स्वात्यंत्रसेनेानी बिसरा मुंडा यांच्या पणतुचे निधन
झारखंड
थोर स्वातंत्र्यासेनानी बिसरा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा (वय ४५) यांचे शुक्रवारी निधन झाले. मंगल हे काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरू होते. त्यांची ह्रदयक्रिया बंद पडल्याने प्राणज्योत मालवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राज्यपाल संतोष गंगवार यांनी मंगल यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला. " मंगल मुंडा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मला मोठा धक्का बसला असून, झारखंडमधील आदिवासी समुदाय आणि मुंडा परिवाराचे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. या कठीण समयी मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (ट्विटर) द्वारे नोंदविली आहे.
मंगल मुंडा यांना अपघातात गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांच्यापरीने खूप प्रयत्न केला. आम्ही सोरेन कुटुंबिया त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून होतो. आमची त्यांना अन्य राज्यात आणखी उपचारासाठी हलविण्याचीही तयारी होती, पण त्याला फारसे यश मिळू शकले नाही, अशी प्रतिक्रिया झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मंगल मुंडा यांच्या निधनाचे वृत्त समजताच कल्पना सोरेन यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन मुंडा कुटुंबियांची भेट घेतली. भाजपचे अध्यक्ष आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनाही मुंडा कुटुंबियांचे दुरध्वनीवरून सांत्वन केले.
झारखंड येथील उलिहातू या मुळगावी मंगल मुंडा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.