम सुऊ केले. या प्रकरणातील संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस  उत्तर गोवा अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी व्यक्त केला आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी वास्को येथे पळून गेला असता राज्य पोलिसांनी संशयित आरोपीस वास्को येथून जेरबंद करण्यात यश मिळविले.

शेतात सापडला कान कापलेला मृतदेह

दरम्यान, अन्य एक घटना म्हापसा येथील बोडगिणी भागात उघडकीस आली आहे. मरड बाजूला असलेल्या एका शेतजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला आहे. शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास स्थानिक नागरिकांना हा मृतदेह दिसला. मृत झालेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जखमा असून त्याचा एक कान कापलेला आहे. कान गायब असल्याने पोलिसांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. म्हापसा पोलिस निरीक्षक नवीन देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करीत आहेत. शवचिकित्सा अहवालानंतरच या मृताचे कारण स्पष्ट होणार आहे.

Advertisement

.