फ्रान्सच्या राजदूताचा चोरीला गेलेला मोबाइल हस्तगत
चांदनी चौक येथे घडला चोरीचा प्रकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील फ्रान्सचे राजदूत थियरी माथौ यांचा मोबाइल चोरीला गेला होता. दिल्लीच्या चांदनी चौक बाजारात ते गेले असता हा धक्कादायक प्रकार घडला होता. थियरी माथौ हे 20 ऑक्टोबर रोजी पत्नीसोबत बाजारात पोहोचले होते. त्यावेळी त्यांचा मोबाइल चोरीला गेला. मोबाइल चोरीच्या घटनेची माहिती दूतावासाने त्वरित दिल्ली पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी तपास करत 4 आरोपींना अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून मोबाइलही हस्तगत केला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी हे ट्रान्स-यमुना क्षेत्रातील रहिवासी असून याप्रकरणी पुढील तपास केला जात असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी मोबाइल टॉवर्समधील रिमोट रेडिओ युनिट्स चोरी करणाऱ्या आणि त्यांची विदेशात विक्री करणाऱ्या लोकांच्या एका मोठ्या नेटवर्कचा भांडाफोड केला आहे. 5 हजारांहून अधिक चोरी झालेल्या रिमोट रेडिओ युनिट्सची हाँगकाँगसारख्या विदेशी शहरांमध्ये विक्री करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 52 जणांना अटक करण्यात आली असून 700 रिमोट रेडिओ युनिट्सही हस्तगत करण्यात आले आहेत.