गुजरातमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के
तीव्रता 2.7 ते 3.8 रिश्टर स्केल : शाळांना सुटी जाहीर
वृत्तसंस्था/ राजकोट
गुजरातमधील राजकोटमध्ये गेल्या 24 तासांत सात भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सौम्य असल्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, हे धक्के 2.7 ते 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या दरम्यान नोंदवले गेले. या नैसर्गिक आपत्तीच्या खबरदारीमुळे राजकोट भागातील शाळांना शुक्रवारी सुटी जाहीर करण्यात आली होती. उपलेटापासून 28 किमी अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. वारंवार येणाऱ्या या धक्क्यांमुळे मोठा भूकंप होण्याची भीती निर्माण झाली होती. शुक्रवारी सकाळी सहा भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला भूकंप सकाळी 6:19 वाजता जाणवला. त्यानंतर साडेसात वाजेपर्यंत आणखी सहा धक्के जाणवले. यापूर्वी गुरुवारी रात्री 8:43 वाजताही भूकंप जाणवला होता. शुक्रवारी सकाळी जाणवलेल्या पहिल्या धक्क्याची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी होती.