फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे
आतापर्यंत फ्रान्सला निमंत्रित करण्याची सहावी वेळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दरवषी प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या ना कोणत्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावषी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. फ्रान्सच्या एखाद्या नेत्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याची ही आतापर्यंतची सहावी वेळ आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात मॅक्रॉन यांच्यापूर्वी 1976 आणि 1998 मध्ये फ्रान्सचे माजी पंतप्रधान जॅक शिराक हे प्रमुख पाहुणे होते. तर माजी राष्ट्रपती व्हॅलेरी गिस्कार्ड डी’एस्टिंग, निकोलस सारकोझी आणि फ्रँकोइस ओलांद हे अनुक्रमे 1980, 2008 आणि 2016 मध्ये प्रमुख पाहुणे होते.
भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिकाधिक मजबूत होत आहेत. दोन्ही देशांमधील व्यवहार आणि बोलणी वाढवली जात आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 14 जुलै रोजी पॅरिसमध्ये आयोजित बॅस्टिल डे परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले होते. नरेंद्र मोदींपूर्वी 2009 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी परेडला पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.
यंदा फ्रान्सच्या राष्ट्रपतींना निमंत्रित करून भारत फ्रान्ससोबतचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करत आहे. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागिदारीच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त तिन्ही सेवांमधील 241 सदस्यीय भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीनेही परेडमध्ये भाग घेतला. भारतीय सैन्य दलाचे नेतृत्व राजपुताना रायफल्स रेजिमेंटसह पंजाब रेजिमेंटने केले. यासोबतच भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांनी परेडदरम्यान फ्लाय पास्टमध्ये भाग घेतला होता.
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनीही यावषी सप्टेंबरमध्ये भारताला भेट दिली होती. मॅक्रॉन आणि मोदी यांनी 10 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषदेदरम्यान दिल्लीत द्विपक्षीय बैठकही घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी भारत-फ्रान्स संबंधांना प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनऊच्चार केला होता. तसेच संरक्षण औद्योगिक रोडमॅपला लवकर अंतिम रूप देण्याची तयारीही दर्शवली होती.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना निमंत्रित केले जाईल, अशी अपेक्षा यापूर्वी व्यक्त करण्यात आली होती. मात्र व्यग्र कार्यक्रमांमुळे बायडेन यांच्या भारत दौऱ्याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही.