मंगळूर जिल्ह्यासाठी शुक्रवार ठरला ‘घातवार’
पावसामुळे विविध दुर्घटनांत सात जणांचा मृत्यू : सतर्कतेच्या सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस होत असून मंगळूर जिल्ह्यात शुक्रवारी एकाच दिवशी विविध दुर्घटनांत सात जणांचा बळी गेला आहे. उळ्ळालनजीक भूस्खलनामुळे वृद्धा आणि तिच्या दोन नातवांचा मृत्यू झाला आहे. तर नेरळकट्टे येथे पावसामुळे शेजारील घराची भिंत कोसळल्याने सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ओडिन्माड येथे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीवेळी विजेचा धक्का बसल्याने मेस्कॉम कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. बंदी असूनही मासेमारीसाठी समुद्रात उतरलेल्या मच्छीमारांचा बोट उलटल्याने मृत्यू झाला आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंगळूर जिल्हा प्रशासनाने डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. मंगळूरच्या उळ्ळालजवळील मोंटेपद कोडी येथे मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पहाटे दोन घरांवर दरड कोसळली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली पाचजण अडकले. त्यातील वृद्धा आणि तिच्या दोन नातवांचा मृत्यू झाला. प्रेमा पुजारी असे वृद्धेचे तर आर्यन व आरुष अशी नातवांची नावे आहेत. तर एक महिला आणि तिच्या मुलाला वाचविण्यात बचाव पथकाचे कर्मचाऱ्यांना यश आले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक पोलिसांनी बचावकार्य हाती घेतले.
नेरळेकट्टे येथे पावसामुळे पूरस्थिती आहे. या भागात जमीन खचल्याने शेजारील घराची भिंत कोसळल्याने महिला आणि तिची सहा वर्षीय मुलगी फातिमा नयीम हे दोघे ढिगाऱ्याखाली सापडले. त्यांना सुरक्षितपण बाहेर काढण्यात आले. परंतु, गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान फातिमाचा मृत्यू झाला.
बोट उलटून दोन मच्छीमार बुडाले
हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने मंगळूर जिल्हा प्रशासनाने समुद्रात न उतरण्याची सूचना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून तोटबेंग्रे येथील यशवंत आणि कमलाक्ष हे दोघे मासेमारी करण्यासाठी समुद्रात उतरले. परंतु, उंच लाटा आणि वादळामुळे बोट उलटल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. बोटीचे अवशेष समुद्र किनाऱ्यावर आढळले आहेत. त्यांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे.
विजेच्या धक्क्याने मेस्कॉमच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
बेळतंगडी तालुक्यातील ओडिन्माड येथे अतिवृष्टीमुळे ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाला होता. दुरुस्तीवेळी विजेचा धक्का लागल्याने मंगळूर वीजपुरवठा निगमचे (मेस्कॉम) कर्मचारी विरेश जैन (वय 27) याचा मृत्यू झाला. बेळतंगडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मंगळूरला आजही ‘रेड अलर्ट’
मंगळूर, चिक्कमंगळूर, उडुपी, कोडगूसह दक्षिण कर्नाटकातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम आहे. या पार्श्वभूमीवर मंगळूर जिल्ह्याला शनिवारी देखील ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.