Kolhapur Leopards News : वारणा परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन, ग्रामस्थांमध्ये भीती
हुजरे यांच्या शेतात बिबट्याची झळपट्टी
वारणानगर : जोतिबा डोंगराच्या उत्तर पायथ्याला असलेल्या जाखले (ता. पन्हाळा) येथे जाखोबाची जाळी येथील हुजरे यांच्या धबधबी नावाने ओळखले जाणाऱ्या शेतामध्ये ऊसाच्या फडातून अचानक बिबट्या बाहेर आल्याने ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्याचा भीतीने थरकाप उडाला. मात्र प्रसंगावधान राखून त्याने इतरांना मोठ्याने आरोळी देत सावध केल्याने बिबट्या पसार झाला आणि मोठा अनर्थ टळला.
काल गुरुवारी हुजरे यांच्या ऊसाला तोड आल्याने ऊस तोडण्याचे काम सुरू होते. त्यावेळी या फडातून बिबट्या अचनकपणे बाहेर पडला. ही घटना अविनाश हुजरे यांनी स्वतः पाहिली. सदर बिबट्याचे त्यांनीकाही सेंकदाचे मोबाईलवर चित्रीकरण केले. हे चित्रण फारसे स्पष्ट दिसत नाही. पण हुजरे यांनी जोरदार वाघ आल्याची आरोळी ठोकत तेथील लोकांना सावध केल्याचे राजू हुजरे यांनी सांगितले.
वारणा परिसरात तसेच जोतिबा डोंगर परिसरात वारंवार बिबट्या लोकांच्या नजरेस पडत आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर अधोरेखित झाला आहे. यापूर्वी याच गावातील वस्तीवर बिबट्याचे हल्ले देखील केल्याच्या घटना घडल्या आहेत. पन्हाळा वनविभागाने या घटनांची वेळोवेळी दखल घेत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.